"जुजुबे"चे दिवस आणि आठवणी
आठळ्या आणि सुर्यफुलांच्या बियांची टरफले असा कचरा सर्वच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असे परंतु आता मात्र असा कचरा जाऊन त्याची जागा पॅकड फूडच्या रॅपर्सने घेतली आहे. काय कारण असेल हे मुलांच्या तोंडाची चव बिघडण्याचे ?
हे काय नवीन जुजुबे ? असा प्रश्न ब्लॉग वाचकांना पडला असेल. तर तो आता हा लेख वाचला की उलगडेलच.
का रे तुम्ही काही बोरं, सुर्यफुलाच्या बिया खात नाही का रे ? शाळेमध्ये वाढणारा चिप्स, कुरकुरे आणि तत्सम पदार्थाच्या पाकिटांचा कचरा पाहून मी माझ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न केला. त्यावर विद्यार्थी अनुत्तरीत होते. पुर्वी शाळांमध्ये विद्यार्थी बोरे, चिंचा, आवळे, सुर्यफुलांच्या बिया असे पदार्थ खात व त्यामुळे बोरांच्या आठळ्या आणि सुर्यफुलांच्या बियांची टरफले असा कचरा सर्वच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असे परंतु आता मात्र असा कचरा जाऊन त्याची जागा पॅकड फूडच्या रॅपर्सने घेतली आहे. काय कारण असेल हे मुलांच्या तोंडाची चव बिघडण्याचे ? का त्यांना या रानमेव्या पेक्षा मॅगी, पिझ्झा, बर्गर इ. असे फास्ट फूड आवडू लागले ? असा प्रश्न मला पडला. दुसऱ्या दिवशी माझ्या परिचित रस्त्याने शाळेत जातांना नित्य परिचित अशी ठिकाणे दृष्टीस पडत होती. अनेक स्थानांमध्ये नवीन बदल झाले होते. कालच्या मुलांना विचारलेला अनुत्तरीत प्रश्न माझ्या मनात घोळत होताच. शाळेत जातांना मी लहान असताना ज्या ठिकाणी बोरं विकणारी लोक बसत ती ठिकाणे सुद्धा मला दिसली परंतु आता त्या ठिकाणी एकही बोरं विक्रेता माझ्या काही दृष्टीपथास आला नाही. सरकारच्या फुकटछाप योजनांमुळे पूर्वीचे अनेक व्यवसाय लोकांनी जवळपास सोडूनच दिले आहे. अगदी नगण्य अशा संख्येत काही विक्रेते मात्र आजही टिकून आहे. माझ्या लक्षात आले की हा रानमेवा विकणारे लोकच जर नसतील तर मुले असा रानमेवा घेणार तरी कुठून ? आम्ही शाळेत असतांना प्रत्येक शाळेच्या बाहेर रानमेवा, विकणारे गुळपट्टी आदी घरी बनवलेली पदार्थ विकणारे लोक असत. आता मात्र जास्तीत जास्त प्रमाणात पॅकड फूड विकणारेच शाळा परिसरात विक्रीला आलेले दिसतात. महाविद्यालयात असतांना आमच्या महाविद्यालयाच्या मागे कित्येक अशी बोरांची झाडे होती. आम्ही त्यांचा खूप आस्वाद घेत असू. कुणाला कच्ची बोरे आवडत तर कुणाला पिकलेली, कुणाला चण बोरं (एकदम बारीक आणि लाल बोरं ) आवडत. काहींना शेंबडी बोरे आवडत असत. ज्या बोरांमध्ये द्रवरूप असा मगस असतो अशा बोरांना कुणीतरी, कधीतरी शेंबडे बोर असे नांव पाडले असावे. या बोरांच्या बिया मग काही व्रात्य पोरे शाळा, महाविद्यालयाच्या भिंतीवर फेकून त्या भिंतीला चिटकवत असत. आता बोरांच्या ऋतूत बोरे काही विकायला येत नाही. गावाच्या बाहेर लदबदलेल्या बोरीच्या झाडांभोवती पोरांची गर्दी दिसत नाही. असा पण काय हा बदल व्हावा ? का असा बदल व्हावा ? मी शाळेत पोहोचलो, शाळा सुटल्यावर घरी जातांना गावातून गाडी घेतली आणि कोण जाणे कसा एक व्यक्ती बोरं घेऊन बसलेला मला दिसला... "लॉ ऑफ ॲट्रक्शन" का कशामुळे तो तिथे आला असावा असा प्रश्न मला पडला. मी आनंदाने त्याच्याकडे गाडी घेतली....माझ्या अचानक गाडी वळवल्याने एका व्यक्तीला अडचण सुद्धा झाली. मी मानेनेच त्याला माफीचा इशारा केला त्यानेही तो उदार मनाने स्वीकारला. बोरं विक्रेत्याकडून बोरे घेतली...पुर्वी दिसणारी मापे आता मात्र नव्हती... बोरं विक्रेत्याची चौकशी केली. त्यांचे नांव रमेश बोदडे असे होते. "मी अनेक रानभाज्या व फळे आणतो सर" त्यांच्या या उद्गारावर "हो तुमच्याकडून मी अनेकदा भाज्या इ घेतले आहे" असे मी म्हटल्यावर त्यांनी ओळखले. त्याच्याकडे नागपुरी बोरे होती. आपोआप माझा हात खिशात गेला आणि मी मोबाईलवर त्यांचा फोटो घेतला.
बालपणीच्या जुन्या बोरं विक्रेत्याच्याच जागी म्हणजे एकबोटे चौक, संत पाचलेगांवकर महाराज मार्ग खामगांव या ठिकाणी हा नवीन बोरं विक्रेता मला दिसला होता. इतर जुन्या बोरं विक्रेत्यांच्या जागा जशा नॅशनल हायस्कूल, सहा नंबर शाळा, अलका लॉज समोरील जागा या जागा मात्र हल्ली बोरांच्या दिवसात रिक्तच असतात. गतवर्षी जिल्हा परिषद शाळेसमोर सुद्धा एक बोरं विक्रेता दिसला होता त्यावेळी मी त्याची चित्रफित बनवली होती. घरी जातांना माझ्या मनात बोरांच्या अनेक स्मृती जागृत झाल्या होत्या. माझे वडील फळ फळावळांचे चाहते, त्यामुळे ते आम्हाला विविध प्रकारची फळे खाऊ घालत, बोरं पण खूप आणत. माझे मामा जळगांवला राहत ते आमच्यासाठी मेहरुणची बोरे आणत. मेहरूणची बोरे गोड म्हणजे गोडच असत. नागपुरी बोरं असतात गोड पण किडके जास्त असतात. हल्ली नवीन निघालेली ॲपल बोरं ज्यांनी गावरान बोरं चाखली आहे त्यांना आवडत नाही. आयुर्वेदात सर्वच फळांचे जसे महत्व सांगितले आहे तसेच बदर अर्थात बोर. बोराचे सुद्धा पित्त, वात नाशक, शक्तीवर्धक, उष्णता रोधक म्हणून महत्व सांगितले आहे. बोरकुट हा एक चांगला पदार्थ सुद्धा आता दुर्मिळ झाला आहे. मला दिसलेल्या त्या विक्रेत्याकडून मुलांसाठी थोडी बोरे घेऊन घरी गेलो. बोरांच्या दिवसात अशा बोरांबाबतच्या स्मृती ताज्या झाल्या. बोरांना इंग्रजीत jujube असा हा शब्द आहे. जुजुबे हा शब्द डेट्स म्हणजेच पेंड खजूर साठी सुद्धा काही प्रदेशात वापरला जातो. बोरे, बोरकुट असा हा रानमेवा बाजारात पुन्हा जोरदार उपलब्ध व्हावा सर्वांनी तो खावा आणि आपल्या बालगोपालांना सुद्धा त्याची गोडी लावावी असे मला वाटले.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो मधल्या सुटीत एक विद्यार्थी माझ्या जवळ आला आणि सर तुमच्यासाठी एक गंमत आणली म्हणून एक पुडके माझ्यापुढे ठेवले. मी उत्साहाने ते उघडले त्यात बोरं होती...मी त्याच्याकडे कौतुकाने, आनंदाने बघत राहिलो. या मुलांना अशीच अस्सल पदार्थांची गोडी वाटत राहावी असे माझ्या मनात आले मी त्याने दिलेल्या बोरांतील चार - पाच बोरे उचलून उरलेली बोरे इतर विद्यार्थ्यांना वाटण्यास सांगितली.

.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा