बुरी नजर वाले तेरा मुंह काला
बुरी नजर वाले तेरा मुंह काला,अगदी
साधे वाक्य लहानपणापासुनच सगळ्यांनाच माहित असलेले. ट्रकच्या मागे हमखास आढळणारे हे
वाक्य.बुरहान वाणी याला भारतीय जवानांनी जहन्नूम मध्ये धाडल्यावर 20 जुलै काळा
दिवस पाळणा-या पाकडयांचेच तोंड जगात काळे झाले आहे.सारे जग जाणते की दहशतवादास खतपाणी
पाकेस्तानातूनच मिळते तरीही आम्ही दहशतवादास पाठबळ देत नाही असा डांगोरा जागतेक स्तरावर
आणि युनोमध्ये पाकडे नेहमीच पिटत असतात मात्र एका दहशतवाद्यास शहीद म्हणवून आणि त्याच्या
मरणा-यावर काळा दिवस पाळून पाकने जागतिक स्तरावर मात्र स्वत:चेच तोंड काळे करून घेतले
आहे.“एक ना एका दिवस पापाचा घडा भरतोच” , “शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर केशवाने
त्यावर सुदर्शन सोडले होते” अशा प्रकारची वाक्ये आपण एखाद्या पापी व्यक्ती बद्दल बोलतांना
बरेच वेळा ऐकत असतो.परंतू काळतोंड्या पाकच्या पापाचा घडा काय कधीच भरणार नाही का? पाक
देशाचे नांव सुद्धा उच्चारावे वाटत नाही, काय तर म्हणे पाकिस्तान,पाकिस्तान म्हणजे
पवित्र भूमी असा अर्थ.परंतू “नांव मोठ आणि लक्षण खोट”. १९४७ या वर्षी भारतापासून
विभक्त होऊन निर्माण झालेल्या या छोट्याश्या तुकड्याने मोठ्या दिमाखाने पाकिस्तान
हे नांव धारण केले आणि तेंव्हापासूनच भारतानेच दिलेल्या ५५ कोटी रुपयांच्या जोरावर कोटी-कोटी अपवित्र कृत्ये करण्यास सुरवात केली ती आजतायागत सुरूच आहे.भारतीय संस्कृती आणि येथील
अनेक पंथ हे शतकानुशतके सहिष्णू आहेत.शांततेचा संदेश देणारे आहेत.भारताने सदैव पाकेस्तान
बाबत शांततेचे धोरणच ठवले आहे.भारत सदैव माणुसकीच्या भावनेतून वागतो.दोन वर्षांपूर्वी
काश्मीरला बसलेल्या जबरदस्त तडाख्याच्या वेळी या ‘अलगाववादी’ म्हणजेच फुटीरतावादी
आणि इतर नागरिकांना भारतीय जवानांनी कसे सहकार्य केले,स्वत:चा जीव धोक्यात घालून जीवदान
दिले. आणि त्याच सैन्यावर संचारबंदी असूनही बाहेर निघून दगडफेक करणा-या या पिलावाळीस
काहीच कसे वाटत नाही?यांची स्वत:ची मुले विदेशात आरामात राहतात, शिकतात आणि दुस-याच्या
मुलांना फितवून त्यांना हे नतद्रष्ट हकनाक बळी पाडतात.यांच्या अशा कृत्यांवरून भविष्यात
येणा-या परिस्थितीची कल्पना येते.ज्याप्रमाणे काश्मिरी पंडितांना हाकलून लावले
त्याच प्रकारे जवानांवर दगडफेक कर-यापर्यंत यांची मजल गेली आहे.पुढच्या धोक्याची चाहूल
लागलेली आहे काही भाग तर आधेच “POK” झाला आहे त्यातील काही भाग “घरी नाही दाणा आणि मला बाजीराव
म्हणा” या वृत्तीने वागणा-या पाकडयांनी चीनला सुद्धा दिलेला आहे. स्वत:ची अर्थव्यवस्था
पोकळ आणि भारताची भूमी परस्पर चीनला ! पाणी डोक्यावर चालले आहे भारताला या बाबत अमेरिका
वा इतर शक्तीना न जुमानता कठोर पावले उचलावीच लागतील.अहिंसा तत्वाच्या अतिरेकामुळे
कृष्ण,अर्जुन,चाणक्य,शिवाजी महाराज, राणा प्रताप,पृथ्वीराज चव्हाण यांची शिकवण आपण
विसरूनच गेलो आहोत.“किशन ने कहा अर्जुनसे ना प्यार जता दुष्मनसे युद्ध कर”. खूप झाली
शांतता, पुरे झाले शाली आणि साड्या देणे,पुरे झाले त्यांना अचानक भेटी देणे, पुरे झाले
त्यांच्या कलाकारांना नाचवणे, पुरे झाले खेळातून मैत्री.मान्य आहे ‘इन्सानियत का दायरा’, मान्य आहे ‘पडोसी बदलते नाही आते’ परंतू शेजारी आपल्या घरात अतिक्रमण करूनच राहिला,आपल्या
घराची शांतता भंग करूनच राहिला आणि आपण आपल्या जवानांना बळी देऊनच राहिलो.आता ‘आँख
मी आँख डाल के बात’ झालीच पाहिजे.नाहीतर अण्वस्त्रे केंव्हा दहशतवाद्यांच्या हाती जातील नेम नाही आणि मग वेळ निघून गेली असेल.
त्यांचे तोंड तर काळे झालेच आहे आपण सुद्धा जगात तोंड दाखवू नाही शकणार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा