Click "Follow" Button below To Follow this Blog

१४/१०/२०२०

Article reminds the old magzine Chandamama (Chandoba in Marathi) for kids

स्मरण “चांदोबा”चे

प्रख्यात गायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम च्या दु:खद निधनाची वार्ता रसिकांच्या मनाला चटका लावून गेली. त्याला रसिकांनी पदुमनीला अशी उपाधी दिली होती. पदुमनिला अर्थात गाणी गुणगुणणारा  चंद्र. क्षणार्धात एस पी ची गाणी , चंद्र या गोष्टी मनात आल्या. चंद्राशी संबंधीत बाबी आठवल्या. जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणजे मानवी मन. क्षणार्धात मनातील विचार बदलत असतात. एकाच क्षणी आपले मन आपल्या घरी असते तर दुस-याच क्षणी ते दुस-या गोष्टीवर केंद्रित होते, तिस-या क्षणी आणखी इतरत्र. प्रथितयश कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी या मनाचे किती समर्पक असे वर्णन त्यांच्या “मन वढाय वढाय” या कवितेतून केले आहे.

“मन पाखरू पाखरू उंच उडे आभायात किती हाकला हाकला फिर येती पिकावर”

या ओळींप्रमाणे एस. पी. बालसुब्रह्मण्यमच्या उपाधीवरून चंद्र आठवला आणि चंद्रावरून बालकांसाठी चंद्रासाठी वापरला जाणारा “चांदोबा” हा शब्द आठवला व पुढे मन गेले ते एका बाल मासिकावर. वयाच्या चाळीशीच्या पुढे गेलेल्या अनेकांना नक्कीच आठवत असणार. होय त्या “चांदोबा” या लहान मुलांसाठी असलेल्या त्याच पुस्तकाबाबतच बोलतोय. चांदोबा मासिकाच्या आठवणी मनात घोळ घालू लागल्या. बस स्टँड वरील पुस्तकाच्या दुकानावर गेलो पण चांदोबा नव्हता , इतर दुकानात चौकशी केली , वृत्तपत्रवाल्याला विचारले परंतू चांदोबा जणू अमावस्या असल्याप्रमाणे गायबच झाला होता. चांदोबाची आठवण मनात घोटाळू लागली, त्यातील आकर्षक , मनमोहक अशी चित्रे पुन्हा एकदा पहावीशी वाटू लागली. परंतू करणार काय, चांदोबा काही मिळाला नाही शेवटी इंटरनेटचा आधार घेतला, गुगल सर्च केले “चांदोबा”ची माहिती आली परंतू एखादा तहानलेला व्यक्ती पाणी मिळाल्यावर पाण्याचे भांडे कोणते आहे, कशाचे बनले आहे हे न पहाता प्रथम घटाघटा जलप्राशन करतो. त्याप्रमाणे चांदोबाची माहिती न वाचता त्याच्या images पाहू लागलो. सि. के. रविशंकर यांनी काढलेली ती रेखीव चित्रे पुनश्च एकदा पाहिल्यावर पुन्हा बाल्यावस्थेत गेल्याप्रमाणे वाटू लागले. “ए वेद, ए शलाका“ म्हणून मुलांना

हाका मारल्या त्यांना चांदोबा मधील ती आकर्षक चित्रे संगणकाच्या पडद्यावर दाखवली. त्यांना सुद्धा ती भावली.
बालपणी कुठेतरी एकदा हे “चांदोबा” पाहिले त्यावर नजर खिळली होती. मला स्पष्टपणे आठवते पुस्तकातील गोष्टी वाचण्यापुर्वी त्याची पाने उलटत गेलो कारण त्यातील चित्रेच तशी होती. मग घरी “चांदोबा” आणण्याचा हट्ट करून ते वाचणे सुरु केले. त्यातील गोष्टी जरी आठवत नसल्या तरी त्या गोष्टीतील काही पात्रांची अनोखी अशी नावे मात्र आजही स्मरणात आहेत. अजब पोशाख असलेला भल्लूक मांत्रिक , जादूगार मँड्रेक अशा प्रकारची ती नांवे असत. विक्रम-वेताळ , पौराणिक गोष्टी अशा गोष्टी असत. त्यामुळे तत्कालीन बालांना अनेक पौराणिक पात्रे माहित झाली होती. खेळ तंत्रज्ञान , विज्ञान अशा विषयांचा सुद्धा अंतर्भाव या मासिकात असे. दुर्दैवाने आजच्या बालकांना आपल्याच पौराणिक गोष्टी व पौराणिक पात्रे माहित नाहीत. आज लहान मुलांकरीता चांदोबासारखी मासिके, पुस्तके आहेत की नाही काही ठावूक नाही. परंतू काही प्रकाशित होत असली तरीही अनेक भाषांतून प्रकाशित होणा-या चांदोबा या मासिकाची सर इतर मासिकांना नक्कीच नसेल. जगताला शीतल प्रकाश देणा-या चंद्राप्रमाणे बालकांना ज्ञानाचा प्रकाश देणा-या चांदोबा या लोकप्रिय , बालप्रिय अशा मासिकाचा प्रारंभ चंदामामा (अंबुलीमामा) या नावाने दक्षिण भारतात झाला ते वर्ष 1947 होते म्हणजे नव्या भारताच्या सुरुवातीलाच हे मासिक सुरु झाले. बी नागीरेड्डी आणि चक्रपाणी या जोडीने हे मासिक सुरु केले होते. सुरुवातीला तेलगु व तमिळ भाषेतून प्रकाशित होणारे हे मासिक इंग्रजीसह 13 भाषांत प्रकाशित होऊ लागले व वाचक संख्या 2 लाखाहून अधिक होती. “चांदोबा” मराठी भाषेत 1952 पासून येऊ लागले. अत्यंत मनमोहक , वाचनीय , लोकप्रिय , बालकप्रिय असे हे मासिक बदलते तंत्रज्ञान , वाचकांची बदलती अभिरुची , दिवसागणिक घटत जाणारी वाचक संख्या व वाचनप्रियता या सर्व कारणांमुळे या चांदोबा मासिकाचा खप चंद्रासारखा कले-कले ने घटू लागला. Geodesk या कंपनीने चांदोबाला डिजिटल स्वरूप देण्याचा प्रयत्न केला , पुढे त्यांच्यावर कोर्ट प्रकरणे झाली , डिस्ने कंपनी समभाग विकत घेणार होती, Geodesk ने 2007 मध्ये सर्व अंक पोर्टल वर देण्याचा प्रयत्न केला  परंतू वर्ष 2013 पासून अनेक अडथळे आले व 13 भाषांसाहित प्रकाशित होणारा , ज्ञान प्रकाश देणारा हा चंदामामा म्हणजेच मराठीतील चांदोबा वेबसाईट व App च्या माध्यमातून कसाबसा चमकत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. चांदोबा प्रेमी https://www.chandamama.in/main.php या संकेत स्थळावर चांदोबा वाचू शकतात. चांदोबाचे अॅॅप सुद्धा आहे परंतू ते चिनी आहे. लवकरच ज्यांच्याकडे चंदामामाचे हक्क आहे ते भारतीय अॅप उपलब्ध करणार आहेत. चांदोबा वाचण्यासाठी या सुविधा तूर्तास जरी असल्या तरी अनेक मोबाईल गेम्स , डिजिटल युग , मुलांच्या बदलत्या रुची या सर्वांमध्ये हा चांदोबा कसा टिकाव धरेल हा प्रश्नच आहे ?
    योगायोग असा की हा लेख लिहिल्यानंतर चांदोबाचे चित्रकार सि. के शिवशंकर यांचे 29 सप्टेंबर रोजी निधन झाल्याचे श्री श्याम पेठकर यांच्या 14/10/2020 च्या लेखामुळे कळले. त्यामुळे वरील लेख लेखनानंतर शिवशंकर यांना या लेखाव्दारे एकप्रकारची आदरांजलीच वाहिल्यासारखे वाटले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा