सशस्त्र सेना झेंडा दिवस
आणि सारेच निरस
आज 7 डिसेंबर सशस्त्र
सेना झेंडा दिवस. मला चांगले आठवते वर्ग पाच मध्ये असतांना एका रुपयात सैनिकांसाठी
एक तिकीट घ्यावे लागते असे प्रथमच समजले. सरांनी ते दिले मी ते माझ्या कंपासात
चिकटवले त्यानंतर दरवर्षी एक-एक तिकीट घेत गेलो. कंपासपेटी तीच. आतासारखे प्रत्येक
वर्षी नवीन असा प्रकार नव्हता. पुढे त्या तिकिटांवर “सशस्त्र सेना झेंडा दिवस“ असे
जे लिहिले असते त्याचा बोध झाला. भारत स्वतंत्र झाल्यावर सैन्य, सैन्यातील जीवित
हानी होणा-यांचे पुनर्वसन, सैनिक कल्याणासाठी व सैन्यातून निवृत्त झालेल्यांसाठी पैसा
हवा होता. हा निधी “झेंडा दिवस” साजरा करून उभा करू शकतो असा प्रस्ताव एका समितीने
सरकार समोर ठेवला. म्हणून मग 7 डीसेंबर 1949 हा झेंडा दिवस देशभर साजरा होऊ लागला आणि हे
महत्वपूर्ण तिकीट आपल्या सैनिक कल्याण निधीसाठी म्हणून घ्यायचे असते हे कळले.घरच्या मंडळीनी
सुद्धा ते तिकीट घेत जा असे सांगितल्यामुळे वर्ग 10 पर्यंत आम्हा अनेक मुलांच्या
कंपासपेटीत वर्ग 5 ते 10 पर्यंत अशी 6 तिकिटे गोळा झाली होती. सैनिकांसाठी आपण सुद्धा खारीचा वाटा
उचलल्याचा आनंद होत असे.नंतर महाविद्यालयीन जीवनात मात्र हे तिकीट मिळणे बंद झाले.
सैनिकांसाठी म्हणून लहान मुले जरी आनंदाने ही तिकिटे घेत असली तरी ज्या-ज्या
कार्यालयात व त्यांच्याशी संलग्न शाळा वा तत्सम विभागात ही तिकीटे वाटप केली जातात
त्या-त्या ठिकाणी या तिकीट वाटपाचे कार्य मात्र मोठ्या निरस भावनेने केले जाते. प्रत्येक
कर्मचा-यास सक्तीने काही तिकिटे घेण्यास सांगितली जातात तो मग ती तिकीटे कुणाला
देशभक्तीच्या हेतूने पुढे वाटप करो अथवा न करो. अधिका-यांची सक्ती असल्याने
कर्मचारी ती तिकीटे घेतो मात्र सक्ती असल्याने त्याच्या मनात ती तिकीटे घेताना जी
देशप्रेमाची भावना असावयास हवी ती येत नाही. मारून-मुटकून एखादे कार्य करावे लागते
तसे त्याचे होते. खरे म्हटले तर एखाद्याची तिकीट वाटपाची जेवढी क्षमता असते तेवढी
तिकिटे त्याच्या जवळ देणे जास्त योग्य आहे. तसेच केवळ शालेय विद्यार्थ्यांना ही
तिकीटे न देता जनतेस सुद्धा ही तिकिटे सार्वजनिक ठिकाणी समारंभपूर्वक दिल्यास
कदाचित आपल्या सैनिकांसाठी जास्त निधी गोळा होईल.परंतू असे न करता हे कार्य सक्तीने
करावयास लावले जाते आणि मग त्यात उदासिनता येते. हे देशकार्य आहे ही जाणीव राहात
नाही. कर्मचारी जी तिकीटे घेतो ती बहुतांशवेळा त्याच्या जवळच राहतात आणि मग ज्या
उद्देशाने हे कार्य सुरु केले आहे तो उद्देश पूर्ण होत नाही. सैनिक शहीद झाले की
मेणबत्त्या लावायच्या, अश्रू ढाळायचे, राखी पौर्णिमेच्या वेळेस राख्या पाठवायच्या
आणि निधी गोळा करतेवेळी निरस भावनेने ते कार्य करायचे हे कितपत योग्य आहे? गेली
कित्येक वर्षे या तिकीटाची किंमत एक रुपयाच आहे. जे सैनिक देशासाठी सिमेवर उन,
वारा, थंडी, पावसात तैनात असतात त्यांच्यासाठी एक रुपया देतांनाचे काम हे आनंदाने होणे
गरजेचे नाही का? परंतू आपली Sysytemच शासनस्तरावर अशी कार्यपद्धती राबवते की देशहिताचे,समाजहिताचे
कार्य करतेवेळी कर्मचा-यांच्या मनात नीरस भाव असतात. हे उचित नव्हे. सैनिक निधी, शहीद
पोलीस निधी यासाठी स्वयंस्फूर्तीने मदत होतांना क्वचितच दिसून येते. सर्व शासनच
करेल याची वाट न बघता सैनिक निधी गोळा करण्याच्या कार्यात सहभागी सर्वांनीच आनंद आणि
उत्साहाने ते कार्य केले पाहिजे. तसेच या निधी गोळा करण्याच्या प्रक्रियेत सर्वदूर
सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा