तेरे मेरे सपने
तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणारे या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत , त्यांना शासनाचे,जनतेचे सहकार्य मिळावे,पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे म्हणजेच तेरे मेरे सपने नाहीत का ?
वर्ष 2013 पासून दर गुरुवारी नित्य नेमाने लिहित आहे. सुरुवातीला काय लिहिणार ?, कसे लिहिणार ? , विषय काय घ्यायचे ? असे प्रश्न पडायचे. परंतू एवढ्या मोठ्या जगतात कितीतरी घटना घडतात , काही प्रेरणादायी गोष्टी असतात , राजकारण तर आहेच , चित्रपट , गाणी असे कितीतरी विषय आहेत की ज्यावर लिहिता येऊ शकते व तसे लिहू लागलो व बघता-बघता शेेेकडो लेख लिहिले. या गुरुवारचे म्हणायचे तर काल पर्यंत काही विषय डोक्यात नव्हता परंतू काल , इस्त्रायल मधील युद्धजन्य स्थिती, संजय गायकवाड यांचे देव देवळात बंद आहे, तुम्ही मांसाहार करा असे हिंदूंना उद्बोधन करीत केलेले वक्तव्य , आमदार रणजीत कांबळे यांनी वैद्यकीय अधिका-यास केलेली शिवीगाळ असे अनेक विषय डोक्यात घोळू लागले. पत्रकार नागरिक यांनी एखादी समस्या मांडली , त्या समस्येचा पाठपुरावा केला तर लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांना आवडत नाही व त्यामुळे घडलेले अनेक मुस्कटदाबीचे किस्से सर्वश्रुत आहेतच पण वर लिहिल्या प्रमाणे हे लोकप्रतिनिधी मात्र काहीही बोलतील ते चालते, यांच्या विरोधात किंवा नोकरशहांच्या विरोधात काही लिहिले , बोलले की मग मात्र यांचा तीळपापड होतो. शिवाय या अशा घटनांवर किती लिहिणार आणि किती बोलणार ? शीर्षक वाचून वाचकांना समस्या , राजकारण हे काय वाचत आहोत असा प्रश्न पडला असेल म्हणून आता आजच्या विषयाकडे येतो.
नेत्यांची वक्तव्ये , समस्या , कोरोना , जागतिक घडामोडी या विचारात असतांनाच जुन्या एका चित्रपटाची बातमी वाचनात आली. 13 मे रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनास 50 वर्षे झाली. हा चित्रपट म्हणजे नवकेतनचा “तेरे मेरे सपने” . सध्या कोरोना काळात डॉक्टर , नर्सेस व सर्वच आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. हा चित्रपट म्हणजे एका डॉक्टरचीच कहाणी आहे. म्हणून याच विषयावर लिहिण्याचे नक्की केले शिवाय काल जागतिक रुग्ण सेविका दिन सुद्धा झाला म्हणून मग लिहू लागलो. तेरे मेरे सपने माझ्या जन्माच्याही आधी प्रदर्शित झालेला सिनेमा आहे परंतू जुन्या चित्रपटांची , गाण्यांची, सुमधुर संगीताची आवड असल्याने मी लिहिता झालो. खुप वर्षांपूर्वी एका कडक उन्हाळ्यातील दुपारी मी हा चित्रपट दुरदर्शनवर पाहिला होता. यातील कर्णसुखद अशा संगीताने व गीतांनी विदर्भातील रणरणत्या उन्हाळ्यातील त्या दुपारी मला सुखद गारवा मिळाला होता. एस.डी. बर्मन यांनी स्वरबद्ध केलीली एकापेक्षा एक अशी नीरज यांची अवीट मधुर गीते आज 2021 मध्येही तितकीच ताजी आहेत जितकी 1971 मध्ये होती. एका तरुण कन्येस अनुरूप असा जोडीदार मिळाल्यावर , अनुरागामुळे तीच्यात तिलाच जाणवलेला बदल व्यक्त करणारे “जैसे राधाने माला जपी श्यामकी” , नवीन जोडप्याच्या आजीवन सोबत राहण्याची भावना व्यक्त करणारे “हे मैने कसम ली” , नवपरिणीत जोडप्याच्या जीवनवेलीवर जेंव्हा एक फुल उमलणार असते तेंव्हा त्यांच्या मनातील विचार मांडणारे “जीवन की बगीयाँ महकेगी” अशा कवी गोपालदास नीरज या देव आनंदचेच “फाईंड” असलेल्या सुमधुर रचना रसिकांना कर्णतृप्तीचा आनंद देतात.
डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रास समर्पित असा हा विजय आनंद या प्रथितयश दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात जाऊन तेथील गरीब रुग्णांना सेवा देण्याचे आदर्शवादी डॉ आनंद कुमार (देव आनंद) ठरवतो त्याच्या या निर्णयावर समाजाची प्रतिक्रिया , टोमणे हे अगदी मार्मिकपणे दाखवणारा हा सिनेमा आहे. एका कोळशाच्या खाणीलगतच्या गावात हा डॉक्टर सेवा देण्यास जातो. याच गावात डॉ प्रसाद हे 35 वर्षांपूर्वीच आलेले असतात त्यांच्याकडे डॉ. आनंद रुजू होतो. डॉ आनंदच्याही 35 वर्षे आधी या गावात आलेल्या डॉक्टरला परिस्थितीत काही विशेष बदल झालेला आहे असे वाटत नसल्याचे ते व्यक्त करतात. पुढे निशा (मुमताज) ही आनंदच्या जीवनात येते , अनेक रुग्ण , अपु-या वैद्यकीय व्यवस्था हे सर्व चित्र पाहून तो व्यथीत होतो, खेडेगावात रुग्णसेवेसाठी आलेल्या या डॉक्टरला त्याच्या पत्नीच्या अपघातास जबाबदार असलेला आरोपी जेंव्हा लाच देऊन सुटतो त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पुन्हा शहराकडे जावे लागते. या कथेत इतरही अनेक वळणे आहेत. पण सेवा म्हणून वैद्यकीय व्यवसायाकडे पाहण्याचा मुख्य संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास काल 50 वर्षे पुर्ण झाली. हा चित्रपट ए. जे. क्रॉनीन यांच्या “सिटाडेल” या कथेवर आधारीत आहे.
गतवर्षीपासून आपण कोरोना महामारीचा सामना करीत आहोत. 50 वर्षापुर्वीच्या अपु-या वैद्यकीय सुविधा , ग्रामीण रुग्णांचे होणारे हाल यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. चित्रपटात वैद्यकीय सुविधांची परिस्थिती 35 वर्षांपासून बदलेली नाही असा संवाद आहे. म्हणजे ती 35 व चित्रपट प्रदर्शित होऊन झालेली 50 अशा 85 वर्षांपासून आपण तिथेच आहोत का ? आज कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय सुविधा अपु-या पडत आहेत, रूग्णालये , ऑक्सिजन , औषधे यांचा आजही तुटवडा जाणवत आहेत, समाज कंटक त्यातही काळाबाजार करीत आहेत. म्हणूनच तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणा-या या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत , त्यांना शासनाचे व जनतेचे सहकार्य मिळावे , पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात , त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे म्हणजेच तेरे मेरे सपने नाहीत का ?
उत्कृष्ट
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवाखूप च छाश
हटवाThank you
हटवासुंदर लेख .
हटवाThank you so much
उत्तर द्याहटवाया देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे म्हणजेच तेरे मेरे सपने सर्वांच्यावतीने मांडल्या बद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवा👍🙏
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाWah wah..khoop sunder lihile aahe..Vinay ji..!!!!!!!!!!!!!!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद साहेब
हटवाJabardast bhau juni athvan zali
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवा