तुमचे हिंदुत्व जनतेला चांगलेच ठाऊक आहे.
हिंदुत्व हे एकच आहे ते शेंडी जानव्याचे आणखी अमुक तमूकचे असे नाहीच या देशातील सर्व जाती धर्मांना जो आपले मानतो ,देशहित प्रथम असे जो मानतो तो हिंदू. तुमचे हिंदुत्व कसे आहे हे आता सर्वांनाच चांगलेच ठाऊक झाले आहे , जनता आगामी काळात तुम्हाला ते दाखवेलच.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात भाषण केले. या भाषणात त्यांनी ब-याच गोष्टींवर भाष्य केले. राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात महाराष्ट्र राज्या बाबत अत्यल्प व इतर बाबींवरच त्यांनी ऊहापोह केला. चीन समोर पळ काढला , विरोधी पक्षाची मातृसंस्था स्वातंत्र्य लढ्यात नव्हती अशी विधाने त्यांनी केली. स्वातंत्र्यलढ्यात असणे म्हणजेच देशभक्त असणे असे आहे का ? स्वातंत्र्य लढ्यात होते त्यांनी काय केले पुढे ? संरक्षण खात्यातील जीप घोटाळा , नगरवाला प्रकरण , सुटकेस , कोळसा , स्पेक्ट्रम , नॅशनल हेरॉल्ड कित्येक अशा घोटाळ्यांचे आरोप स्वातंत्र्य लाढ्यात असणा-यांवर व त्यांच्या पुढील पिढ्यांवर झाले हे सुद्धा तितकेच खरे आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी या भाषणाचा “चौकातील भाषण” असा उल्लेख केला तो योग्यच वाटतो. या भाषणातील अनेक बाबी खटकल्या त्यातील एक वाक्य म्हणजे “आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही”. या प्रसंगी मा. मुख्यमंत्र्यांना पदावर आरुढ होतांना सर्व जनतेला समदृष्टीने पाहिल अशा आशयाची जी प्रतिज्ञा असते त्याचे विस्मरण झाल्याचे दिसले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवरायांचे नाव घेणा-या त्यांना आदर्श मानणा-या तसेच आपल्या वक्तव्यातून जातीयवाद , सामाजिक तेढ निर्माण करणा-या तसेच एखाद्या विशिष्ट जाती बद्दल नेहमीच आकस बुद्धीने पाहणा-या तथाकथीत नेत्यांनी स्तुतीसुमने उधळली. स्वत: मुख्यमंत्री व त्यांचा पक्ष हा शिवरायांना आपला आदर्श मानतो. शिवरायांनी सर्वांना समदृष्टीने पाहिले , अठरापगड जातींना भागव्या झेंड्याखाली एकत्र आणले. तुमच्या भाषेत बोलायचे तर त्यांच्या मंत्री मंडळात व सहका-यांत सुद्धा कित्येक शेंडी जानवी होतीच. ज्यांना तुम्ही आदर्श मानता ते स्वत: समस्त जातींना बरोबर घेऊन चालत होते व शेंडी जानव्याचा आदर करीत होते. असे मी नाही म्हणत तर असे इतिहासच सांगतो , याचे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत. कविराज भूषणच्या कवितेतील ओळींमधून हेच प्रतीत होते
वेद राखे विनीत
पुराण प्रसिद्ध राख्यो | रामनाम राख्यो अति रचना सुधीर मे |
हिंदून की चोटी
राखी रोटी राखी है सिपहन की | कंधे पे जनेऊ राख्यो माला राखी कर मे |
मोडी राखी मोगल मरोडी राखी पातशाह | बैरी पिसी राख्यो वरदान राख्यो कर मे |
राजन की हद राखी तेजबल शिवराय | देव राखे देवल
स्वधर्म राख्यो घरमे ||
तुम्ही सतत छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देत राहता , त्यांच्या
नावावर तुमचे राजकारण चालते , तुमचा पक्ष उभा राहिला. ज्या शिवरायांना
तुम्ही तुमचे आदर्श मानता ते तर
हिंदून की चोटी राखी रोटी राखी है सिपहन की | कंधे पे जनेऊ राख्यो माला राखी कर मे |
अर्थात शेंडी जानव्याचे रक्षण करणारे होते. या ओळींची आठवण करून देणे यासाठी क्रमप्राप्त ठरते की आपण राज्याचे प्रमुख आहात. आपल्याला सर्व जनता सारखी वाटली पाहिजे , आपण आज ज्याप्रकारे सत्तेत आलात त्यामुळे आपल्याला सतत हिंदुत्व सोडले नाही , आमचे हिंदुत्व कसे आहे हे सांगावे लागत आहे पण हे सांगण्यासाठी आपण जातीवाचक उल्लेख करणे योग्य नव्हे. मनोहर जोशी , सुधीर जोशी , हेमचंद्र गुप्ते , माधव देशपांडे इ अनेक नेते आपल्याच पक्षाने दिली आहेत. हिंदुत्व हे एकच आहे ते शेंडी जानव्याचे आणखी अमुक तमूकचे असे नाहीच या देशातील सर्व जाती धर्मांना जो आपले मानतो ,देशहित प्रथम असे जो मानतो तो हिंदू. तुमचे हिंदुत्व कसे आहे हे आता सर्वांनाच चांगलेच ठाऊक झाले आहे , जनता आगामी काळात तुम्हाला ते दाखवेलच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा