दिवाळीत ढिलाई नकोच
"दिवाळी हा आपला मोठा सण आहेच , तो साजरा व्हायलाच पाहिजे. आपल्या खरेदीमुळे फेरीवाले , रस्त्यावर लहान-सहान व्यवसाय करणारे यांच्या घरी सुद्धा दिवे लागणार आहेत. परंतू हे सर्व करतांना कोरोनाचे सावट अजून आहे याचे भान सर्वानी ठेवावे , काही देशात कोरोनाच्या लाटा पुन्हा आल्या आहेत हे जाणून घ्यावे व पक्षभेद , मतभेद वैचारिक भिन्नता , हे सर्व विसरून आपल्या देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तमाम जनतेला कळकळीने केलेले “जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही “ हे आवाहन ध्यानात ठेऊन आपला सामाजिक वावर करावा हीच या लेखाव्दारे कळकळीची विनंती.सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची , आनंदाची , आरोग्य व भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना."
सध्या दिवाळी या हिंदूंच्या सर्वात महत्वाच्या सणाची धूम सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे बाजारपेठा सजल्या आहेत . पणत्या , लक्ष्मीच्या मुर्त्या , विद्युत दिव्यांच्या माळा , दिवाळी निमित्ताच्या फराळाची दुकाने थाटली आहेत. यंदाची दिवाळी हि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा धुमाकूळ थोडा कमी झालेला दिसून येत आहे. परंतू जशी लॉकडाऊन मध्ये सुट देण्यास सुरुवात झाली तसा लोकांचा कोरोनाचे, सार्वजनिक स्वच्छतेचे , भौतिक दुरतेचे काहीही नियम न पाळता मुक्त वावर सुरु झाला. अनेक शहरातील दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत असलेली चित्रे प्रसिद्ध झाली. त्यावरून कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शारीरिक दूरता पाळावी हे लोक साफ विसरून गेले आहेत हे स्पष्ट झाले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जागतिक स्तरावर जे निकष सांगण्यात आले आहेत त्यांचा तसेच भारत सरकार व राज्य सरकारनी याच विषयाशी संबंधीत ज्या काही सूचना वेळोवेळी केल्या , दूरदर्शनवर जाहिराती केल्या , भले मोठे फलक लावले , पत्रके छापली या सर्वांकडे नागरिक साफ कानाडोळा करीत आहेत. लोक गेल्या काही महिन्यांपासून बंदिस्तासारखे जीवन व्यतीत करीत होते. अनलॉक सुरु झाल्यापासून लोक सैराट झाल्यासारखे वावरू लागले. “कुछ नही होता” , “काय का कोरोना” असे संवाद ऐकू येऊ लागले. परंतू कोविड 19 ज्यांनी भोगला आहे त्यांना त्याचे गांभिर्य माहित आहे. मृत्यूच्या दोन दिवस आधी स्वत:ची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगून त्याचा व्हिडीओ प्रसारित करणा-या प्रख्यात गायक एस.पी.बालसुब्र्ह्मण्यमचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाची भीषणता अनेकांनी अनुभवली आहे. कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात माझी स्वत:ची कोरोना प्रादुर्भाव झालेल्या भागात ड्युटी लागली होती त्यावेळी कोरोना बाधिताशी संपर्क आल्याने एका कुटुंबास होम क्वारंटाइन करण्यात आले होते. तेंव्हा त्या कुटुंबाची मनस्थिती , त्यांचे ते मजुरी सोडून घरात बंदिस्त होणे , त्यामुळे निर्माण होणारा ताण-तणाव , शेजा-या-पाजा-यांनी त्यांना केलेली मदत , त्यामुळे रोग तर भयंकर आहेच परंतू त्यामुळे होणारे इतर परीणाम सुद्धा भयावह असतात हे जवळून पाहिले. त्यानंतर माझ्या जवळच्या मित्राला कोविड-19 झाला होता . त्याचे अनुभव कथन मी ऐकले आहे, विलगीकरणात झालेली त्याची मनस्थिती , जीवनाबाबतच्या त्याच्या पूर्वीच्या व कोरोनामुळे विलगीत झाल्यानंतरच्या दुष्टीकोनात झालेला बदल, आपत्तीत त्याच्या कुटुंबाची , त्याच्या लहानग्यांची , वयोवृद्ध वडीलांची त्याला कशी व्यवस्था करावी लागली, हे सर्व त्याचे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते व ते ऐकल्यावर कोरोनाची भीषणता अधिक चांगल्याप्रकारे कळली. दिवाळी हा आपला मोठा सण आहेच , तो साजरा व्हायलाच पाहिजे. आपल्या खरेदीमुळे फेरीवाले , रस्त्यावर लहान-सहान व्यवसाय करणारे यांच्या घरी सुद्धा दिवे लागणार आहेत. परंतू हे सर्व करतांना कोरोनाचे सावट अजून आहे याचे भान सर्वानी ठेवावे , काही देशात कोरोनाच्या लाटा पुन्हा आल्या आहेत हे जाणून घ्यावे व पक्षभेद , मतभेद वैचारिक भिन्नता , हे सर्व विसरून आपल्या देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तमाम जनतेला कळकळीने केलेले “जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही “ हे आवाहन ध्यानात ठेऊन आपला सामाजिक वावर करावा हीच या लेखाव्दारे कळकळीची विनंती.
सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची , आनंदाची , आरोग्य व भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा