समृद्धी महामार्ग आणि खड्ड्यांनी समृद्ध मार्ग
राज्य सरकारने मुंबई ते नागपूर नवीन समृद्धी महामार्ग तयार करण्याचा चंग
बांधला आहे.त्याचे नामकरण “समृद्धी महामार्ग” असे केले आहे.मान्य आहे रस्ते देशाच्या विकासाची गती वाढवणारे असतात. परंतू केंव्हा?
जेंव्हा ते रस्ते खड्ड्यांनी समृद्ध नसतील
तेंव्हाच. देशातील हेमामालिनीच्या गालाप्रमाणे असलेल्या एकदम सपाट व मुलायम रस्त्यांवर
(इति लालूप्रसाद) तारुण्यपिटिकेप्रमाणे मार्गपिटिका अर्थात मुरूम व खड्डे दिसत
आहेतच. हल्ली अत्यंत निकृष्ट पद्धतीने केलेल्या रस्त्यावर एक-दोन वर्षातच खड्डे
पडतात,ठिगळ म्हणून त्या खड्ड्यांमध्ये मुरूम आणून टाकतात. जसा गालावरचा मुरूम म्हणजे
तारुण्यपिटिका तसा मार्गावरचा मुरूम आणि खड्डे म्हणजे मार्गपिटिकाच.कधी तो
स्वखर्चाने टाकल्या जाण्याचे दावे सुद्धा केले जातात,क्वचित प्रसंगी स्वखर्च होतही
असेल.तो मुरूम मग सर्वत्र पसरतो गाड्या घसरण्याची शक्यता असते. गावातील मार्ग,राज्य
महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग सर्वांची गत सारखीच. नवरात्रीत माहूरला जाण्याचा
योग आला होता तेंव्हा या रस्त्याने रोज प्रवास करणा-यांची कीव आली होती. सोमवारी वजनदार
केंद्रीय मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी माहूर ला रस्ते उद्घाटन समारंभासाठी उपस्थित
होते. त्यांना बाळापुर-पातूर रस्त्याची गत कळवायला हवी होती.खामगांव ते माहूर
बाळापुर-पातूर मार्गे तर एकदा सर्व सन्मानीय लोकप्रतिनिधींची आणि सार्वजनिक
बांधकाम खात्याच्या कर्मचा-यांची माहूर यात्रा काढावी आणि त्यांना या रस्त्याची
अनुभूती द्यावी.बाळापूर–पातूर, माहूर-पुसद मार्ग ब-याच ठिकाणी अत्यंत दुरावस्थेत
आहे. तशीच अवस्था अकोला-खामगांव,खामगांव-मलकापूर, मलकापूर-बोदवड या मार्गांची.अनेक
ठिकाणी मार्गपिटिका, मुरुमांची ठिगळे आहेतच. जामनेर जि. जळगाव या ठिकाणी रविवारी
गेलो होतो जातांना खामगांव–मलकापूर-मुक्ताईनगर-बोदवड-जामनेर असा गेलो आणि येतांना जामनेर-बोदवड–मलकापूर-खामगांव
असा आलो. काय ते खड्डे समुद्ध रस्ते ! या रस्तावरून लोकप्रतिनिधी जात नाहीत काय?
जर जात असतील तर ते संबंधीत खात्याच्या मंत्री महोदयांना या रस्त्यांच्या अवस्थे
बाबत पत्र पाठवतात की नाही देव जाणे.प्रचंड खड्ड्यांमधून गेल्याने गाड्या तर खराब
होतातच शिवाय मणक्याचे त्रास, प्रसंगी अपघातामुळे जीवितहानी अशी संकटे असल्याने ड्रायव्हरच्या
मुठीत स्टेअरिंग असते आणि प्रवाश्यांच्या मुठीत त्यांचा जीव. कशाचा रोड टॅक्स घेतात
हे ? कोणत्या तोंडानी रोड टॅक्स मागतात ? रस्ते तर निकृष्ट आहेत मग का म्हणून रोड टॅक्स
द्यावा ? एस टी चालकांनी सुद्धा चांगल्या रस्त्यांची मागणी पुढे रेटणे आवश्यक आहे.
पुलांची अवस्था तीच एकाही पुलाची “लेवल मेंटेन” नसते .प्रत्येक पुलावर प्रवेश
करतांना एक गचका बसतो नंतर पुल गाळे पद्धतीने बांधल्यामुळे त्यावर ठराविक अंतराने गतीरोधकाप्रमाणे गचके बसतात आणि शेवटी पूल
संपताना एक गचका बसतो. काही ठिकाणी ब्रिटीशकालीन पुल आजही वापरले जात आहे
अभियांत्रिकी तंत्रज्ञान तर प्रगत आहे मग असे पूल कसे काय ? ब्रिटीशकालीन
पुलांची लेवल दाखवा जरा यांना.तुम्ही प्रथम जे आहे ते चांगले करा त्याला मेंटेन
करा आणि मग नवीन उपक्रम हाती घ्या. ठेकेदारावरून बुलडोजर फिरवण्याचे बोलले जाते परंतू
त्यांच्यावर बुलडोजर फिरवण्याआधी निदान त्यांच्या करवी रस्त्यांवर मुरूम न टाकता
व्यवस्थित गिट्टी आणि डांबर टाकून रोडरोलर फिरवून घ्या म्हणजे 70 वर्षाच्या या
देशातील रस्ते खरोखर हेमामालिनीच्या गालांप्रमाणे दिसतील, त्यावर निव्वळ मुरूम
भरून काम भागवू नका. समृद्धी महामार्ग तर बनवा त्याला ना नाही परंतू प्रथम खड्ड्यांनी
समृद्ध शहरातील मार्ग, राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग यांना सुद्धा सुधारा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा