Click "Follow" Button below To Follow this Blog

०७/११/२०२०

Home cleaning on the occasion of Hindu Festival Diwali and nostalgic memories

दिवाळी सफाई आणि ऑडीओ कॅसेट्स 

 “आली माझ्या घरी हे दिवाळी, सप्त रंगात न्हाउनी आली“ सर्व संगीत स्वरात न्हाऊन गेले. संगीताची आवड असलेले तिर्थरूप उद्गारले “ खूप छान वाजतो रे हा टेप रेकॉर्ड अजून, हप्त्यांवर घेतला होता. खरेच जुने ते सोने“ घर आवरण्याचा प्रचंड कंटाळा आलेला मी त्या घर साफ-सफाई मुळे मिळालेल्या आनंदाने व संगीताच्या जादूने प्रसन्न झालो होतो. थकवा फटाक्याच्या धुराप्रमाणे क्षणात लांब गेला होता.

दरवर्षी दिवाळी आली की घरोघरी सुरु होते ती रंगरंगोटी , आवर-सावर. प्रत्येक घरी गृहिणी  या  कामाच्या लगबगीत असतात व त्यांचे पतीदेव त्या कामातून कसे निसटता येईल याच्या विचारात असतात.  परवा सकाळीच सौ ने “अहो” अशी हाक दिली. दिवाळी येते आहे हे लक्षात आल्याने तिच्या “अहो” या आरोळीला ओळखून मी “हो उद्या पासून आवरू” असे म्हणून त्वरीत उत्तर दिले. व तो दिवस मी धकवला.  तिला मात्र सुखद आश्चर्य वाटले. दुस-या दिवशी सकाळीच “मग केंव्हा लागायचे घर आवरायला  हातात झाडू?”  घेऊन तिचा प्रश्न असल्याने आता वेळ मारून नेणे जमणार नाही हे लक्षात आले आणि “मला न आता  जरा बाहेर महत्वाच्या कामाला जायचे आहे “ दुपारी करू म्हणून मी बाहेर पडलो. ”दुपारी नक्की ना ?”  आता हातातली झाडणी हनुमानाच्या गदे प्रमाणे खांद्यावर आली होती. आता  घर आवरावे लागेलच दुपारी  या विचाराच्या तंद्रीत मी माझ्या गंतव्य स्थानाकडे निघालो. दस-याला गाड्या धुण्याच्या मागे काय लॉजिक असते ?  या माध्यमांवर फिरलेल्या संदेशाची आठवण झाली. तसेच दिवाळीला घर का आवरतात ?  याचा विचार करू लागलो. लक्ष्मीपूजन असल्याने व लक्ष्मीला स्वच्छता आवडत असल्याने ही प्रथा पडली असावी.  पुर्वी घरे ही कुडाची असत म्हणून ती चांगली शाकारून घेण्यासाठी व त्या कच्च्या घराची देखभाल व्हावी असा या आवरा-सावरीचा हेतू असावा. आमच्या लहानपणी सर्व सामान घराच्या बाहेर काढून घर साफ होत असे व सामान सुमान सुद्धा. आजही बरेच ठिकाणी असे होते परंतू आता ही प्रथा कमी-कमी होत आहे.  एव्हाना माझे गंतव्य स्थान आले होते , कार्य उरकून मी परत घराकडे  येऊ लागलो. आता मात्र घरी गेल्यावर काही टाळा-टाळ करता येणार नाही हे जाणून होतो शिवाय सौ. च्या त्या खांद्यावर  झाडणी घेत बोलण्याचा आविर्भावाचे स्मरण झाले. घरी पोहोचल्यावर भोजनांती आवर-सावर सुरु केली. “हे काढा, हे असे ठेवा, ते तसे नाही असे ठेवा , तिथले जाळे-जळमटे काढा” या सूचनांचे पालन करीत  साफ-सफाई सुरु झाली. दरवर्षी वस्तू काढा व परत ठेवा हेच असते. या वर्षी


काही  फेकून द्यावे म्हणून ठरवले  परंतू फेकावे असे काही सामान सुद्धा नव्हते. एक पेटी उघडली “फेका बर त्या सर्व कॅसेट्स” पेटीतील 100-125 ऑडीओ कॅसेट्स पाहून सौ उद्गारली.  गाण्यांची आवड असल्याने तीचे ते वाक्य कानावर पडले असूनही माझ्या मनाला 30 वर्षापूर्वीच्या काळात जाण्यास  वेळ लागला नाही. "रिव्हर्स", "फॉरवर्ड" , कॅसेट मधील टेप बाहेर आली की पेन/पेन्सिल ने गुंडाळणे सर्व आठवू लागले.संगीताची आवड तीलाही आहे परंतू त्या कॅसेट्स काहीही उपयोगात नसल्याने तीचे तसे म्हणणे होते.  त्या पेटीत फिलिप्सचा कॅसेट्स प्लेयर सुद्धा निघाला. सौ दुस-या कामात मग्न होती , मी एक-एक कॅसेट न्याहाळू लागलो. पेन ड्राइव्ह ,मोबाईल,ब्ल्यू टूथ स्पीकर ई. अनेक अशी अत्याधुनिक साधने आता उपलब्ध आहेत. या काळात त्या ऑडीओ कॅसेट्स म्हणजे बाबा आदमच्या जमान्यातील म्हणता येतील अशा. कदाचित त्या वाजतही असाव्यात. सौ चे “फेका बर त्या सर्व कॅसेट्स” हे बरोबरही वाटत होते परंतू रफी, किशोर, मुकेश , लता , आशा  यांची तसेच जुन्या नट नट्यांची आकर्षक चित्रे असलेल्या त्या कॅसेट्स फेकण्याचे मन होत नव्हते . मोह म्हणतात तो हाच. कॅसेट्स पहाता पहाता “व.पु” , “पु.ल.” यांच्या कथाकथन असलेल्या कॅसेट्स सुद्धा दिसल्या “सु” , “प्रिमियर पासेस” या कथा कानात घुमू लागल्या , मुलांना दाखवल्या म्हटले ऐकाल रे या कथा. आपण “यु ट्युब“ वर शोधू. सौ इतर आवर-सावर करण्यात मग्न झाली. खरेच आता त्या कॅसेट्स मुक्या झाल्या होत्या , टाकाऊ होत्या , त्यांना काही मुल्य नव्हते परंतू जुन्या गीतांचा तो खजिना, बिस्मिल्ला खानची सनई , शास्त्रीय संगीत , कथा कथन , नरवीर बाजीप्रभूच्या पराक्रमाचा पोवाडा , योगासने सराव असा तो अमुल्य संग्रह पहाण्यात मी दंग असल्याचे पाहून अर्धे अधिक काम पूर्ण करून सौ चे लक्ष माझ्याकडे गेले , मी मोबाईल वर कॅसेट्स चे फोटो काढत होतो . तीला दाखवले “ ठेवा त्या कॅसेट्स , अन ठेवा बर ती पेटी लवकर “  सौ म्हणाली. मला त्या कॅसेट्स फेकाव्या असे वाटत नाही हे जाणून तीने तसे म्हटले होते. मी काही कॅसेट्स वरच ठेवल्या व उर्वरीत पेटीत व्यवस्थित रचून ठेवल्या, टेपरेकॉर्डर दुरुस्तीला घेऊन गेलो, कारागीर हसला म्हणाला “काय साहेब, कोणत्या जमान्यात आहे ? फेका आता हे“ माझी टेपरेकॉर्डर दुरुस्त करण्याची कितपत इच्छा आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने असे म्हटले. “खर्च किती येईल” मी . कारागिराला वाटले जाऊ द्या कुठे डोके लावता “दोन दिवसांनी या” तो म्हणाला. आयताच गि-हाईक आला आहे पैसे चांगले मिळतील असे त्याला वाटले असावे असे मला वाटले. टेप दुरुस्त झाला. “साहेब पैसे नको” तो म्हणाला , मला आश्चर्य वाटले. मी म्हटले “का रे बाबा “ आपल्या दुकानातला “रेकॉर्ड प्लेयर दाखवत तो म्हणाला “मी सुद्धा हा अजून फेकला नाही, वाजतो हा” आवर–सावर संपली होती,  मी उजळलेले घर पाहून सुखावलो नहोतो. सौ ने चहाचा कप हाती दिला मी मुलांना हाक मारली एका कॅसेट्स वरचे लेबल न पाहता टेपरेकॉर्डर वर कॅसेट् लावली व उद्गारलो “ऐका” मुळे उत्कंठतेने पाहू लागली आणि गाणे लागले , गाणे होते , “आली माझ्या घरी हे दिवाळी, सप्त रंगात न्हाउनी आली“ सर्व संगीत स्वरात न्हाऊन गेले. संगीताची आवड असलेले तिर्थरूप उद्गारले “ खूप छान वाजतो रे अजून, हप्त्यांवर घेतला होता. खरेच जुने ते सोने“ घर आवरण्याचा प्रचंड कंटाळा आलेला मी त्या घर साफ-सफाई मुळे मिळालेल्या आनंदाने व संगीताच्या जादूने प्रसन्न झालो होतो. थकवा फटाक्याच्या धुराप्रमाणे क्षणात लांब गेला होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा