धन्य धन्य “एकनाथा”...
बाळासाहेबांनी जनमानसाची नस अगदी बरोबर ओळखली, ती नस पकडण्यात दुर्दैवाने उद्धव ठाकरे तूर्तास तरी अपयशी ठरल्याचे चित्र दिसते आहे. आगामी काळात शिवसेनेची वाटचाल कशी राहील ? असा प्रश्न शिवसैनिक व जनतेला पडला आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या खेळीने “धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी आमुचा माथा” म्हणत एक-एक आमदार एकनाथ शिंदे यांना चरण स्पर्श करीत गुवाहाटीत दाखल होत आहे.
परवा पासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गदारोळ सुरु आहे. विधान परीषद निवडणूक होत नाही तोच शिवसेना या बाळासाहेबांचा शब्द प्रमाण असलेल्या पक्षात मोठी बंडाळी झाली. सुरुवातीला एकनाथ शिंदे या जेष्ठ नेत्यासह 30 आमदार सुरतला भुर्र उडून गेले. ही आमदार संख्या वाढतच आहे व काही खासदार सुद्धा त्यांच्या संपर्कात आहेत. भावना गवळी यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. आमदार मुंबई सोडून जात असल्याचा मविआ सरकारला काहीच कसा सुगावा लागला नाही हे सुद्धा आश्चर्यच आहे. तशी या पक्षात यापुर्वीही बंडाळी झाली आहे. गणेश नाईक, छगन भुजबळ, नारायण राणे , राज ठाकरे यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र करीत वेगळी वाट धरली. परंतू एकनाथ शिंदे यांनी दिलेला झटका मात्र फार मोठा आहे. तिकडे अफगाणिस्थानात मोठा भूकंप झाला आणि इकडे शिंदे यांनी मोठा राजकीय भूकंप करून शिवसेना पक्षालाच मोठे खिंडार पाडले. या बंडानंतर अनेक मते मतांतरे व्यक्त झाली व होत आहेत. शिवसेना पक्षाचाच हा डाव असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. शिवसेना पक्षाचाच हा डाव असल्याचे म्हणणे मात्र तितकेसे न पटणारे आहे कारण हीच खेळी खेळायची होती तर त्यांनी मविआ सरकारच का स्थापन केले असते ? शरद पवार यांच्या आग्रहाने मुख्यमंत्री झालो असे काल फेसबुक लाइव्हवर आपल्या जन संबोधनात उद्धव ठाकरे म्हणाले. तेंव्हा गटनेतेपदी एकनाथ शिंदे होते. जो गटनेता असतो तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो हे सर्वश्रुत आहे तरीही त्यांना डावलून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी शरद पवार व सोनिया गांधी यांच्या आग्रहास्तव कोणताही प्रशासकीय अनुभव नसतांना आरूढ झाले असे त्यांनी स्वत: काल सांगितले. कुणी विहिरीत उडी मार म्हणून म्हटले तर ती मारायची की नाही हे उडी मारणा-यानी ठरवायचे असते त्याने म्हटले म्हणून मी उडी मारली असे नसते. शिवाय ते मुख्यमंत्री झाले व आदित्य ठाकरे सुद्धा आमदार व नंतर कॅबिनेट मंत्री झाले, निवडणूकीत त्यांच्यासाठी वरळी मधील जागा सोडावी लागली होती. पक्षासाठी झटणा-या, सतरंज्या उचलणा-या, आंदोलने, सभा यांसाठी राबणा-या कार्यकर्त्यांना डावलून केवळ पक्षश्रेष्ठींचा नातू, मुलगा म्हणून थेट मोठ्या पदी वर्णी लावणे याने निष्ठावान कार्यकर्त्यांत कुठेतरी खदखद, असंतोष हा निर्माण होतच असतो व हे सर्व पक्षांसाठी लागू आहे. याच कारणामुळे गतवर्षी काँग्रेस पक्षात सुद्धा राहुल गांधी यांच्या नियुक्ती वरून गटबाजी झाली होती. त्याहीपूर्वी काँग्रेस पक्षात हे झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुद्धा सर्व आलबेल आहे असे नाही. सकाळचा शपथविधी हा त्याचाच एक नमुना होता. इतरही पक्षात घराणेशाहीमुळे असंतोष/फुट पडल्याचे दाखले आहेत. इतिहासात सुद्धा अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस, सोनिया गांधी, शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली त्यांच्या पक्षातील घराणेशाहीवर कित्येकदा तीव्र आक्षेप घेतला त्यांच्याच शिवसेना पक्षातील आजच्या बंडाळीचे एक कारण घराणेशाही हे सुद्धा आहे. घराणेशाहीचा, पुत्र मोहाचा पहिला आघात बाळासाहेबांच्या हयातीतच राज ठाकरे यांच्या शिवसेना सोडून जाण्याने झाला. तर यावेळी याच घराणेशाहीमुळे आदित्य ठाकरे यांना पक्षातील जेष्ठ नेत्यांपेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले होते. आदित्य ठाकरे यांच्यावरच मोठ्या जबाबदा-या टाकणे, जेष्ठांना डावलणे, मुख्यमंत्र्यांचे पक्षातील मंडळीस वेळ न देणे, शिवसेनेची पुर्वीची कट्टर हिंदुत्वाची विचारधारा सुटणे, संजय राऊत यांची विनाकारणची वक्तव्ये व त्यांना मिळालेले आवाजवी महत्व, शिवसेना पक्षाचा जो स्वभाव बाळासाहेबांच्या कारकिर्दित होता तो स्वभाव सोडून पूर्वीच्या विरोधकांसोबत तडजोड करणे, मवाळ धोरण अंगीकारणे, पक्षातील आमदार, मंत्री यांच्याऐवजी आघाडीतील आमदार व मंत्री यांच्या कामांना प्राधान्य देणे, अशी काही या बंडाळीची कारणे आहेत. आज शिवसेना पक्षाची जी वाताहत होतांना दिसते आहे, एवढी वाताहत की पक्ष चिन्हा बाबत सुद्धा आता दावा होण्याची शक्यता आहे. हे शिवसैनिकांसाठी निश्चितच वेदनादायी आहे. परंतू ज्या क्षणी मविआ आघाडी स्थापन झाली होती त्याचवेळी शिवसेना पक्षाच्या भविष्याची चिंता शिवसैनिक व जनतेला निर्माण झाली होती. पक्ष स्थापनेपासून शिवसेना पक्षाची असलेली भूमिका, स्वभाववृत्ती, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण, स्पष्ट व रोखठोकपणा या सर्वांचा त्याग करून एकदम कोलांटी उडी मारून उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक आघाडी केली तेंव्हाच शिवसेना पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. शिवसेनेतील बंडाळीस घराणेशाही हे एक कारण निश्चितच दिसत आहे, काँग्रेस पक्षाने जसे एका कुटुंबातील एकालाच तिकीट दिले जाईल असा निर्णय त्यांच्या बैठकीत घेतला होता त्याप्रमाणे सर्व पक्षांनी सुद्धा असा विचार करणे जरुरी आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या एका व्यंगचित्रकार असलेल्या कलाप्रेमी युवकाने शिवसेना हा पक्ष स्थापन केला, जातपात न पाहता मनोहर जोशी , सुधीर जोशी , छगन भुजबळ , आनंद दिघे , नारायण राणे इ लोकांना आपल्यासह घेतले व राजकारणात शिवसेना या पक्षाचे एक स्थान निर्माण केले. महाराष्ट्राबाहेर व महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फारशी वाढ न झालेल्या या पक्षाने जनमानसाची नस अगदी बरोबर ओळखली, ती नस पकडण्यात दुर्दैवाने उद्धव ठाकरे तूर्तास तरी अपयशी ठरल्याचे चित्र दिसते आहे. आगामी काळात , राजकारणात शिवसेनेची वाटचाल कशी राहील ? असा प्रश्न शिवसैनिक व जनतेला आता पडला आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या खेळीने “धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी आमुचा माथा” म्हणत एक-एक आमदार एकनाथ शिंदे यांना चरण स्पर्श करीत गुवाहाटीत दाखल होत आहे.
खूप छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवाएकदम बरोबर, पण जवळपास 25 वर्षा पुर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक बस स्टॉप वर शिवसेनेचा वाघ असलेला शाखेचा फलक दिसायचाच, बाळासाहेब हयात असे पर्यंत "सामना" ला अनन्यसाधारण महत्व होते, लोक त्याची आतुरतेने वाट पहायचे .
उत्तर द्याहटवाआता हे सर्व इतिहासजमा झालेय.