खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने,भाग-10
एक हाँटेड स्थान, टॉकीज
"...खामगांवातील नवीन पिढीला इथे भुतांचा वास असल्याचे किस्से सांगितले जाणारी
वास्तू होती याची कल्पनाही नसेल, त्यांनी हा लेख वाचला तर
प्रगत तंत्रज्ञान युगातील ही पिढी यावर विश्वास ठेवणार नाही.
परंतू आपल्या गावात अशीही एक वास्तू होती हे कळल्यावर त्यांना गंमत मात्र
जरुर वाटेल. तसेच जुन्या काळाच्या तुलनेत आता भुतांचे प्रताप व किस्से ऐकू येण्याचे प्रमाण अगदीच नगण्य झाले आहे. सध्या माणसांचेच प्रताप एवढे वाढले आहे की ते पाहून भुतेच लुप्त झाली असावीत...."
संग्रहीत चित्र |
खामगांव शहरात मनोरंजनासाठी म्हणून चित्रपटगृहे कधी सुरु झाले हे काही माहीत नाही परंतू आमच्या लहानपणापासून खामगांव शहरात तीन चित्रपटगृहे असल्याचे माहीत होते. एक टॉकीज बंद पडली होती ती आता पुन्हा सुरु आहे. एक नवीन चित्रपटगृह सुरु झाले होते ते बंद पडले व पाडले सुद्धा. तिथे आता दुसरा व्यवसाय आहे. तसेच एक जुनी टॉकीज सुद्धा आता पाडल्या गेली आहे. सद्यस्थितीत शहरात दोन टॉकीज सुरु आहे. खामगांवातील एक टॉकीज चित्रपती व्ही. शांताराम यांच्या मालकीची होती असेही जुने लोक सांगतात. तसेच सुमारे 1950 च्या पुर्वी इथे आणखी एक अशी टॉकीज पण होती की जीचे बंद पडण्याचे कारण मोठे विलक्षण होते. ही टॉकीज जेंव्हा सुरु होती त्याकाळातील फारच थोडे लोक आता हयात असण्याची शक्यता आहे. परंतू ही टॉकीज जिथे होती ते ठिकाण व तिची जुनाट/पडकी इमारत मात्र आमच्या पाहण्यात आली आहे. आमच्या लहानपणी मग आम्हाला या टॉकिजबाबतच्या निरनिराळ्या कथा कळू लागल्या. या टॉकीजमध्ये म्हणे भुतांचा वास होता. आता भुतांना चित्रपट आवडतात म्हणून ते तिथे येत होते का हे एखाद्या भुताकडूनच कळू शकेल. ही टॉकिज व येथील भुतांबाबतच्या नाना गोष्टी खामगावात तेंव्हा चर्चिल्या जात. चित्रपट सुरु असतांना म्हणे दर्शकांच्या खुर्च्या विरुद्ध दिशेकडे वळून जायच्या, चित्रपट सुरु असतांना पडद्यावर चित्रे उलटी दिसू लागत, बाकडे वाजू लागत. या अशा घटनांमुळेच हे थिएटर बंद पडले. ते पुन्हा सुरु करण्यासाठी व पुन्हा भुतांचा त्रास न होण्यासाठी मग एक ब्रह्मास्त्र शोधल्या गेले ते म्हणजे देव. भुते फक्त देवांनाच घाबरतात म्हणून मग देवाचा सिनेमा लाऊन चित्रपटगृह पुन्हा सुरु केले गेले. हा चित्रपट काही दिवस चालला व गेला. परंतू ती टॉकीज पुन्हा बंद पडली. भुते जणू काही हात धुऊन या टॉकीजच्या मागेच लागली होती. देव जात नाही तोच म्हणजे देवाचा तो सिनेमा गेल्यावर भुते पुन्हा दाखल झाली व त्यांच्या करामतींनी पुन्हा टॉकीज बंद पाडलीच.
या टॉकीजची भग्न वास्तू , वास्तू काय निव्वळ काही अवशेषच आज दिसतात. ही टॉकीज म्हणजे त्याकाळात खामगांवातील सिनेरसिकांसाठी एक चांगली सुविधा म्हणून सुरु केली होती. अर्थात भुतांच्या या गोष्टींमुळे त्या ठिकाणी किती सिनेरसिक जात असतील हे एक प्रश्नचिन्हच आहे. भुतांच्या या घटनांमुळे या टॉकीजवर जे गंडांतर आले त्यातून ही टॉकीज कधीच सावरली नाही. आज खामगांवातील नवीन पिढीला इथे अशी भुतांचा वास असलेली वास्तू होती याची कल्पनाही नसेल , त्यांनी हा लेख वाचला किंवा त्यांना उपरोक्त कथा कधी सांगितल्या तर तंत्रज्ञान युगातील ही पिढी यावर विश्वास ठेवणार नाही. परंतू आपल्या गावात अशीही ही एक वास्तू होती याबाबत त्यांना कळेल व त्यांना गंमत मात्र वाटेल.
आधीच सांगितल्याप्रमाणे भारतात अशा भुताखेतांच्या कथांना अंत नाही. अनेक हाँटेड अशी ठिकाणे जगभरात आहेत. काही ठिकाणी तर आजही विशिष्ट वेळेनंतर कुणीही जात नाही. यामुळेच अनेक लेखकांनी भुतांबाबत लेख, पुस्तके लिहिली आहेत. व. पु. काळे यांचे एकबोटे आडनांव असलेल्या मदत करणा-या भुताची आवर्जून ऐकावी अशी मजेशीर कथा आहे, मराठीतील भुताचा भाऊ, हा खेळ सावल्यांचा आदी चित्रपट, हिंदीत तर कितीतरी चित्रपट निघाले , अनेक मालिका निघाल्या. रामसे बंधु या निर्माता, दिग्दर्शक बंधूव्दयांनी निव्वळ भुताचेच सिनेमे बनवले होते. त्यांचा एखादा भुताचा सिनेमा या टॉकीजमध्ये लावला असता तर त्यात भुतांनी खुर्च्या फिरवणे किंवा पडद्यावरची चित्रे उलटी करणे असे प्रताप दाखवले असते का ? तसेच जुन्या काळाच्या तुलनेत आता भुतांचे प्रताप व किस्से ऐकू येण्याचे प्रमाण अगदीच नगण्य झाले आहे. सध्या माणसांचेच प्रताप एवढे वाढले आहे की ते पाहूनच भुते लुप्त झाली असावीत. असे भुतांबाबत अनेक प्रश्न व विचार मनात घेऊन मी पुन्हा एखादे भग्न , भकास झालेले स्थान आठवू लागलो.
क्रमश:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा