Click "Follow" Button below To Follow this Blog

१९/०८/२०२१

Article about municipal election and its president

 नगराध्यक्ष विकासशील असावा.

शहराचा अध्यक्ष हा काही केवळ ते पद विभूषित  करणारा नसावा तर त्याला शहराच्या समस्यांची तेवढी जाण असावी व त्या समस्यांचे कसे निराकरण होईल यासाठी तो प्रयत्नशील असावा.

गत काही दिवसांपासून खामगांव नगर परिषदेच्या आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर खामगांवचा नगराध्यक्ष हा मुस्लिम असावा हा विषय छेडल्या गेला. खामगांव नगर परीषद ही जिल्ह्यातील एक जुनी नगर परीषद असून स्थापनेपासून म्हणजे 1867 पासून ते आजपावेतो या नगर परीषदेच्या अध्यक्षस्थानी एकही मुस्लिम व्यक्ती विराजमान होवू शकला नाही. भारतीय संविधानाला अनुसरून कुणीही भारताची नागरीक व्यक्ती ही निवडणूका लढून त्यात जिंकल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करू शकते , विविध पदे भुषवू शकते याला कोणताही समाज , पंथ , धर्म आड येत नाही. याच न्यायाने आजपावेतो अनेक ठिकाणी अनेक धर्माच्या लोकप्रतिनिधींनी विविध पदे भुषवली आहेत. स्वातंत्र्यापासून पाहायचे झाले तर राष्ट्रीय पातळीवर मौलाना आझाद – स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री , फकरुद्दीन अली अहमद - राष्ट्रपती  , नजमा हेपतुल्लाह- राज्यसभा उपसभापती , ए पी जे अब्दुल कलाम- राष्ट्रपती, हमीद अंसारी –उपराष्ट्रपती, गुलाम नबी आजाद, शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी , तारिक अन्वर, अबू आझमी इ. विविध पक्षांच्या अनेक मुस्लिम व्यक्तींनी या भारत देशाची विविध संवैधानिक पदे विभूषीत केली आहेत. इतरही अनेक धर्मीयांनी सुद्धा भारतीय राजकारणात ठसा उमटवला आहे. गाव पातळीवर सुद्धा अनेक ठिकाणी मुस्लिम तथा इतर धर्मियांनी प्रतिनिधित्व केले आहे. या अनुषंगाने खामगांवचा नगराध्यक्ष मुस्लिम होत असेल तर त्यात वावगे असे कुणाला काही वाटणार नाही. आपले संविधान हेच मुळात सर्व नागरिकांना न्याय मिळेल असेच आहे. संविधानात सर्वांना सर्व क्षेत्रात समानता अपेक्षित आहे. त्यामुळे कुणीही निवडणूक लढवून जोड-तोड न करता, दल न बदलता कोणतेही पद प्राप्त करत असेल तर या लोकशाही भारतातील नागरिक त्याचा स्विकारच करतात हे सर्वश्रुत आहे.

    खामगांवात जरी आजपावेतो नगराध्यक्ष पदी कुणी मुस्लिम व्यक्ती पोहोचला नसला तरी उपाध्यक्षपद मात्र मुस्लिम व्यक्तीने भूषवले आहे. खामगांव शहराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास खामगांव नगर परिषदेच्या स्थापनेवेळी असलेली शहराची लोकसंख्या व आताच्या लोकसंख्येत लाक्षणिक असा बदल झाला आहे. नविन राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत. पदाची महत्वाकांक्षा कुणीही निवडून आलेला राजकारणी ठेवू शकतो त्यात काहीही गैर नाही परंतू राजकीय पद मिळवायचे ते कशासाठी ? आज खामगांव शहराच्या कितीतरी समस्या आहेत , शहराचा अधिक विकास होणे गरजेचे आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी. शहरातील अनेक नव्या वस्त्यात अद्यापही नळ नाहीत, ज्यांच्याकडे आहेत त्यांना 9 दिवसांनी पाणी पुरवठा होतो , अनेक भागातील रस्ते खराब आहेत, अनेक ठिकाणी पथदिवे नाहीत , नाल्या तुंबलेल्या असतात , काही ठिकाणी सुशिक्षित लोकांनी सर्विस लाइन , रस्ते यांवर अतिक्रमण केले आहे , नगर परीषद शाळांची अवस्था बिकट आहे, डंपींग ग्राऊंड व तिथे जाळल्या जाणा-या कच-यामुळे त्या परीसरात होणारे प्रदूषण, नागरीकांच्या तक्रारींना दाखवली जाणारी केराची टोपली अशा नाना समस्या आहेत. या समस्या लक्षात घेता शहराचा अध्यक्ष हा काही केवळ ते पद विभूषित करणारा नसावा तर त्याला उपरोक्त समस्यांची तेवढी जाण असावी, त्या समस्यांचे कसे निराकरण होईल यासाठी तो प्रयत्नशील असावा. कोणत्याही जाती, धर्माच्या व्यक्तीने राजकीय पद प्राप्तीची आशा जरूर बाळगावी परंतू त्या पदावर आल्यावर जनतेला भेडसावणा-या त्यांच्या समस्यांकडेही तेवढेच लक्ष देणे अपेक्षित आहे. नगराध्यक्ष मुस्लिम असो वा हिंदू  किंवा आणखी कुण्या धर्माचा असो प्रथम तो विकासशील असा असावा. पंचायत राज व्यवस्था गांधींजींना यासाठी अपेक्षित होती की स्थानिक पातळीवर विकास झाला तर आपोआपच देश विकसित होण्यास हातभार लागेल आणि म्हणून हा देश विकसित करायचा असेल तर स्थानिक पातळीवरील नेते , नगरसेवक , नगराध्यक्ष , सरपंच , जि. प. सदस्य व अध्यक्ष , पं. स. सदस्य व अध्यक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोक कुण्या का जाती धर्माचे असो त्यांनी प्रथम आपला देश, राज्य, जिल्हा , तालुका, शहर व ग्राम हे कसे विकसित करता येतील यालाच सदैव प्राधान्य देऊन आपआपल्या पातळीवर विकासाची पाऊले उचलणे आवश्यक आहे. हे पाहू जाता जो कुणी खामगांवचा नगराध्यक्ष होईल त्याने शहरप्रेमी, शहरासाठी झटणारा, व त्याची कारकीर्द खामगांवकरांच्या चिरकाल स्मरणात राहील असे जनहिताचे कार्य करणारा ,निर्णय घेणारा तसेच विकासशील असा असावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा