“बहुजन अहिताय बहुजन दु:खाय“
राज्य परिवहन महामंडळ
कर्मचा-यांनी सातवा वेतन आयोग लागू व्हावा
म्हणून संप पुकारला. “सबको मिले मेहनत के मुताबिक अपना अपना हिस्सा” याप्रमाणे
सर्वाना त्यांच्या कामाचा योग्य असा मेहनताना मिळायलाच हवा आणि तो देणे हे सरकारचे
कर्तव्य आहे. थंडी, पाउस आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूत आपल्या संसाराचा गाडा
हाकण्यासाठी प्रवाश्यांना सुरक्षितरित्या परिवहन मंडळाची मोटार हाकणारे चालक आणि
वाहक यांची मेहनत खरच वाखाणण्याजोगी आहे. विदर्भ आणि खानदेशातील उन्हाळ्यात भर
उन्हात सूर्य आग ओकीत असतांना मंडळाचे वाहक मोटारीच्या गरम संयंत्रा शेजारीच बसून
गाडी चालवीत असतात. पिण्यासाठी बारदान्याच्या कपड्याने लपेटलेली बाटली असते शिवाय
आगारामध्ये दुरुस्ती पथक सुद्धा राबत असते. अशा कर्मचा-यांची सुद्धा सरकारने इतर
कर्मचा-यांप्रमाणे काळजी वाहणे आवश्यकच आहे. परंतू याच कर्मचा-यांच्या संघटनेने
नेमका दिवाळीचा मुहूर्त साधून सातव्या वेतन आयोगासाठी संप केला. नेमके जेंव्हा
नागरिकांना फिरण्याचे जास्त काम असते तेंव्हाच हा संप केलेला आहे. खेड्यापाड्याच्या
जनतेची तर फारच कुचंबणा होईल. दिवाळीच्या दिवसांत खाजगी प्रवाशी वाहतूकदार आपल्या
वाहनांचे भाडे अव्वाच्या सव्वा वाढवितात. जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागतो शिवाय
यांची वागणूक अरेरावीची. संप पुकारून आता 24 तास लोटले आहे. प्रशासनाने निलंबनाचा इशारा
दिला आहे. ऐन दिवाळीत कुणाचेही निलंबन न होवो. सरकारने व कर्मचारी संघटनेने सुद्धा
जनता, कर्मचारी अशा दोघांचेही हित बघून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. हा लेख प्रकाशीत
होईतो कदाचित संप मिटलेलाही असू शकतो. महामंडळाकडे पैसाच नाही असे स्पष्टीकरण मा.
परिवहन मंत्री यांनी दिले. पैसेच नाही तर मग मंडळ नफ्यात येईल अशा काही उपाययोजना करा
ना ! एकीकडे शासन फुकट पैसे वाटते, धान्य वाटते अनेक योजनांमधून जनतेला ऐदी बनवते तर
दुसरीकडे मेहनत करणा-यांना मेहनतीचा योग्य तो परतावा देत नाही त्यामुळेच ऐन सणासुदीच्या
काळात कर्मचा-यांना असा मार्ग निवडावा लागला. परंतू त्यांनी जर काळ्या फिती लावून काम
केले असते तर जनतेच्या मनात त्यांच्या विषयी आदर वाढला असता. संप दिवाळी नंतर करण्यास
हरकत नव्हती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ही तळागाळातील जनतेसाठी उपयुक्त अशी
सुवधा आहे. त्यांना परिवहन मंडळाच्या मोटारीचा किती आधार असतो. ग्रामीण भागातील गरोदर
महिला दवाखान्यात जाण्यासाठी याच मोटारीला प्राधान्य देतात .कित्येक वेळा तर महिलांची
प्रसूती सुद्धा परिवहन मंडळाच्या मोटारीतच झालेली आहे. असे हे परिवहन मंडळ जनतेच्या
सुविधेसाठी आहे. म्हणून “बहुजन हिताय बहुजन सुखाय” असे ब्रीदवाक्य मिरवणा-या महामंडळाने
ऐन दिवाळीत संप करणे अपेक्षित नव्हते. त्यांच्या संपामुळे सामान्य जनांची मात्र “बहुजन अहिताय बहुजन दु:खाय“ अशीच गत झाली आहे. शेवटी ही
दिवाळी सर्वाना “जो जे वांछील तो ते लाहो” अशी असावी हीच प्रार्थना. विनय विजय वरणगांवकर , 9403256736
कृपया टायपिंग मिस्टेक टाळाव्या
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा