भव्य प्रशासकीय इमारत परंतू वृक्षांचा अभाव
खामगांव शहराच्या वैभवात भर
टाकणारी प्रशासकीय इमारत दोन वर्षांपूर्वी दिमाखात उभी राहिली. आता मागील महिन्यात
या इमारती समोर शहरात कुठेही नसेल असा छान, यथोचित प्रमाणात सर्व सामुग्री असलेला
गुळगुळीत रस्ता केला, रस्त्याच्या दुतर्फा सध्या चलन असलेले सिमेंटचे ब्लॉक
बसवण्यात आले. या सर्वांमुळे हा परिसर सुंदर दिसत आहे. परंतू या परिसरात अभाव दिसत
आहे तो म्हणजे वृक्षांचा. प्रशासकीय इमारत,शेजारीच जीएसटी कार्यालय,दुय्यम निबंधक
कार्यालय,महात्मा गांधी सभागृह,नझूल कार्यालय असा हा परिसर असल्याने येथे मोठ्या
प्रमाणात नागरिकांचे येणे जाणे असते. आपल्या विविध कामांच्या निमित्ताने येथे
खेड्या पाड्यातून अबालवृद्ध नागरिक येत असतात. दुचाकी व इतर वाहनांची संख्या
सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. या सर्वांना ब-याच वेळ अधिकारी ,कर्मचारी यांची
प्रतीक्षा सुद्धा करावी लागते. कारण बहुतांश वेळा कर्मचारी त्यांच्या आवडत्या
कामासाठी म्हणजे चहा पिण्यासाठी म्हणून बाहेर गेलेले असतात. ज्यांच्याशी काम असते
ते अधिकारी बरेच वेळा उपलब्ध नसतात. अशा प्रसंगी अभ्यागतांना प्रतीक्षा करावी
लागते. आपल्याकडे येणा-यांना बसण्यासाठी सावलीचे ठिकाण असावे असे सुद्धा प्रशासनास
वाटत नाही का? जीएसटी कार्यालयाच्या कुंपणाच्या भिंतीच्या बाजूने सिमेंट ब्लॉक
लावले आहे तिथे तर वृक्ष लावण्यासाठी विपुल प्रमाणात जागा आहे परंतू कुठेही कुण्या
अधिका-यास आपला हा कार्यालयीन परिसर हिरवागार असावा , येथे सावली असावी असे काहीही
वाटले नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. “सुंदर माझा निवारा , दारी वृक्षांचा पहारा”
असा एक सुविचार आहे. कार्यालय म्हणजे निवारा जरी नसला तरी शेकडो कर्मचा-यांचा
निवारा याच कार्यालयांमुळेच सुरक्षित असतो किंवा निवारा उभा राहात असतो. आजकाल,
कार्यालयांच्या इमारती मोठ्या सुंदर बनत आहे , या कार्यालयांच्या सभोवती वृक्ष लावण्याच्या
, आहेत त्या वृक्षांचे संगोपन करण्याच्या बाबतीत मात्र आजकाल कर्मचारी व अधिकारी
गण उदासीन बनत चालले आहे. या निमित्ताने आठवण येते ती सुप्रसिद्ध साहित्यिक व माजी
डाक अधिक्षक दिवंगत श्री सदानंद सिनगारे यांची. सिनगारे काका जेंव्हा बुलढाणा येथे
डाक अधिक्षक म्हणून कार्यरत होते तेंव्हा त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा व खामगांव पोष्ट
ऑफिस परिसरात त्यांनी सुंदर बाग विकसित केली होती तसेच अनेक वृक्ष सुद्धा लावले
होते. प्रशासकीय इमारत म्हणजे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे कार्यालय म्हणजे
साक्षात शासनच. एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्याचे म्हणते , करोडो वृक्ष लावू अशा
प्रकारच्या घोषणा दिल्या जातात. परंतू जेथून प्रशासन चालवले जाते त्या प्रशासकीय
इमारतीच्याच भोवती वृक्ष लावण्यासाठी कुठेही जागा सोडल्याचे तूर्तास तरी दिसत
नाही. पावसाळा जवळ आला आहे जनुना तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ निघत आहे. प्रशासनाने
कधी म्हटले तर एक काय दहा गाड्या गाळाची माती येथे उपलब्ध होऊ शकते परंतू यासाठी
हवे वृक्ष प्रेम, आपल्या कार्यालयात येणा-या अभ्यागतांबाबत आपुलकी त्यांच्यासाठी
सावलीची काळजी. जर या सुंदर इमारती भोवती सुनियोजित पद्धतीने वृक्ष लागवड केली तर
या परिसराची शोभा अधिकच वृद्धिंगत होईल. मेहरबान प्रशासनाने लक्ष द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा