आमच्या बाई
कुळकर्णी बाई |
आजरोजीपावेतो शेकडो लेख लिहिले पण बाईं विषयी लिहायचे ठरवून सुद्धा लिहिणे मात्र झाले नाही. अणे मॅडम , एम. आर. देशमुख सर यांच्या विषयी लेख लिहितांना कुळकर्णी बाईंची आठवण कित्येकदा येऊन गेली पण योग काही आला नाही , प्रत्येक कार्याचा एक योग असतो तो आला की मग मात्र ते कार्य त्वरीत तडीस जाते. प्रसंगी विलंब होतो पण कार्य चांगले होते. कुळकर्णी बाई यांचे विषयी लिहिण्यास विलंब झाला खरा परंतू त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमाच्या वेळी त्यांचेविषयी लिखाण झाल्याने मनास अत्यंत आनंद वाटतो आहे व त्यांच्याप्रती असलेली आदराची भावना योग्यवेळी प्रकट झाल्याने समाधान वाटते आहे.
होय बाईच ! त्या काळात शिक्षिकेला सर्व विद्यार्थी “बाई” असेच संबोधत. “मॅडम” हा शब्द इंग्रजीचे गारुड घरा-घरावर फिरल्यावर रूढ झाला. बाईंची आठवण येण्यास निमित्त घडले ते त्या दिवशी फेसबुकवर पाहिलेल्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या पोस्टचे. ही पोस्ट होती सर्वेश कुळकर्णीची त्याच्या आईचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा त्याने आयोजित केला आहे. सोबतच त्याने नवीन पिढीस उद्बोधक अशी माता-पित्या प्रती आदरभाव प्रकट करणारी चित्रफित सुद्धा जोडली होती. याच चित्रफितीत दिसल्या आमच्या बाई . सर्वेशची आई म्हणजे आमच्या “कुळकर्णी बाई“. ही पोस्ट मला भुतकाळात घेऊन गेली.
घराजवळच असल्याने मला टिळक स्मारक मंदिराच्या “नुतन बालक मंदिर” येथे दाखला दिला होता. आमच्या वेळेस ही बालवाडी टिळक स्मारकच्या मुख्य हॉल मध्येच भरत असे. टिळक स्मारक मंदिराचा लुक तेंव्हा आजच्या सारखा नव्हता. आता टिळक स्मारक मंदिर पूर्वीच्या तुलनेत खुप आकर्षक आहे. लोकमान्य टिळक हे महान राष्ट्रपुरुष या बालवाडीमुळेच आमच्या बालवयातच आम्हाला परिचित झाले. जरी तेंव्हा आत्यंतिक बाल्यावस्थेत असलो तरी त्या बालवाडीच्या काही आठवणी अद्यापही मनात ताज्या आहेत. या बालवाडीत आम्हाला शिकवायला दोन बाई होत्या. तसेच त्याच ठिकाणी राहणा-या भिकाबाई शिंदे या मदतनीस होत्या. शिंदे कुटुंबीय व आमच्या परीवाराचे निकटचे संबंध मला नंतर माहित झाले. असो ! या बालक मंदिरात असलेल्या दुस-या बाईंचे नांव , आडनांव मात्र आता काही आठवत नाही. आठवतात फक्त कुळकर्णी बाईच. काही व्यक्ती त्यांचे गुण, सकारात्मक वृत्ती, ऊर्जा यांमुळे लोकांच्या चिरकाल स्मरणात राहतात. मला खात्री आहे की केवळ माझ्याच नाही तर माझ्याप्रमाणे नुतन बालक मंदिरात शिकलेल्या अनेक मुला-मुलींना सुद्धा कुळकर्णी बाई आठवतच असतील. कारण त्यांनीच आम्हाला “अ , आ , इ ,ई “ चे धडे दिले होते. माझ्या भावंडाना सुद्धा त्यांनीच शिकवले होते शिवाय त्यांच्याशी नंतर सुद्धा अनेकदा भेटी झाल्याचे स्मरते. हो पण कुळकर्णी बाईंचे नांव मात्र लक्षात नाही हे प्रांजळपणे कबूल करतो. साधी साडी , गळ्यात फक्त काळीपोत अशी अत्यंत साधी राहणी असलेल्या कुळकर्णी बाई नेहमी हसतमुख असायच्या. त्या आमच्या कडून गाणी म्हणवून घेत , बाराखडी शिकवण्यासाठी लाकडी ठोकळे द्यायच्या , एक नौका सुद्धा बालवाडीत खेळण्यासाठी आणून ठेवली होती तिचा “सी सॉ” सारखा उपयोग मुले करीत. नुतन बालक मंदिर म्हणजे कुलकर्णी बाई अशी ओळख त्यांनी त्यांची वागणूक, बालकांप्रतीचे त्यांचे प्रेम, कामावरील निष्ठा, पालकांशी आपुलकी व आदराने संवाद याने निर्माण केली होती. तेंव्हा या बालक मंदिराचे संचालक, संस्था हे कळण्याचे वय नव्हते पण नुतन बालक मंदिराचा नावलौकिक वाढण्यास कुळकर्णी बाईंचा "सिंहिणीचा" वाटा होता हे मात्र नक्की. कुळकर्णी बाई नेहमी पायीच फिरत असत. सिव्हील लाईन मध्ये एका छोट्याश्या घरात कुळकर्णी कुटुंब समाधानी वृत्तीने राहात असे. त्यांच्या घरात एक औदुंबर वृक्ष होता. आमचा शिकवणी आदीसाठी जाण्याचा रस्ता हा कुळकर्णी बाईंच्या घरासमोरूनच असल्याने बाई व त्यांची मुले नेहमी दिसतच असत. सर्वेश व सुवर्णा ही दोघी कुळकर्णी बाईंची दोन गुणी , सद्वर्तनी मुले. कुळकर्णी बाईचे पती सुद्धा आमचेकडे अनेकदा आले होते. ते सुद्धा अत्यंत साधे व मितभाषी होते. सुवर्णा व सर्वेश ही दोघे माझ्या दोन लहान बहिणींच्या सोबत होते. सर्वेश माझ्याहून खूप लहान , कुरळे केस असलेल्या लहानग्या, निरागस सर्वेशचा हसमुख चहेरा आजही आठवतो. सर्वेश अजूनही तसाच आहे. बालवयातील शिक्षकांचाच बालमनावर खूप प्रभाव पडतो , हे शिक्षकच असे असतात की ते आयुष्यभर लक्षात राहतात कारण साक्षरतेचे प्राथमिक धडे जरी अल्प वेतन असले तरी हेच शिक्षक मोठ्या मेहनतीने , बालकांसोबत बालकांसारखे होऊन गिरवून घेत असतात. प्रत्येकाच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया म्हणजे हेच शिक्षक असतात. म्हणूनच ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना प्राथमिक शिक्षण देणारे त्यांचे शिक्षक आयुष्यभर लक्षात राहिले होते. कुळकर्णी बाई सुद्धा त्याचप्रकारातील शिक्षिका.कालांतराने कुळकर्णी कुटुंबीयांनी खामगांव सोडले. तत्पुर्वी कुळकर्णी बाईंचा त्यांच्या सद्वर्तणूक व चांगल्या तळमळीने, सचोटीने केलेल्या ज्ञानदानाच्या शैक्षणिक कार्याप्रित्यर्थ खामगांवात अनेकदा गौरव झाल्याचे स्मरते. खामगांव सोडल्यावर मग मात्र कुळकर्णी बाई व त्यांचे कुटुंबीय यांचेशी संपर्क तुटला. कुळकर्णी बाई कुठे गेल्या वगैरे काही माहित झाले नाही. आता काही वर्षापुर्वी फेसबुकच्या माध्यमातून सर्वेश संपर्कात आला. व त्यामुळेच कुळकर्णी बाईंच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे कळले. एखाद्या व्यक्तीने वयाची 81 वर्षे पूर्ण केली म्हणजे त्याचे जन्मल्यापासून एक हजारवेळ पुर्ण चंद्र पाहणे झालेले असते व म्हणून आपल्या संस्कृतीत हा सोहळा साजरा करीत असतात. माझ्या आजीच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या वेळी मला या प्रथेबद्दल कळले होते. सर्वेशने हा कार्यक्रम करण्याचा एक चांगला निर्णय घेतला. नवीन पिढीस माता-पित्यांप्रती आदरभावना वृद्धिंगत करणारा असा हा सोहळा आहे. आज किती वर्षे झाली कुळकर्णी कुटुंबीयांना खामगांव सोडून परंतू स्मृती कायम आहे. आजरोजीपावेतो शेकडो लेख लिहिले पण बाईं विषयी लिहायचे ठरवून सुद्धा लिहिणे मात्र झाले नाही. अणे मॅडम , एम. आर. देशमुख सर यांच्या विषयी लेख लिहितांना कुळकर्णी बाईंची आठवण कित्येकदा प्रकर्षाने येऊन गेली पण योग काही आला नाही , प्रत्येक कार्याचा एक योग असतो तो आला की मग मात्र ते कार्य त्वरीत तडीस जाते. प्रसंगी विलंब होतो पण कार्य चांगले होते. कुळकर्णी बाई यांचे विषयी लिहिण्यास विलंब झाला खरा परंतू त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रमाच्या वेळी त्यांचेविषयी लिखाण झाल्याने मनास अत्यंत आनंद वाटतो आहे व त्यांच्याप्रती असलेली आदराची भावना योग्यवेळी प्रकट झाल्याने समाधान वाटते आहे. बाई तुम्हाला साष्टांग नमस्कार व आरोग्यपुर्ण व उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Khup mast
उत्तर द्याहटवाThank you
हटवाMastt
उत्तर द्याहटवाThank you
हटवाछान.
उत्तर द्याहटवागुरुजनांचा आदर आणि प्रेम फार सुंदर व्यक्त करणारा लेख. जुन्या आठवणी जाग्या झाल्या
उत्तर द्याहटवाThank you
हटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाThank you
हटवा