झाडे वर्षा दो वर्षांनी
होतात ऐसे नाही
अकोला–खामगाव असा
प्रवास करतांना झाडे तोडल्याने भोंडा झालेला रस्ता पाहून मन खिन्न झाले. खेड्यातली
पाउलवाट असो किंवा शहरातील एखादी गल्ली.शेतातून जाणारा गाडरस्ता असो किंवा एखादा राष्ट्रीय
महामार्ग.या रस्त्यांच्या दुतर्फा जर वृक्षवल्ली असतील तर प्रवास सुखदायी होतो
किंवा प्रवास लांबचा जरी असला तरी कंटाळवाणा वाटत नाही.परंतू आता “हरियाली और
रास्ता” यांचे जरी अतूट बंधन असले तरी आता मात्र लांबच लांब रस्ता दिसतो ‘हरियाली’
काहीच नाही.सरकार एकीकडे वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेत आहे,अभियान राबवीत आहे तर
स्वत: सरकारच सर्र्रास झाडे तोडीत आहे.परवाच्या बातमीनुसार मागील वर्षात सरकारने
५६ हजार झाडे तोडली.”सडके देश को जोडती है” हे जरी खरे असले तरी काय रस्ते निर्मिती
करतांना मोठ-मोठ्या झाडांची जी सर्रास कत्तल सुरु आहे त्यामुळे “ग्लोबल वार्मिंग”
सारखे फटके बसणारच आहेत.ज्या प्रमाणात झाडे तोडली जातात त्याच प्रमाणात नवीन झाडे
मात्र लावली जात नाहीत.लावली तरी त्या झाडांची जोपासना होतांना दिसत नाही.नवीन
रस्ते निर्माण करतांना मोठी डेरेदार,कवेत मावणार नाही असे भक्कम बुंधे असलेली झाडे
तोडून कन्हेरा सारखी छोटी झुडपी झाडे लावली जातात.रस्ते निर्मितीचा जसा धडाका
घेतला आहे तसा पर्यावरण खात्याने सुद्धा झाडे लावण्याचा धडाका हाती घ्यावा.वृक्ष
लागवडी साठी प्रोत्साहन,उत्तेजना द्यावी जे अश्याप्रकारचे कार्य करतात त्यांचा
गौरव करावा.तर लोक झाडे लावण्यासाठी प्रेरित होतील.झाडे लावण्याच्या मोहिमेत शाळा,शिक्षक
यांचे समवेत सर्वच कार्यालये,व्यापारी यांना सुद्धा उद्युक्त करावे. वातानुकलन
यंत्र(ए सी) घर थंड करते परंतु उष्णता बाहेर फेकते.त्यामुळे ते वातावरणातील उष्णता वाढवते.या यंत्राच्या किमती वाढवाव्यात,त्यावर
कर लावावा,त्याच्या विक्रेत्यांना ग्राहकांना वातानुकलन यंत्रासोबत किमान दोन झाडे
तरी लावण्यास द्यावी. अशा पर्यावरण बचावाच्या उपाययोजना अत्यावश्यक झाल्या आहेत. शिवाजी
महाराजांनी सुद्धा स्वराज्यात रस्ते निर्मिती केली होती रस्त्यात येणा-या झाडांची
सर्रास कत्तल केली नव्हती.त्यांच्या आज्ञापत्रात ते म्हणतात
“हि झाडे वर्षा दो वर्षांनी
होतात ऐसे नाही रयतेने हि झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काल जतन करून वाढविली. ती
झाडे तोडीयल्यावरी त्यांचे दू:खास पारावार काये ?”
यावरून त्यांची दूरदृष्टी व
पर्यावरण प्रेम दिसून येते.आपण त्यांची जयंती साजरी करतो,त्यांच्या जयन्तीहून वाद
करतो,राज्याभिषेक दिन साजरा करतो,त्यांचे स्मारक उभारतो त्यांची शिकवण मात्र
अनुसरत नाही.राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरण्याच्या व नवीन महामार्ग
निर्मितीच्या कार्यात लक्षावधी झाडांची कत्तल झाली आणि होत आहे.सरकारच्या मनात आले
तर सरकार काहीही करू शकते.सध्याची जी झाडे आहेत त्यांच्या बाजूने भूमी अधिग्रहित
करून या सध्याच्या झाडांचाच दुभाजक बनवून नवीन रस्ता सुद्धा सरकार करू शकते परंतु
हे सरकारला आणि नोकरशहांना का सुचत नाही देव जाणे.रस्ते निर्मिती करा, विकास करा
परंतू सोबतच पर्यावरण संरक्षणाचा सुद्धा धडाका घ्या.कारण जी झाडे तुम्ही तोडत आहात
ती काही “वर्षा दो वर्षांनी होतात ऐसे नाही.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा