पुतळ्याप्रमाणेच
राष्ट्राभिमान सुद्धा उंचावला
आज गुजराथ राज्यात , केवडीया गांवात सरदार वल्लभभाई जवाहरभाई
पटेल यांच्या “स्टॅच्यू ऑफ युनिटी” अर्थात एकतेचे प्रतिक असलेल्या भव्य दिव्य पुतळ्याचे
मा.पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशातील
छोटी-मोठी संस्थाने भारतात विलीनीकरण करून घेण्याचे महत्कार्य सरदार पटेलांनी केले
आहे. हैदराबादच्या नबाबाच्या रजाकारांनी अत्याचार, अन्यायाचा गदारोळ माजविला
असतांना सरदार पटेल यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळेच
हैद्राबाद, जुनागढ इ. अनेक संस्थाने भारतात विलीन झाली. पटेलांच्या देशहिताच्या निर्णय
क्षमतेमुळेच त्यांना लोहपुरूष ही उपाधी सुद्धा मिळाली. सरदार पटेल स्वतंत्रता
लढ्यात होते, गांधी नेहरूं प्रमाणे ते सुद्धा बॅरिस्टर होते. पंतप्रधान बनण्यास सक्षम,
योग्य व अनेकांची सहमती असलेले नेते होते.परंतू दुर्दैवाने तसे झाले नाही.
स्वातंत्र्योत्तर काळात सरदार पटेल यांचे कार्य म्हणावे तेवढे जनतेपर्यंत पोहोचलेच
नाही. सरदार पटेल जयंती , पुण्यतिथी कधी असते हे सुद्धा अनेकांना आजरोजी पावेतो
महित नव्हते. इतकेच काय तर काही वर्षांपूर्वी गुजराथ राज्यातच महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांना “सरदार पटेल कोण होते ?” असा प्रश्न एका वृत्त वाहिनीने विचारला
असता अनेकांना त्याचे उत्तर सुद्धा देता आले नव्हते. संस्थानांचे विलीनीकरण,
तत्कालीन सरकारचे पाठबळ नसतांनाही सोरटी सोमनाथ मंदिराचा केलेला जीर्णोद्धार अशी
कार्ये पटेलांनी केली आणि आपली लोहपुरूष ही उपाधी सार्थ केली. अशा महापुरुषाच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण होत आहे. या
निमित्ताने देशातील जनतेला पटेल यांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी,त्यांचे देशप्रेम,त्याग
अवगत होणार आहे, प्रेरणादायी ठरणार आहे. सरदारांनी संस्थाने विलीन करून देशात एकता
वृद्धिंगत केली परंतू आज प्रांतवाद उपस्थित करणा-या काही लोकांनी हे जाणून घ्यावे की
लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य फंडात मोठी रक्कम पटेलांनी गुजराथ राज्यातून उभारली होती.
तसेच पटेलांचा हा सर्वात उंच पुतळ्याचे शिल्पकार श्रीराम कृष्ण जोशी यांचे शिष्य 93
वर्षाचे मूर्तिकार राम सुतार व त्यांचे पुत्र अनिल सुतार हे मुळचे महाराष्ट्रातील धुळे
शहरानजीकचे आहेत. त्यांनी या पुतळा निर्मितीसाठी प्रंचड मेहनत केली आहे. पुतळा अनावरण
प्रसंगी उभारण्यात आलेल्या सेटचे निर्माते नितीन देसाई हे सुद्धा मुंबईचेच.
तेंव्हा सद्यस्थितीत मतांच्या समीकरणासाठी प्रांतवादाचे मुद्दे, वक्तव्ये करणा-या नेत्यांनी
या देशाची एकता, अखंडता यासाठी झटलेल्या पटेलांचे सदोदित स्मरण ठेवावे. जगातील सर्वात
उंच असलेल्या सरदार पटेलांच्या या स्मारकामुळे जगात देशाची आणखी एक ओळख निर्माण झाली
आहे. या स्मारक ठिकाणी , संग्रहालय , पुतळ्यात लिफ्ट , प्रदर्शन हॉल, फुलांची घाटी
हे सर्व असल्याने पर्यटनास मोठी चालना मिळणार आहे तसेच सरदार पटेलांनी गाठलेल्या मोठया
उंचीमुळे निर्माण झालेला त्यांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा भारतातील नागरीकांचा राष्ट्राभिमान
नक्कीच उंचावणार ठरेल.