Click "Follow" Button below To Follow this Blog

०९/०६/२०२२

Article about Subhash Desai statement in Aurangabad

विक्रमादित्याचे नांव घेण्यापेक्षा विकासाचा विक्रम सांगावा

मविआ सरकारने  खरोखर  अनेक विक्रम केले आहेत. त्यात वाझे प्रकरण अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे,अनिल परब, खोटी कागदपत्रे सादर करण्याचे प्रकरण अशा नाना विक्रमांचा समावेश आहे.

राज ठाकरे यांची सभा , त्यानंतर जल आक्रोश मोर्चा यानंतर संभाजीनगर येथे काल शिवसेनेची स्वाभिमान सभा संपन्न झाली. संभाजीनगर नामांतरण प्रश्न कसा निकाली काढावा हा संभ्रमच असल्याने संभाजी महाराज यांचा मोठा पुतळा तेवढा व्यासपीठावर ठेवण्यात आला होता. नामंतरणापेक्षा रोजगार, पाणी इ प्रश्न मोठे आहे असे अबू आझमी यांच्या वक्तव्याशी मिळते जुळते विधान मुख्यमंत्र्यानी केले. या सभेला उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी काही नेत्यांनी संबोधित केले. यात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा सुद्धा समावेश होता. सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहून सुभाष देसाई यांनी अत्यानंदीत होऊन आपल्या भाषणात शिवसेनेने शिवसेनेच्याच सभेला होणा-या गर्दीचा विक्रम मोडला असे म्हटले व या अनुषंगाने हिंदू चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य राजाच्या नावाचा विशेषण म्हणूूून सुद्धा उपयोग केला. पण हिंदूंच्या त्या चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्याने एकट्याने साम्राज्य प्रस्थापित केले होते त्यासाठी लाचारी , अभद्र आघाड्या केल्या नव्हत्या याचे देसाईंना स्मरण आहे की नाही देव जाणे. तसे पाहिले तर सभांना होणाऱ्या गर्दीचा विक्रम करण्यापेक्षा भारतीय राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांच्या  विकास कामांचा विक्रम स्थापित करायला हवा व तो जाहीर सभांमधून सांगायला हवा. राजकीय पक्षांच्या सभा होतात त्यात कुरघोड्या ,टोमणे,एकमेकांवर टीका-टिपणी, शेेेलके शब्दप्रयोग हे करण्यापेक्षा आपल्या पक्षाने कोण-कोणती विकास कामे केली, समाजासाठी काय केले, कोणते उपक्रम राबवले जाहीरनाम्यातील वचने पूर्ण केली का? हे जनतेला सांगायला हवे. विक्रमादित्य राजाचा सुभाष देसाई यांनी केलेल्या उल्लेखामुळे विक्रमादित्य या भारतीय इतिहासातील एक थोर, अत्यंत उदार व न्यायप्रिय राजाचे स्मरण झाले. तो त्याच्या रत्नजडित सिंहासनावर बसून न्यायदान करीत असे. विक्रमादित्यानंतर त्याचा वंशज राजा भोज हा एकदा शिकारीला गेला असता त्याला जंगलात एक मुलगा एका उंच मातीच्या ढिगाऱ्यावर बसून त्याच्या मित्रांमधील तंटा सोडवत होता व उत्कृष्ट न्यायदान करत होता असे दृश्य दिसले. त्याला वाटले की एवढा लहान मुलगा इतके चांगले न्यायदान कसे करू शकतो? यात काही स्थान महात्म्य तर नाही ना? म्हणून त्याने तो मुलगा ज्या मातीच्या ढिगार्‍यावर बसून न्यायदान करीत असे तो मातीचा ढिगारा खोदून काढला. तेव्हा त्याला त्या ढिगाऱ्याखाली विक्रमादित्याचे सिंहासन सापडले. विक्रमादित्याच्या नि:पक्ष न्यायदानामुळे त्या सिंहासनास तेवढे पावित्र्य प्राप्त झाले होते. पुढे जेव्हा त्या सिंहासनावर राजा भोज आरूढ होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा उधार व न्यायप्रिय असलेल्या विक्रमादित्याच्या त्या सिंहासनावर बसण्यास त्याला  सिंहासनावरील प-या प्रकट होऊन तुझ्या मध्ये सुद्धा जर विक्रमादित्यासारखेच गुण असतील तर तू या सिंहासनावर बसण्याचा अधिकारी ठरशील असे राजा भोज यास म्हणतात. राजा भोज आत्मपरीक्षण करू लागतो. असे आत्मपरीक्षण सांप्रतकालीन नेत्यांनी सुद्धा करणे आवश्यक झाले आहे. सभेला झालेल्या गर्दीचा विक्रम या अनुषंगाने देसाईंनी विक्रमादित्याचा उल्लेख केला असे जरी असले तरी मविआ सरकारने मात्र खरोखर  अनेक विक्रम केले आहेत. त्यात वाझे प्रकरण अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे,अनिल परब, खोटी कागदपत्रे सादर करण्याचे प्रकरण अशा नाना विक्रमांचा समावेश आहे यात इतरही काही जणांचा समावेश आहे. यांच्याबाबत कारवाई करतांना नायप्रिय राजा विक्रमादित्याप्रमाणे त्वरित  व 
न्याय्य कारवाई का केली गेली नाही? कारवाई करतांना विलंब का झाला? निव्वळ न्यायी राजा विक्रमादित्याचे नांव घ्यायचे, विशेषण लावायचे परंतू कृती मात्र अगदी उलट. मविआ सरकार वरीलपैकी काही व्यक्तींवर केंद्र सरकार हे इडी, सीबीआयच्या माध्यमातून ही कारवाई हेतुपुरस्सर करत आहे असे जरी म्हणत असले तरी या सरकारमधील व्यक्तींची काही जुनी प्रकरणे मात्र निश्चितच आहेत, कारण काही दिवसांपुर्वी संजय राऊत सुद्धा "काही जुनी  प्रकरणे उकरून काढली जात आहेत" असे म्हणाले होते. याचाच अर्थ प्रकरणे आहेत. खंडणी, भ्रष्टाचार, अनैतिकता इ अनेक विक्रम करणा-या मविआ सरकार मधील नेत्यांच्या नावावर नोंदवले जात असतांना देसाई साहेबांनी केवळ सभेला झालेल्या गर्दीला हुरळून त्या गर्दीचा विक्रम सांगण्यापेक्षा व न्यायप्रिय, चक्रवर्ती हिंदू राजा विक्रमादित्यच्या नावाचा विशेषण म्हणून उपयोग न करता आपल्या विकास कामांचा विक्रम जनतेला सांगावा.

1 टिप्पणी: