भेट किमयागाराची
नव्वदच्या दशकाची अखेर असतांना नुकतेच संगणक प्रशिक्षण
घेणे सुरू केले होते. घरी दै. लोकसत्ता होता. त्यात तंत्रज्ञान, संगणक यांबाबतचे एक माहीतीपूर्ण असे सदर
प्रकाशित होत असे. हे सदर अच्युत गोडबोले
हे लेखक लिहीत असत. त्यांच्या लेखनाने मोठा प्रभाव टाकला. त्यांच्या सहज, सोप्या लेखन शैलीने तंत्रज्ञान, संगणक या बाबी
स्पष्ट करण्यानेच कदाचित संगणक व
तंत्रज्ञाना बाबत अधिकच आकृष्टता निर्माण
झाली. त्यामुळे अच्युत गोडबोले यांचे लेख वाचत गेलो. त्यातील काही लेखांची कात्रणे
आजही आहेत. त्यानंतर त्यांचे “बोर्डरूम” पुस्तक वाचले. कार्पोरेट जगत, कंपन्यांच्या जनमकथा, उद्योजकांचा झपाटलेपणा या
सर्व कथा वाचकांना मोठ्या प्रेरणादायी ठरल्या व आजही आहेत. पुढे गोडबोले यांचे
अनेक लेख वाचनात आले. त्यांची अधिक माहीतीही मिळत गेली.त्यांच्या लेखणीने व
ज्ञानाने भारावून टाकले. गोडबोलेंची लिहिलेली पुस्तके चीन मधील विद्यार्थ्यांना क्रमिक
अभ्यासासाठी आहेत अशीही माहीती मिळाली. संगणक,संगणकाचा
इतिहास,संगीत,इतिहास अशा कितीतरी
विषयांवर प्रभुत्व निर्माण करणारी त्यांची विलक्षण बुद्धिमत्तेने सर्व वाचक,ज्ञानोपासकांना प्रभावित करून सोडणारी आहे. बुलडाणा जिल्हा वासीयांचे
भाग्य थोर की दि 21 ला अच्युत गोडबोले हे एका व्याख्यानाच्या निमित्ताने बुलडाणा
येथे आले होते. तेथील व्याख्यानात त्यांनी फेसबुक,व्हॉटस र्अॅप, नवीन “युज अँड थ्रो“ विचारसरणीची पिढी, वाढते
मानसिक आजार अशा आशयाचे त्यांच्या व्याख्यानाचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून होते न
होते तोच भ्रमणध्वनी खणाणला. तो घेतला तर जेष्ठ बंधू विचारते झाले “अरे मुक्तेश्वर
कुळकर्णी यांचेकडे अच्युत गोडबोले येणार आहे, तू येतो का
भेटीला?” ज्यांचे लेख, पुस्तके वाचली
अशा 1972 मध्ये केमिकल इंजिनियर ही पदवी प्राप्त केलेल्या थोर लेखकाला तसेच पीसीस, एल अॅंड टी इ कंपन्यांत मोठी पदे विभूषित केलेल्या तसेच त्या
कंपन्यांच्या उभारी मध्ये मोठा वाटा असलेल्या अच्युत गोडबोलेंना आपल्याच लहान
गावात आयतीच चालून आलेली संधी सोडणारा अभागी कुणी विरळाच असेल. त्यामुळे बंधूंच्या
प्रश्नाला त्वरीत होकार भरला व मुक्तेश्वर कुळकर्णी यांचेकडे वेळेत उपस्थित झालो.
दिलेल्या वेळेवर लाल कुर्ता व पायघोळ पायजामा परीधान केलेल्या अनेक प्रथितयश
पुरस्कार प्राप्त व किमयागार,संगणक युग,बोर्डरूम, नादवेध,गणिती,जिनीयस या पुस्तकांचे लेखक अच्युत गोडबोलेंचे आगमन झाले. त्यांना
भेटण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रभूणे सर ,
तेथील व्याख्याते मंत्री सर, नॅशनल हायस्कूलच्या प्राचार्य
प्रविणा शहा मॅडम, पोलिस अधिकारी वाकडे मॅडम, देशोन्न्तीचे संपादक राजेश राजोरे, संस्कृती
संवर्धन प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर अनेक अभ्यासू व गोडबोले यांच्या पुस्तकांचे
वाचक आवर्जून उपस्थित होते.याप्रसंगी गोडबोले यांच्याशी ग्लोबल वॉर्मिंग,सोशल मिडीयाचा होणारा चुकीचा व अतिरेकी वापर,वाचन,पुस्तके, यांबाबत तसेच “बखर संगणकाची” व चंगळवाद या
विषयावरचे पुस्तक अशा आगामी पुस्तकांबाबत चर्चा झाली. गोडबोले यांची मृदूभाषा,साधी राहणी,विंनम्रता उपस्थितांना खूप भावली व अशा
या ‘किमयागार’ लेखकाच्या भेटीच्या
स्मृती घेऊन त्यांचा निरोप घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा