आमचे एम.आर. सर
अं
हं !...येथे एम.आर. म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी नाही. कारण एम आर म्हटले की प्रथम
कुणालाही अप टू डेट असा तरुणच आठवेल. परंतू एम.आर.या आद्याक्षरांच्या समोर सर
सुद्धा आहे. ही आद्याक्षरे आहेत एका व्यक्तीच्या नावातील. ही व्यक्ती म्हणजे तीस
चाळीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये दरारा , आदरयुक्त भीती असलेले आमचे
लाडके एम.आर.देशमुख सर. पूर्ण नांव “मधुकर राधाकृष्ण देशमुख”. परंतू “एम.आर.” या
नावाने सर्वपरिचित. परवा संध्याकाळी एम. आर. सर हातात काठी घेऊन फिरतांना दिसले. त्याच
त्यांच्या ढगळ पायजमा शर्ट या पेहरावात. 30 वर्षांपासून त्यांना त्याच पोशाखात सर्व
पहात आले आहेत. नेहमी पायी फिरणा-या सरांना प्रथमच हातात काठी घेतलेले पहिले. घरी येतांना
मन भूतकाळात गेले.पाचवीत नॅशनल हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता. आमचा वर्ग
म्हणजे “ई क्लास”.कारण आमची तुकडी “ई” होती. सातवीत खूप कडक वर्गशिक्षक आहेत
म्हणून कानी येऊ लागले. सातवीतील काही मुले सरांच्या कडकपणाचे किस्से आम्हास सांगू
लागले. सहावीचे वर्ष सरले आणि आम्ही एम.आर. देशमुख सर यांच्या वर्गात दाखल झालो. त्यांच्या
पहिल्याच तासाला वर्ग एकदम चिडीचूप होता. हजेरी नंतर सरांनी आम्हाला सूचना दिल्या,
श्रीमदभंगवद्गीता छोटे पुस्तक विकत आणायला सांगितले.पहिला तास गीतेचा 12 वा अध्याय
वाचून होत सुरु होत असे. “एवं सततयुक्ता ये....” असे सुरु निघाले की शाळेशेजारून
जाणारे पादचारी थबकत त्यांना आनंद वाटे,शाळा संस्कारी असल्याचे ते गावात बोलत.
रामरक्षा पठण स्पर्धेत सर भाग घेण्यास सांगत. “विश्वामित्र” हे पुस्तक मला या स्पर्धेत
बक्षीस मिळाले होते. सरांच्या शिक्षा सुद्धा मोठ्या अचाट असत. शिक्षा अशा की
मुलांना त्यांनी केलेल्या चुकांचा पश्चाताप वाटावा. “मी चूक केली आहे” अशी पाटी गळ्यात
घालून वर्गा बाहेर बसवणे, एक विद्यार्थी दुस-याचे केश कर्तन करीत आहे अशा
आविर्भावात दोघांना बसवणे यामुळे शाळेतील सर्व मुलांना ही चुका करणारी मुले दिसत
आणि म्हणून मग सरांच्या तासामध्ये नेहमी “Pin Drop Scilence” असे. पुढे सरांचा
स्वभाव “वज्रादपि कठोर आणि कुसुमादपि मृदू” असल्याचे समजायला वेळ नाही लागला. क्वचित
प्रसंगी सर त्यांच्या कामासाठी बँकेत पाठवत. आपल्या विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान
कळावे, त्यांना “Practical Knowledge” सुद्धा असावे असा त्यांच्या दृष्टीकोण होता
हे नंतर त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले. या कामामुळे आमच्या अभ्यासात कुठेही व्यत्यय
येणार नाही याकडे सुद्धा त्यांचा कटाक्ष असे. भूतकाळातील या विचारांच्या तंद्रीतच मी
माझ्या घरी पोहोचलो. सरांना काठीचा आधार घेत चालतांना पाहिल्याने त्यांना
भेटण्याची तीव्र इच्छा जागृत झाली होती. म्हणून दुस-या दिवशी माझा तत्कालीन वर्गबंधू
रितेश काळे याला “चल एम आर सरांना भेटायला जाऊ” म्हटले. त्याने लगेच होकार दिला. आम्ही
दोघांनी सरांचे घर गाठले.सरांचे घर तीस वर्षांपूर्वी होते तसेच छोटेखानी साधेसुधे
सरांसारखेच. सरांच्या शेजारील घरे मात्र टोलेजंग झालेली दिसली. राजा,पंडीत आणि मित्र यांना भेटायला
जातांना काहीतरी घेऊन जायचे असते हे आपली संस्कृती सांगते तो नियम पाळला. अंगणातून
थोडे समोर गेल्यावर “या या !” म्हणत सरांनी स्वागत केले. सरांनी आम्हाला ओळखले होते.
आम्ही सरांना नमस्कार केला. आश्चर्याने सर म्हणाले “आज कसे काय बुवा आगमन?” ,
“सहजच” असे म्हटल्यावर त्यांचा आनंद डोळ्यातून दिसत होता. “माझे विद्यार्थी भेटले
की आनंद होतो आणि माझे आयुष्य अजून वाढते” ते म्हणाले. सरांचे वय वर्षे 87,वयोमानानुसार
कमी ऐकू येते परंतू वाचन, फिरणे, आणि नामस्मरण या गोष्टी गेल्या कित्येक
वर्षांपासून नित्यनेमाने सुरूच आहेत. माझ्या मनात विचार डोकावला “आपण नेमेके इथेच
चुकतो, नेमाने कोणतीच गोष्ट करत नाही.”. फोटो व इतर कौटुंबिक चौकशी झाली. तसे सरांच्या
कुटुंबीयांबाबत जास्त माहेती नव्हती परंतू सरांचा मुलगा धनंजय देशमुख (धनु दादा) शालेय
व महाविद्यालयीन जीवनात आमचा ‘सिनियर’ होता. फेसबुकमुळे संपर्कात आहे. भेटीअंती सरांचा
निरोप घेतला. मागे एक वर्षांपूर्वी सर बाजारात भेटले होते माझ्या सोबत सौ. होती. सरांनी
त्यांच्या सवयीप्रमाणे गाल पिळला आणि स्वस्तुती करू नये परंतू सौ.ला उद्देशून सर
म्हणाले तुझा नवरा छान आहे माझा आवडता विद्यार्थी आहे. एखादे मोठे पारितोषिक
मिळाल्यावर काय आनंद होईल असा आनंद मला वाटला. लहानपणापासून कित्येक शिक्षकांनी
शिकवले आम्हा विद्यार्थ्यांचे दैव चांगले की सर्वच शिक्षक एकापेक्षा एक होते, ज्ञानी
सुस्वभावी. प्रत्येकात काही तरी वेगळे वैशिष्ट्य होते. परंतू काहीतरी ऋणानुबंध
असतील की काय देव जाणे एम. आर देशमुख सरांची सर्वात जास्त वेळा भेट होत गेली. परवा
ते दिसले, त्यांना घरी जाऊन भेटलो. उभयता आनंद वाटला. प्रगाढ गुरु-शिष्य परंपरा लाभलेल्या
आपल्या देशात आता गुरु-शिष्य नाते म्हणावे तेवढे आत्मीयतेचे राहिले नाही याचा खेद वाटतो.
सरांनी विद्यादान केले, सुसंस्काराचे धडे दिले. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता प्रकट
करणारी ही लेखरुपी गुरुदक्षिणा. सर तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या
सारखे हाडाचे शिक्षक आगामी पिढ्यांना लाभो हीच सदिच्छा.