Click "Follow" Button below To Follow this Blog

०३/१०/२०२०

Condition of Arjun in Mahabharat War against his own relative and Parth Pawars tweets.

भ्रमरहित “पार्थ” 
कौरव पांडवांच्या युद्धात आपल्याच स्वजनांना शत्रू सैन्यात पाहून पार्थ म्हणजेच अर्जुन भगवंतास म्हणतो ,

“सीदन्ती मम गात्राणी मुखं च परिशुष्यति | वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ||गांडीवं स्त्रंसते हस्तात्वक्चैव परिदह्यते | न च शक्नोम्यव स्थातुं भ्रमतीव च मे मन: ||अर्थात
गळली मम गात्रे नि मुखही कोरडे पडे | कांपे शरीर हे माझे , रोमांच राहती उभे ||गळे गांडीव हातूनी , त्वचाही जळते अती | शक्य ना स्थिर राहणे , भ्रमते मनही माझे ||
भगवद्गीतेतील उपरोक्त श्लोकानुसार “समोर युद्धासाठी उभ्या ठाकलेल्या आपल्याच स्वजनांना पाहुन माझी गात्रे गळून गेली आहेत, तोंडाला कोरड पडली आहे , माझे शरीर कापत आहे , अंगावर काटे आले आहेत, माझा गांडीव धनुष्य हातातून पडत आहे , माझ्या अंगात ताप आला आहे मला आता स्थिर राहणे शक्य नाही आणि माझे मन भ्रमित झाले आहे” असे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला. अशी महाभारतातील पार्थाची उर्फ अर्जुनाची अवस्था झाली होती.
सध्याच्या राजकारणातील पार्थाचे स्वकीय जरी शत्रू पक्षात नसले तरी त्याची अवस्था महाभारतातील पार्थाप्रमाणे झालेली नाही. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिर बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी “जय श्रीराम” म्हणून शुभेच्छा देणे , तदनंतर सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सिबीआय ने करावी अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना देणे, त्यावर आजोबांनी नातवाच्या मताला कवडीचीही किमंत नाही म्हणून तो अपरिपक्व असल्याचे भाष्य करणे. सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सिबीआय कडे वर्ग झाल्यावर पुनश्च “सत्यमेव जयते “ असे ट्वीट करणे. अशी ट्वीटरच्या माध्यमातून शाब्दिक शस्त्रे हा आताचा पार्थ सोडत आहे. मराठा आरक्षणावरून काल पुन्हा त्याने आपल्या सत्तेत असलेल्या स्वकीयांना अडचणीत टाकणारा शाब्दिक हल्ला केला. मराठा आरक्षण प्रकरणी एका तरुणाने केलेल्या आत्महत्येवरून आपल्याच सरकार विरोधात “सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही” असा हा शाब्दिक वार होता. आपले पिता सरकार मध्ये असतांना व पितामह त्या सरकारचे जेष्ठ मार्गदर्शक असतांना आजचा हा अर्जुन असे शाब्दिक बाण सोडत आहे. या शाब्दिक बाणांनी त्याचे स्वकीय घायाळ होऊन गेले आहेत , वैतागून गेले आहेत. आजची मुले काही पण ट्वीट करतात , त्यांचे ट्वीट म्हणजे पक्षाची भूमिका नाही तो त्यांचा अधिकार आहे. असे स्पष्टीकरण पार्थ पित्याने दिले आहे. आजच्या या अर्जुनाची निश्चित भूमिका भविष्यात स्पष्ट होईलच. महाभारतातील पार्थाच्या मागे साक्षात भगवान श्रीकृष्ण होते आताच्या या पार्थाला कोणाचे मार्गदर्शन आहे हे तूर्तास समोर आलेले नाही. महाभारतातील तसेच पुराणातील कुणाचीही तुलना सद्यस्थितीतील व्यक्तींशी मुळीच होऊ शकत नाही. नामसाधर्म्य तेवढे काय ते असते. अटलजींच्या “कौरव कौन , पांडव कौन“ या कवितेप्रमाणे आताच्या काळात कौरव व पांडव यांच्यातील भेद ओळखणे मोठे कठीण झाले आहे. महाभारतातील पार्थाला आपल्याच स्वजनांवर वार करायची वेळ आल्यावर उपरोक्त श्लोकांप्रमाणे भ्रमित झाल्यासारखी अवस्था झाली होती. आताच्या पार्थची अवस्था मात्र तशी दिसत नाही, शाब्दिक वार करतांना त्याला काहीच संकोच वाटतांना दिसत नाही. त्याचे स्वजन हे त्याच्या शत्रू पक्षात नसूनही त्याला आपल्याच स्वजनांवर ट्वीटररुपी गांडीवव्दारे तीक्ष्ण शाब्दिक बाण सोडतांना महाभारतातील पार्थाप्रमाणे  भ्रमित अवस्थेत गेल्यासारखे सुद्धा दिसत नाही. आपल्याच स्वजनांनावर शाब्दिक हल्ले करणा-या या पार्थाची भविष्यातील वाटचाल निश्चितच वेगळी राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा