पात्र प्रक्षालनाने पाप
प्रक्षालने होतील का ?
परवा महात्मा गांधी व लाल
बहादूर शास्त्री या दोन साधी जीवनशैली अंगिकारलेल्या महान नेत्यांची जयंती देशाने
साजरी केली. महात्मा गांधींची ही 150 वी जयंती होती.
“वैष्णव जण तो तेणे कहिये
जे पीड परायी जाणे रे”
नरसी मेहता रचीत या आपल्या आवडत्या भजनानुसार
गांधीजीनी पर दु:ख़ जाणून साधी राहणी अंगीकारली. उन,वारा,थंडी,पाऊस असे बारा महिने
तेरा त्रिकाळ गांधीजी केवळ पंचा नेसूनच आजन्म वावरले. आश्रमात साफ सफाई, बकरीचे
दुध, साधे जेवण, साफ सफाई अशी जीवनशैली ठेवत बापू साधेपणा अक्षरश: जगले. स्वतंत्रतापूर्व
गांधीजी व कॉंग्रेस यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान कुणीही नाकारू शकतच नाही.
स्वातंत्र्योत्तर काळात मात्र गांधीजींचा साधेपणा,त्यांची शिकवण त्यांनीच पुढे
आणलेले नेते विसरले.साधेपणा जाऊन झकपक राहणी सुरु झाली. कपडे धुण्यासाठी विशिष्ट
ठिकाण,पिण्याचे पाणी विशिष्ट ठिकाणचे, उंची वस्त्रे ,उंची गाड्या मिरवणे सुरु झाले
आणि साधेपणा दिसू लागला तो केवळ गांधी जयंती व पुण्यतिथी याच दिवशी. अत्यंत
साधेपणाचा आव आणत आश्रमात जाणे,समाधीस्थळी जाणे तेथील साधेपणाची छायाचित्रे प्रसारित
करणे, याने साधी राहणी असल्याचा कितीही आव आणला तरी मुळात साधेपणा असणारा व्यक्ती
व आव आणून साधेपणा दाखवणारा व्यक्ती यातील भेद चाणाक्ष जनता जाणत असते.सद्यस्थितीतील
सर्वच नेत्यांना गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर साध्या राहणीने
जनतेच्या जवळ राहण्याच्या संकल्प करणे जरुरी आहे. नाहीतर आपली प्रतीक्षा करीत
असलेल्या, आपल्याला अभिवादन करण्यास आलेल्या जनतेला गाडीचा काच खाली करण्याचे
सौजन्य सुद्धा आता नेते दाखवत नाही. ऐन निवडणूकीच्या काळात झाडू हाती घेणे, भोजनपात्रे
प्रक्षालित करणे असला साधेपणा कितीही जरी दाखवला तरी जनतेला या सर्व गोष्टींना
निवडणूकीची झालर असल्याचे लक्षात आल्यावाचून राहत नाही. निवडणूकीच्या काळात परवा
कॉंग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या मातोश्री व इतर नेते भोजनपात्रे प्रक्षालित करीत
असतांनाची छायाचित्रे झळकली. परंतू इतक्या वर्षात केलेल्या अनेक दुस्कृत्यांची,घोटाळ्यांची,भ्रष्टाचाराची
यादी केली तर फार मोठी यादी तयार होईल. स्वातंत्र्यानंतर लगेच झालेला संरक्षण
खात्यातील जीप खरेदी घोटाळा,नगरवाला प्रकरण, बोफोर्स ,हर्षद मेहता,ऑगष्टा वेस्टलँड,
अगदी आता-आताचे 2 जी स्पेक्ट्रम,कोळसा हे घोटाळे, गांधी हत्येनंतर केलेल्या हत्या,
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर केलेल्या दंगली,निरुपयोगी जमीन म्हणून चीनला आपली
जमीन देऊन टाकणे,वोट बँकेसाठी जाती धर्मात फुट पाडणे अशी कितीतरी पापे या देशातील
जनतेने पाहिली आहेत. गंगेत स्नान केले तर पाप प्रक्षालन होते असे मानले जाते परंतू
या पूर्व उल्लेखित देशाचे अहित करणा-या पापांचे
तर प्रक्षालन गंगाही करू शकणार नाही. महात्मा गांधी आजीवन साधे राहिले सर्वस्थितीत
साधे राहिले. त्यांच्या साधेपणाचा त्यांनी कधी गवगवा केला नाही. साधेपणाचा दिखावा करणा-या
परवाच्या भोजनपात्रे प्रक्षालित करण्याच्या छायाचित्रांनी मात्र अनेक घोटाळे,दंगली,
त्या दंगलीतून निरपराधांचे शिरकाण,भ्रष्टाचार ही असली पापे प्रक्षालित होतील का ?
असा प्रश्न मात्र जनतेला नक्कीच पडला असावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा