सेनेने लहान भाऊ श्रीकृष्ण आठवावा
शेवटी शेतक-यांना कर्ज मिळाले. श्रेय कुणाचे का असोना बोर्ड मात्र लगेच लागले.राज्याच्या
तिजोरीवर आता बोजा पडणार.सातवा वेतन आयोग सुद्धा उंबरठ्यावर आलेला आहेच.उत्तर
प्रदेश मध्ये कर्जमुक्ती झाल्यावर “लोन” मुक्तीचे लोण सर्वत्र पसरले.शेतक-यांना कर्ज
मुक्त करतांना देश आणि राज्यांच्या आर्थिक बाबींना बासनात गुंडाळले गेले.शेतक-यांना
कर्ज मुक्त करू नये किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करू नये असेही मत नाही.शेतकरी
काय तर सर्व जनतेचे हित जोपासणे हे शासनाचे कर्तव्यच आहे.असे हित जोपासण्यासाठीच
जनेतेने सरकार स्थापन करण्याची संधी दिली असते.भारतीय लोकशाहीत सत्तेची मधुर फळे
चाखण्यासाठी अनेक वेळा विविध विचारसरणी असलेलेले एकत्र आले आहेत आणि त्यांनी सरकार
चालवले आहे.यात वरकरणी देशहितासाठी एकत्र आलो असे हे पक्ष दाखवत असले तरी हित
कुणाचे होते हे जनता जाणून असते.महाराष्ट्रात सुद्धा “नैसर्गिक मित्र” या नात्याने
भाजप व शिवसेना एकत्र आले असले तरी शिवसेना ही सत्तेत राहूनही सतत विरोधी
पक्षासारखे वर्तन करीत आहे.महाराष्ट्रातील जनतेला शिवसनेकडून हे अपेक्षित नाही.शिवसेनेने
नैसर्गिक मित्र या नात्याने भाजपशी जुळवून घ्यावे असे अनेकांना वाटते.अनेकांनी तसे
बोलून सुद्धा दाखवले आहे परंतू शिवसेनेला महाराष्ट्रात तरी मोठ्या भावाचा सन्मान
हवा आहे. एखाद्या घरात लहान भाऊ कर्तुत्ववान असतो तर मोठा भाऊ तसा नसतो तेंव्हा
मोठ्या भावाला जुळवून घ्यावे लागते. बरे मोठा–छोटा करता करता शिवसनेने भाजप व आतापर्यंत
सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र ,मोदी यांच्या वर तोंडसुख घेऊन जनतेची
थोड्या प्रमाणात का होईना निराशा केली आहे.एकीकडे “अफझलखानाची फौज” सारखे हिणवून
दुसरीकडे केंद्रात व राज्यात त्यांच्याच फौजेत स्थान मिळवले आहे.लोकसभा,विधानसभा आणि
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या वेळी भाजप-सेना यांच्यातील वाकयुद्ध मोठे रंगले
होते.या निवडणुका जिंकल्यावर सभागृहात सुद्धा एकीकडे मोदी-मोदी तर दुसरीकडे
बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष असे चित्र सर्वानी पाहिले.नंतर पारदर्शक व्यवहार
होतो की नाही यासाठी पहारेकरी तयार झाले आणि महापालिकेचा कारभार सुरु झाला.बाळासाहेबांनी
स्थापन केलेल्या सेनेने मराठी आणि हिंदुत्व या मुद्द्यांमुळे एक लोकप्रिय पक्ष
म्हणून झपाट्याने प्रगती केलेली सर्वानी पहिली.जात-पात सोडून राजकारण केले
अनेकांना शिवसेनेमुळे सत्तेचे गोड फळ चाखावयास मिळाले.परंतू गत दोन वर्षांपासून
शिवसेनेची काही तारांबळ उडालेली दिसते.केंद्रात सत्तेत सोबत आहे तरीही केन्द्रावर
टीका,राज्यातही तेच मराठा मोर्च्याच्या वेळी संभ्रम तर शेतकरी मोर्चाच्या वेळी एकीकडे
सत्तेत आणि दुसरीकडे शेतक-यांसाठी वातानुकुलीत सभा कुठे आंदोलन.सत्तेत सहभागी
असूनही स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवण्यासाठी शिवसेनेची सतत सुरु असलेली धडपड पाहून
शेतकरी आणि जनता सुद्धा चकीत झाली आहे.शेतक-यांनी शिवसेना खासदारांशी बोलतांना
सर्व काही उघड केले आहे आणि तसा व्हीडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.शिवसेना ही आता
पूर्वी सारखी मुद्द्यांवर ठाम राहतांना का दिसत नाही?राजीनामे खिशात आहे,भूकंप
होईल अशा स्वरूपाच्या पोकळ घोषणा शिवसेनेतील काही नेते का देत असतात? प्रमोद महाजन
यांनी एका भाषणात म्हटले होते की,”बाळासाहेब म्हणजे जगातील एकमेव असे नेते आहे की
ते एकदा जे बोलले की त्यावर ठाम राहणारे नेते आहेत त्यांनी कधीही ‘मी असे बोललोच
नाही’ असे म्हटलेच नाही.त्यांच्या पोटात जे आहे तेच त्यांच्या ओठांवर असते.”
महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना तशीच हवी आहे जशी ती पूर्वी होती.एकेकडे सत्तेची
मधुर फळे चाखण्याची मनीषा तर दुसरीकडे सरकार विरोध असे होतांना पाहून सामान्य
नागरिक आणि शिवसैनिक सुद्धा चक्रावला आहे.दिल्लीत गेलेले काही नेते तर निव्वळ पोकळ
घोषणा देत असतात. मध्यंतरी विमानप्रवासात कर्मचा-याशी हुज्जत घालून त्याला पंचवीस
वेळा चप्पल मारल्याची कबुली देणा-या खासदार गायकवाड यांचा किस्सा हा सुद्धा शिवसेनची
प्रतिमा मलीन करणारा ठरला.नंतर गायकवाड यांनी लोकसभेत घुमजाव केले.आता जनतेला असे
मग्रूर लोकप्रतिनिधी आवडत नाहीत.आपण भाजपा
पेक्षा काही वेगळे आहोत हेच जर सिद्ध करायचे असेल आणि तेही त्यांच्याच सोबत सत्तेत
राहून. तर काही निराळा पवित्रा घ्यावा लागेल नाही तर सेनेचेच हसे होत राहणार.केंद्र,राज्य,महापालिका
सर्वच निवडणुकांत व इतरवेळी सुद्धा दोन्ही पक्षांनी रामायण महाभारत यांमधील
पात्रांचे दाखले देऊन एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे काम केले परंतू आधी सांगितल्याप्रमाणे
कधी कधी कनिष्ट बंधू सुद्धा कर्तुत्ववान असू शकतो महाभारत,इतर ऐतिहासिक दाखले सतत
देतांना शिवसेना हे विसरली की भगवान श्रीकृष्ण बलरामाचे लहान भाऊ होते तरी मान
मात्र सतत श्रीकृष्णाला मिळत गेला.यात बलरामाने कुठे कमीपणा मानला नाही. शिवसनेने
सुद्धा जनमताचा आदर करावा,आदर्श विचारसरणी असल्याचे दाखवणा-या व जनतेने सुद्धा
आदर्श राहावे असे व्हँलेंटाइन डे व इतर भारतीय संस्कृती अथवा सणांबाबत भाष्य
करणा-या शिवसनेने स्वत: सुद्धा राजकारणात आदर्श असल्याचे दाखवावे.आपल्या
मावळ्यांना शिवसेनेच्या धनुष्यातून शाब्दिक बाण सोडणे कमी करायला लावावे आणि आगामी
निवडणुकांत स्वबळावर सत्तेत यावयाचे असेल्यास त्या निवडणुकांची तयारी बलरामानुज
श्रीकृष्णासारखे राजकारण करून व त्याच्यासारखीच
आदर्श वागणुकीने करावी व मोठ्या भावाचे स्थान पुनश्च प्राप्त करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा