...व्यास विशाल बुद्धे
आज आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हा
दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिन मानला जातो व आज त्यांचे आज पूजन केले जाते. या पौर्णिमेस व्यास
पौर्णिमा सुद्धा म्हटले जाते.हा दिवस हिंदू , बौद्ध, जैन तसेच शीख हे सर्वच लोक साजरा करत असतात. नेपाळ मध्ये सुद्धा या दिवसाला
मोठे महत्व दिले आहे. गुरुपौर्णिमेला नेपाळ मध्ये राष्ट्रीय सुट्टी दिली जाते. भारतात अनंत काळापासून गुरूंना
मोठे आदराचे स्थान आहे. गुरु म्हणजे ते की जे अध्यात्मिक किंवा क्रमिक विषयांचे
ज्ञानदान आपल्या शिष्यांना विना मोबदला किंवा उपजीविकेस पुरेल इतका
अल्प मोबदला घेऊन करीत असत. ज्ञानदानाचा मोबदला घेणे म्हणजे पाप समजले जात
असे. म्हणून प्राचीन काळातील गुरु, पूर्वीचे शिक्षक हे सर्वसामान्य जीवन व्यतीत करीत असत. आजतर
शिक्षणक्षेत्र म्हणजे “प्रॉफीट मेकिंग बिझनेस” झाले आहे. सद्यस्थितीत तर अत्यल्प मोबदला घेऊन शिकवणे, विना मोबदला शिकवणे परीसासारखे दुर्मिळ झाली आहे.“जास्त फी म्हणजे जास्त चांगले शिक्षण” अशी पालकांची सुद्धा भावना झाली आहे.सांदिपनी-कृष्ण,द्रोणाचार्य-अर्जुन,धौम्य-आरुणी,रामकृष्ण-विवेकानंद, समर्थ रामदास-शिवाजी महाराज अशी फार मोठी गुरु शिष्य परंपरा लाभलेल्या आपल्या देशात
दुर्दैवाने आता असे दाखले क्वचितच आढळतात. एखादाच सचिन तेंडूलकर रमाकांत
आचरेकरांसारख्या आपल्या गुरुंबद्दल जाहीरपणे आदर,निष्ठा,प्रेम,आपुलकी अशा भावना व्यक्त करतांना दिसतो. बरेच प्रसंगी पंतप्रधान
मोदीं सुद्धा लक्ष्मणराव इनामदार उपाख्य वकील
या त्यांच्या गुरुंबद्दल आपुलकी, प्रेम, सन्मान व्यक्त करतांना दिसून येतात. वरील सर्व गुरुंनी केवळ
त्यांच्या शिष्यांना मोबदला घेऊन शिकवले असे नाही तर त्यांना जीवनाचा मार्ग दाखवला,
त्यांच्या सुख-दुखा:त सुद्धा सहभागी झाले, त्यांची , त्यांच्या भविष्याची, त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाहीली. दुर्दैवाने असे आता आढळत नाही. बदललेल्या शिक्षण पद्धतीत, शिक्षण क्षेत्रात जुन्या संकल्पनांना सुद्धा
स्थान नाही. ज्या व्यासांचे स्मरण आजच्या दिनी केले जाते त्या व्यासांची महत्ता , थोरपण , ज्ञान आज नाकारले जाते. बरेच कार्यक्रम प्रसंगी महानुभाव
विराजमान होतात त्या स्थानाला “व्यासपीठ” म्हणण्याऐवजी आजकाल मंचक असा शब्द वापरला जातो. व्यासपीठाला इतर कोणताही शब्द का वापराना परंतू निदान मंच तर म्हणा ! इंग्रजी अतिशय
बोकाळल्यामुळे मंचक या शब्दाचा अर्थ पलंग
असा होतो हे सुद्धा ते ध्यानात घेत नाही. तुम्ही एकवेळ व्यासपीठ नका म्हणू परंतू मंचक न म्हणता
निदान मंच तरी म्हणा. मंचक शब्दाने किती चुकीचा अर्थ होतो हे सुज्ञांच्या लक्षात
आलेच असेल. व्यासपीठ शब्दप्रयोग न कररणा-यांचा कदाचित व्यासांप्रती काही विशिष्ट पूर्वग्रहदूषित दृष्टीकोण असावा.कदाचित त्यात जात-पात येत असावी. परंतू त्यांनी हे जाणावे की महर्षी व्यास हे काही कुणी
उच्चवर्णीय नव्हते महर्षी पाराशर व एका मासेमा-याची कन्या मत्स्यगंधा अर्थात
सत्यवती हे व्यासांचे माता-पिता. म्हणजे व्यास हे वर्णसंकरातून जन्म झालेले होते.
त्यांची माता ही सर्वसामान्य व तत्कालीन निम्न जातीतील स्त्री होती. तरीही ते
ज्ञानी, वेद
पारंगत होते म्हणूनच त्यांना वेदव्यास सुद्धा म्हणतात. या भारतात नेहमीच ज्ञानी
लोकांना पूजनीय मानले जात आले आहे. त्यामुळे व्यास मुनींच्या नावाचा उगीचच तिटकारा
न करता त्यांचा इत्यंभूत अभ्यास करावा , त्यांच्या ज्ञानाचा सन्मान करावा, आपला संकुचित दुष्टीकोन बाजूस सारावा व “ओम नामोस्तुते व्यास विशाल बुद्धे” म्हणून व्यासांसारखे विशाल बुद्धीचे होण्याचा संकल्प आजच्या
गुरुपौर्णिमेच्या दिनी करावा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा