Click "Follow" Button below To Follow this Blog

१२/०८/२०२१

Man known as ‘Yavatmal’s Rancho’ dies in rotor blade mishap, ar

 नियतीने का छाटले पंख ?

हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्याने कार्य केले व त्याने पाहिलेले स्वप्न पुर्ण सुद्धा केले. येत्या रविवारी म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य दिनी , स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत प्रवेश करतांनाच्या वर्षात तो आपल्या स्वनिर्मित हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक करणार होता. या प्रात्यक्षिकासाठी त्याने 10 ऑगष्ट रोजी रात्री हेलिकॉप्टर परीक्षण करण्यासाठी म्हणून सुरु केले , ते सुरु झाले, इस्माईल पायलट सिटवर बसला तो आता उडान घेण्याच्या बेतात होताच परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

इस्माईल व त्याने बनवलेले हेलिकॉप्टर 

काल सायंकाळी बातम्या पाहात असतांना एक बातमी मनाला चटका लावून गेली, कोणत्याही संवेदनशील भारतीयाचे हृदय पिळवटून टाकेल अशी ती बातमी होती. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वेल्डिंग तसेच कपाट , कुलर फ्रीज बनवण्याचे काम करणा-या युवकाने एक स्वप्न पाहिले व ते पुर्ण करण्याच्या ध्यास घेतला होता. इस्माईल त्याचे नांव. इस्माईल शेख. शेख इब्राहिम यांचा लहान मुलगा. अल्पशिक्षित परंतू हुशार व जिद्दी. काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास असलेला. त्याने अल्पदरात मिळेल असे हेलिकॉप्टर बनवण्याचे स्वप्न पाहिले व त्याच्या निर्मितीचा ध्यास त्याने घेतला. दिवसभर दुकानात काम केले की रात्री इस्माईल हेलिकॉप्टर बनवण्याचे काम करीत असे. आज कित्येक तरुणांना मोबाईलचे व्यसन जडले आहे रात्र-रात्र ते मोबाईलवर मनोरंजन , वेब सिरीज पहात असतात. इतर तरुण जेंव्हा मनोरंजनात बुडलेले असत तेंव्हा इस्माईल आपल्या हेलिकॉप्टरसाठी झटत असे.   आपला राष्ट्रध्वज असलेल्या हेलिकॉप्टरला त्याने “मुन्ना हेलिकॉप्टर” असे नांव दिले होते. इस्माईलला मुन्ना या नावाने सुद्धा सर्व ओळखत असत. दुकानातील जुन्या साहित्यापासून त्याने हे हेलिकॉप्टर बनवणे सुरु केले होते. हेलिकॉप्टरच्या इंजीनसाठी त्याने जुन्या मारुती 800 या गाडीचे इंजिन वापरले. या हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्याने कार्य केले व त्याने पाहिलेले स्वप्न पुर्ण सुद्धा केले. येत्या रविवारी म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य दिनी , स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत प्रवेश करतांनाच्या वर्षात तो आपल्या स्वनिर्मित हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक करणार होता. या प्रात्यक्षिकासाठी त्याने 10 ऑगष्ट रोजी रात्री हेलिकॉप्टर परीक्षण करण्यासाठी म्हणून सुरु केले , ते सुरु झाले, इस्माईल पायलट सिटवर बसला तो आता उडान घेण्याच्या बेतात होताच परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते, अचानक मागील बाजूचा पंखा तुटून तो वरच्या पंख्यात अडकला व त्याचा तुकडा वेगाने इस्माईलच्या डोक्यावर आदळला, घाव वर्मी लागल्याने तो गंभीर जख्मी झाला व इस्माईलचा दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. स्वामी विवेकानंदांना असेच इस्माईलसारखे जिद्दी, मनी काहीतरी चांगला ध्यास बाळगणारे तरुण अपेक्षित होते. असे तरुणच  आपल्या मातृभूमीसाठी कार्य करुन उत्कर्ष करू शकतात, हिंसक तरुण नव्हे. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी असेच इस्माईलसारखे अनेक तरुण हवे आहेत. इस्माईलच्या दु:खद निधनानंतर त्याचेच विचार मनात घोळत होते. असे का झाले असावे ? इस्माईल कुठे चुकला असेल ? अपघात न होण्यासाठी म्हणून दक्षता घेण्यात काही कसूर झाला काय ? इस्माईल ने सुरक्षेसाठी हेल्मेट का नाही घातले ? हेल्मेट घातले असते तर त्याचा नक्कीच बचाव झाला असता. घरी निर्मिती करण्याचा प्रयत्न करणा-या तरुणांना सरकारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्र संबंधी कार्यालये सुरक्षेसाठी काय काळजी घेतली पाहिजे या संबंधित काही प्रशिक्षणे आयोजित करतात की नाही ? असे नानाविध विचार मनात आले. इस्माईलचा अर्थ शोधला. अरेबिक भाषेतील इस्माईल म्हणजे, प्रेषित अब्राहम आणि सारा या दाम्पत्याने पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून जी याचना केली होती ती कळकळीची मागणी व ती ईश्वराने पुर्ण केली असा काहीसा होतो. शिवाय अरबी लोक त्यांचा संस्थापक इस्माईल नावाचाच होता असे मानतात, इस्माईलचा एक अर्थ धाडसी असा सुद्धा होतो. 

     फुलसावंगीचा हेलिकॉप्टर निर्मिती करून भरारी घेण्याचे स्वप्न मनी बाळगणारा इस्माईल शेख त्याच्या नावाप्रमाणेच धाडसी होता. त्याच्या वडिलांचे नाव पण इब्राहिमच आहे. या छोट्या गावातील इस्माईलने पाहिलेले स्वप्न त्याने जिद्दीने पुर्ण तर केले परंतू एका छोट्याशा बिघाडाने त्याचा घात करून एका धडाडीच्या ,निर्मितीचा ध्यास बाळगणा-या जिद्दी , होतकरू तरुणाला मात्र काळाने आपल्यातून हिरावून नेले. स्वनिर्मिती करण्या-या तसेच भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढे येणा-या तरुणांना निर्मिती करतांना बाळगायची सुरक्षा याबाबत सरकारने निश्चितच प्रशिक्षणे वा तत्सम काहीतरी करण्याची नितांत आवश्यकता आहे. इस्माईलने जिद्दीने जुन्या , टाकाऊ साहित्यापासून बनवलेल्या हेलिकॉप्टरचा पंखा तुटला खरा , तो पंखा तर जुळेलही परंतू नियतीने मात्र एक मोठी झेप घेऊ पाहणा-या तरुणाचे पंख मात्र कायमचेच का छाटावे ? असा प्रश्न त्याचे आप्तजन व समस्त नागरिकांना त्याच्या दु:खद निधनानंतर पडतो आहे. आज 12 ऑगस्ट विश्व युवक दिवस आहे , इस्माईलसारख्या युवकाबाबत आजच्या दिनी शोकप्रद  लेख लिहिण्यापेक्षा 15 ऑगस्टला त्याच्या हेलिकॉप्टरच्या यशस्वी भरारीनंतर लिहिता आले असते तर किती बरे झाले असते. पण नियतीपुढे कोणाचे चालते? इस्माईलपासून अनेक युवा प्रेरणा घेतलीच हीच आशा आता बाळगूया.  युवा इस्माईलच्या कार्याला, त्याने केलेल्या निर्मितीला सलाम व त्याला भावपुर्ण श्रद्धांजली.   

४ टिप्पण्या: