Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/१२/२०१७

Article on days spent in less money but lot of joys

साडीचा ड्रेस आणि अल्टर पँट
     मुलगा शाळेत जाऊ लागला की बालवाडी ते अकरावी-बारावी पर्यंत हाफ पँट घालत असे. मुलगा शर्ट व हाफ पँट तर मुली फ्रॉक नाही तर परकर-पोलके. मुलींच्या पंजाबी ड्रेसने तेंव्हा पंजाब सोडून नुकतेच महाराष्ट्रात पाऊल टाकले होते तो हा काळ. तेंव्हा गावात बोटावर मोजता येतील इतकेच धनिक असत. बाकी सर्व मध्यम वर्गीय आणि गरीब. अप्पर मिडल क्लास वगैरे काही भानगड नव्हती. एखादीच बुलेट दिसे. काही एजदि आणि काही राजदूत , काही लुना तर दोन-चार चारचाक्या. बाकी सर्व सायकल. घरी कुणीतरी एकच कमावता त्यामुळे पगार झाला की दैनंदिन गरजा भागवता–भागवता महिना अखेर कधी येत असे कळायचे नाही. कुणी काही मागीतले तर पुन्हा पगारापर्यंत वाट पहावी लागे. पण तरीही तक्रारी कमी आणि आनंद जास्त. थोड्यात गोडी अशीच सर्वांची विचारधारा.
“साई इतना दिजीये ज्यामे कुटुंब समाय, मै भी भुका ना रहू , साधू न भुका जाये”
अशा कबीराच्या वृत्तीने सर्व गुण्या गोविंदाने राहात. “एक नूर आदमी आणि दस नूर कपडा” अशी आतासारखी वेळ तेंव्हा नव्हती. दसरा, दिवाळी नवीन कपडे घेतले, तेही थोडे वाढत्या अंगाचे की वर्षभर घोर नाही. मुलांनाही तसेच सांगीतले जात असे त्यामुळे मुलेही वर्षभर कपडे मागत नसत. मुलींना बरेचदा आईच्या साडीचा ड्रेस शिवून मिळत असे. मुलगा थोडा मोठा झाला व त्याने जर का फुल पँटसाठी हट्ट धरला तर त्याच्या हट्टापाई त्याला फुल पँट मिळत असे. परंतू कोणती? तर ती बापाच्या जुन्या पँटची नवीन केलेली फुल पँट. ही असायची प्रत्येक मुलाची पहिली फुल पँट. जुन्या पँटला दुरुस्त करून ही तयार केलेली असल्याने “अल्टर पँट” असे म्हणत. आता अल्टर म्हणजे रिपेअर किंवा दुरुस्त हे त्या वयात काही समजत नसे. आई बापाने अल्टर पँट करून देऊ म्हटले की फुल पँट मिळण्याच्या खुशीत अल्टर काय भानगड आहे?, त्याचा काय अर्थ आहे ? या रिकाम्या गोष्टी कोण करणार. फुल पँट मिळते आहे ना मग मुले त्यातच खुश. अल्टर केलेली ही फुल पँट टेलरने कितीही चांगली करण्याचा प्रयत्न केला तरी थोडी वेगळीच दिसत असे शिवाय बापाची फॅशन जुनी असल्याने ही ओल्ड फॅशन असे. नवीन फुल पँटपेक्षा हिचा “लुक” थोडा वेगळाच दिसे. इतर हाफ पँटधारी मुले विचारत अरे ! ही कशी फुल पँट रे तुझी ?” त्याला अल्टर पँट आहे सांगीतले की अर्थ वगैरे काही कळत नसल्याने तो ही आपला खूप काही समजले अशा आविर्भावात “हो का?” असे म्हणून गप्प राहात असे. आता तर तसा जमाना राहिला नाही पैसा चांगलाच खूळखुळु लागला आहे.काही घरी “डबल इंजिन” अर्थात पती-पत्नी दोघेही कमावते व एक किंवा दोन बच्चे. त्यामुळे जे मुलांना पाहिजे ते मिळते.याने मुलांना सुद्धा वस्तूची किंमत राहिली नाही.वस्तू टिकवून ठेवण्याची त्यांची वृत्ती राहिली नाही. जेंव्हा पाहिजे तेंव्हा कपडे व सर्व काही मिळत आहे.ते मिळू नाही असेही म्हणणे नाही.परंतू मुलांना वस्तूंची आणि पैशाची कदर राहिली नाही.आताच्या 40 च्या पुढच्या वयातील अनेकांचे असे नव्हते पिशवीचे दप्तर, कडीचा डब्बा ,सेकंड हँड सायकल वापरणा-या आणि पाणी पुरी व भेळची पार्टी हीच मोठी पार्टी समजणा-या तेंव्हाच्या मुलांना घरची परिस्थिती, वस्तू टिकवणे, पैशाची किंमत या सर्वांचे बाळकडू मिळत गेले. अशीच शिकवण तत्कालिन धनिक मुलांना सुद्धा असे. त्यामुळेच साडीचा ड्रेस घालणा-या मुलींना आणि अल्टर केलेली पँट घालणा-या या तत्कालीन मुलांना जे आहे त्यात भागवणे पूर्वीही शक्य असे आणि आजही त्यांना ते सहज शक्य होते.आई-वडील दोधेही वर्किंग असल्याने व आजी-आजोबा गावी असल्याने पाळणा घरात राहिलेल्या किंवा आयाच्या ‘देखरेखीत’ वाढलेल्या व वस्तू,कपडे थोडेही खराब झाले की मग फेक बाहेर म्हणणा-या, मोठा वेळ टीव्ही समोर व्यतीत करणा-या, मोबाईल, हॉटेलिंग, मल्टीप्लेक्स यांचे बाळकडू मिळत असलेल्या पुढील पिढीला हे जमेल की नाही सांगता येत नाही.साडीचा ड्रेस आणि अल्टर पँट सोबतच वस्तूंचा पुनर्वापर व पैशाची किमंत हे सुद्धा कालबाह्य झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा