"आनंद मेला" आणि पाऊस
जरी या
भारतात अनेक विचारवंत, संशोधक, गार्गी, मैत्रेयी सारख्या विदुषी, चरक, सुश्रुत सारखे
शल्यचिकित्सक, वैद्यकीय निपुण होऊन गेले असले तरी पाश्चिमात्य देश पूर्वी भारताला
साप, गारुडी तसेच साधू व फकीरांचा देश म्हणून ओळखत. कालपरत्वे भारताने प्रगती
केली. विज्ञान, तंत्रज्ञानाने भारत परिपूर्ण झाला. परदेशी उपग्रह येथून प्रक्षेपित
होऊ लागले, महासंगणक निर्माण झाला, अनेक संगणक अभियंते विदेशात गेले, देशात निर्मिती
वाढली. हे सारे होऊनही अनेक जुन्या संकल्पना, चालीरीती प्रसंगी अंधश्रद्धा यांचा
पगडा येथील जनमानसावर मोठ्या प्रमाणात कायम असल्याचे अधून-मधून प्रकट होतांनाची
प्रचीती येत असते. अशीची एक समजूत आहे पाऊस थांबवण्याची किंवा वळवण्याची. शहरात
आनंद मेला अर्थात लहान मुलांसाठी आकाश पाळणा, मेरी गो राउंड व तत्सम खेळणे, मौत का
कुंवा सारख्या कसरतींचे खेळ व विविध दुकाने असलेला एक फिरता उपक्रम आला की गावात
पाऊस पडत नाही, ते लोक पाऊस थांबवतात अशी चर्चा ज्या-ज्या शहरांत पावसाळ्यात हा
आनंद मेला जातो त्या-त्या शहरांत होतांना दिसून येते. काही शहरांत तर याच कारणामुळे
आनंद मेल्यास पालिकेने महसूल, मनोरंजन कर मिळत असूनही परवानगी नाकारल्याचे ऐकिवात
आहे. परंतू नैसर्गिक शक्तींना खरेच कोणी आटोक्यात आणू शकतो का? व आणू शकत असेल तर
मग विदर्भात उन्हाळ्यात प्रचंड तापमान असते तर अशी शक्ती असणारे उन का नाही वळवू
शकत? किंवा तापमान का कमी करून नाही दाखवू शकत? असा प्रश्न पडतो. पाऊस वळवला जाऊ
शकतो या बाजूने बोलाणारे नेहमी मेंढपाळ लोकांचे उदाहरण देतांना दिसतात. हे लोक
मेंढीच्या अंगावर गार किंवा पाऊस पडू देत नाही म्हणे ! परंतू अनेकवेळा गारपिटीत
शेळ्या मेंढ्या दगावल्याचे व त्यांना नुकसान सुद्धा भरपाई भेटल्याचे दाखले आहेत. नैसर्गिक
शक्तींना रोखण्याची, त्यांना वळते करण्याची शक्ती खरोखरच असेल तर हे लोक या शक्तीचा
उपयोग नक्षलवादी, दहशतवादी, समाजकंटकांच्या विरोधात का नाही करत? गेल्या काही
वर्षांपासून आमच्या खामगांव शहरांत हा आनंद मेला पावसाळ्याच्या ऐन सुरुवातीला दाखल
होतो. तो दाखल झाला की व पाऊस थांबतो त्यामुळे ते लोकच पाऊस वळवतात अशा चर्चा होत असतात. हे
खरे आहे की नाही म्हणून विविध लोकांची मते घेण्याचे ठरवले व त्या अनुषंगाने अनेक शिक्षक, सुशिक्षित, जेष्ठ
नागरिक यांच्याशी चर्चा केली असता संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. कुणी पाऊस वळवणे
ही एक खुळचट संकल्पना आहे, थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे असे म्हटले. एक परदेश गमन करून
आलेले जेष्ठ नागरिक म्हणाले की विदेशात सुद्धा असे उपक्रम असतात परंतू तेथे पाऊस
वळवण्याबाबत कधी काही ऐकले नाही. एकाने पाऊस पडण्यासाठी झाडे लावावीत, पर्यावरण जतन
करावे असे मत व्यक्त केले, कुणी दोन्ही बाजूंकडून बोलले. एका जेष्ठ नागरिकाने अशा
शक्ती आहेत परंतू त्यांचा उपयोग करणा-याचा भविष्यकाळ कठीण असतो, त्याला विविध यातना
होतात, शारीरिक भोग भोगावे लागतात, त्याचे मरण सुखाने होत नाही असे कथन केले. एकाने याच
समजुतीमुळे आनंद मेल्याला आता गर्दी कमी असते हे सांगितले. अशा त-हेची नाना
प्रकारची मते समोर आली. अनेक पौराणिक कथांतून नैसर्गिक शक्तींना आव्हान देण्याच्या
कथा, दंतकथा सांगितलेल्या आहेत. त्यांना जर खरे मानले तर त्या काळातील लोकांमध्ये
सत्व होते तसे सत्व सांप्रत काळात शिल्लक उरले आहे का, की जेणे करून नैसर्गिक
घटनांवर नियंत्रण मिळवले जाईल? तर यांस नकारच मिळेल. तरीही जर पाऊस वळवणारे लोक
आहेत तर मग पाऊस पाडणारे सुद्धा निश्चितच असतील. मग हे लोक पाऊस का नाही पाडत? असाही
प्रश्न पडतो. खुळचट कल्पना सोडून पावसासाठी नागरीकांनी परिसरात झाडे लावण्याचा व
जगवण्याचा निश्चय करावा, परिसरातील टेकड्या हिरव्यागार कराव्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा