शिस्त काय फक्त जनतेसाठी
नेत्यांसाठी नाही ?
सरकारने शिस्तपालन करणे प्राधान्याचे ठरते तितकेच जनतेला सुद्धा स्वत:ची व स्वत:च्या परिवाराची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. परंतू शिस्तपालन करणे हे जनतेचे जेवढे कर्तव्य आहे तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक ते नेत्यांचे सुद्धा आहे यावर सरकारने विचार करणे व आपल्या कृतीतून ते जनतेपुढे ठेवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे.
परवा मा. मुख्यमंत्री यांनी जनतेला संबोधित केले 'किंबहुना' कोरोनाच्या या संकटात करायलाच पाहिजे होते. मा. मुख्यमंत्र्यानी आपल्या संबोधनात ब-याच गोष्टी सांगितल्या. मास्क घालायला पाहीजे , काळजी घ्यायला पाहिजे , शिस्त पाळायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. जनतेत बरेच लोक असे आहेत की जे शिस्त पाळत नाहीत. पण शिस्त काय ती जनतेनेच पाळायची का ? असा प्रश्न मात्र मा. मुख्यमंत्री महोदयांना याप्रसंगी विचारावासा वाटतो. याचे कारण हे की सत्ताधारी पक्षाचे आमदार , मंत्री हेच मुळात कोरोना बाबतची दक्षता घेतांना दिसत नाहीत. कुणी शिवजयंतीच्या निमित्ताने शेकडो लोकांना काय जमवतो, कुणाकडे लग्न समारंभाच्या निमित्ताने कित्येक राजकारणी काय जातात. एल्गार परिषदेला सरकारने परवानगी दिली होती व त्यातून शर्जील उस्मान याने विघातक , धर्मव्देशी असे भाषण दिले , हिदू धर्म सडला आहे म्हणे. हे आपण कसे खपवून घेतले ? गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई झालीच. तसेच आज गेल्या कित्येक दिवसांपासून गायब असलेले मंत्री संजय राठोड माध्यमांसमोर प्रकट झाले व पूजा चव्हाण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. येथे मोठा जमाव एकत्रित झाला होता. वरील प्रकारची आयोजने जेंव्हा सरकार मधील आमदार, मंत्री हेच करीत असतील , कोरोना बाबतच्या दक्षतेचे नियम स्वत:च धाब्यावर बसवत असतील तर मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही फक्त जनतेलाच कसे काय उपदेश करता ? उलट तुम्ही सरकार मधील सर्वांना कोरोनाची सर्व दक्षता घेण्याचे ठणकावून सांगा ना ! तसे तुम्ही सांगितले तर मग जनतेला तुम्ही केलेल्या कोरोनाची दक्षता घेण्याच्या आवाहनाचे पालन करावे वाटेल. पण सत्तेसाठी म्हणून एकत्र आलेल्या तुमच्या साथीदारांना तुम्ही ठणकावून तरी कसे सांगणार म्हणा कारण सरकार व्यवस्थित चालले पाहिजे याची चिंता सुद्धा तुम्हाला असेल म्हणून मग लोकांना तेवढे सांगायचे. सत्ताधारी आमदार व मंत्र्यांना काहीही न सांगता तुम्ही विरोधकांनी ,मंदिरे उघडायला लावली म्हणून कोरोनाच्या नव्या लाटेचे खापर विरोधक व जनतेच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहात. आपण हे सुद्धा ध्यानात घ्यावे की काही दिवसांपुर्वी राज्यात ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा झाल्या त्या निवडणुका सुद्धा कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही सरकारच्या वतीने जनतेच्या भल्यासाठी जरी सांगत असला तरी हे उपदेशाच्या बाळकडूचे डोस प्रथम आपल्या शिलेदारांना द्यावे असे वाटते. एखादा सामान्य व्यक्ती बिना मास्क दिसला तर त्याला दंड आकारला जातो , ब-याच लोकांना मार खावा लागला आहे , मंगल कार्यालयांना दंड झाला आहे , वर- वधूच्या नातेवाईकांना दंड झालेला पाहिला आहे परंतू राज्यात राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त इतर कुण्या राजकारण्याला दंड झालेला दिसला नाही. मुख्यमंत्री या नात्याने आपले जनतेला उद्बोधन करणे योग्यच आहे त्याबद्दल वाद नाही परंतू सरकारच्या उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असली पाहीजे ना. नेत्यांच्या 'किंबहुना' सरकारच्या उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असेल तरच त्या नेत्याचा ,सरकारचा जनतेवर प्रभाव पडतो अन्यथा जनता असल्या उपदेशांकडे दुर्लक्ष करते व नंतर तर असे पोकळ सल्ले जनता ऐकणे सुद्धा सोडून देते. सरकार व जनता या दोघांनाही सध्या या संकटकाळी दक्षता घ्यायची आहे. बरेच लोकांचा मास्क हा नाकाच्या खाली असतो , काहींचा मास्क हनुवटीवर असतो , काही लोक मास्क काढून बोलतात , काहीना मास्क केंव्हा घालायचा व केंव्हा नाही हे अद्यापही कळलेले नाही. जरी प्रथम सरकारने शिस्तपालन करणे प्राधान्याचे ठरते तितकेच जनतेला सुद्धा स्वत:ची व स्वत:च्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतू शिस्तपालन करणे हे जनतेचे जेवढे कर्तव्य आहे तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक ते नेत्यांचे सुद्धा आहे यावर सरकारने विचार करणे व आपल्या कृतीतून ते जनतेपुढे ठेवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा