Click "Follow" Button below To Follow this Blog

१४/०७/२०२२

Article on the occasion of Guru Paurnima , a Indian festival

 गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने



गिरीशचे शाळेत येणे , आशुतोषचे आवर्जून फोन करणे मला पुन्हा विचारात पाडून गेले. बाहेर पावसाच्या धारा बरसत होत्या तर माझ्या डोक्यात विचारांच्या. 

गेल्या तीन दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रभर पाऊस सुरु आहे. कालच्या पावसात तो शाळेत आला. मला वाटले शाळेत काही काम असेल म्हणून आला असेल शिवाय त्याचे मामाही आमच्याच शाळेत कार्यरत. त्याने अभिवादन केले , मी संगणक कक्षात गेलो. थोडयावेळाने तो तिकडे आला एक  छान लांब दांडीचे लाल गुलाब पुष्प दिले, पुष्प देतांना खाली वाकत म्हणाला, “सर आज गुरु पौर्णिमा, आशीर्वाद द्या”, “अरे आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे” मला नंतर एकदम आठवले की दर गुरु पौर्णिमेला शाळेत येण्याचा सर्व शिक्षकांना नमस्कार करण्याचा त्याचा नेमच आहे. हा विद्यार्थी म्हणजे गिरीश देशमुख, आज त्याला शाळा सोडून किमान 7-8 वर्षे तरी झाली असतील. मी कौतुकाने त्याच्याशी संवाद साधला आणि आजच्या जमान्यातील जणू अत्यावश्यकच झालेला सोपस्कार पार पाडला , तो सोपस्कार म्हणजे सेल्फी (सोबत जोडला आहे). गिरीश आमच्या शाळेत दाखल झालेला ग्रामीण विद्यार्थी , शांत वृत्तीचा असा विद्यार्थी आपल्या कुटुंबास स्थिरस्थावर करण्यासाठी झटणारा, आता तर तो विवाहितही आहे परंतू आपल्या जीवनाच्या धकाधकीच्या रहाटगाडग्यात तो हमखास गुरु पौर्णिमेला शाळेत येतो. त्यानंतर गुरु पौर्णिमेच्या अर्थात व्यास पौर्णिमेच्या दोन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला त्यामुळे भगवंत श्रीकृष्ण – सांदिपनी , आरुणी-धौम्य, कर्ण-परशुराम , अर्जुन- द्रोणाचार्य , कबीर- रामानंद , विवेकानंद- रामकृष्ण या अशा अनेक शिष्य गुरूंच्या जोड्यांपासून ते हल्लीच्या सचिन तेंडूलकर-रमाकांत आचरेकर सर या गुरु शिष्य जोडी पर्यंतच्या गुरु शिष्यांचे स्मरण होत होते , शाळेतून घरी जातांना गाडी चालवतांना भारताच्या या गुरु शिष्य परंपरेचे विचार मनात घोळत होते. शिक्षणाचे व्यवसायीकरण होत असलेल्या काळात , गतिमान अशा काळात विद्यार्थी हे क्लासेस , शाळांत येतात अनेक व्यापांसह त्यांना शिक्षण देण्याचे कार्य पार पडते व पुन्हा दुसरे विद्यार्थी दाखल होतात त्यामुळे पुर्वीसारख्या गुरु शिष्यांच्या जोड्या आता मात्र दिसेनास्या झाल्या. पुर्वीचा गुरु 

“ साई इतना दिजीये ज्या में कुटुंब समाय , 

मै भी भुका न रहु साधु न भुका  जाये” 

या वृत्तीने शिष्यांना ज्ञान दान करीत असे , त्याच्या सुख-दु:खात सहभागी होत असे व त्यामुळेच तो त्याच्या शिष्यांना प्रिय होत असे एवढेच नव्हे तर गुरुपत्नी ही शिष्यांची माता बनून त्यांच्यावर माया करीत असे. आज गुरु व शिष्यांमध्ये असे संबंध नाहीत. हे विचार सुरु असतांनाच फोन खणाणला स्क्रीनवर आशुतोष नांव दिसले , “बोल आशुतोष” म्हणत फोन रिसीव्ह केला परंतू नेटवर्क एरर मुळे माझाच आवाज मला परत येत होता ,”उद्या कॉल करतो” म्हणून आशुतोषला मेसेज टाकला. आशुतोष, आशुतोष शुक्ल , आशुतोष म्हणजे माझा संगणकाचा विद्यार्थी. साधासुधा , सिन्सियर नवोदय मध्ये शिकणारा, संगणक शिकण्यासाठी म्हणून खामगांवला येणा-या आशुतोषचे पिता हे संगीत शिक्षक आशुतोषला सुद्धा संगीताची चांगली जाण , मी मात्र संगणक शिक्षक त्यामुळे माझा सुरांशी संबंध नाहीच तरी आमचे सुर जुळले. एके प्रसंगी आशुतोषला अभ्यासाव्यतिरिक्त केलेल्या मार्गदर्शनामुळे त्याचे माझ्या कुटुंबाशी चांगले संबध प्रस्थापित झाले. आज आशुतोष रेडीओ सिटीचा एक लोकप्रिय RJ म्हणून प्रसिद्ध आहे , त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छांसाठी   आशुतोषने तो कॉल केला होता हे बोलणे झाल्यावर कळले. “हैप्पी टीचर्स डे सर” असे टीचर्स डे ला म्हणून शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्या-या डे पेक्षा गुरु पौर्णिमा हा आपल्या हिंदू संस्कृतीचा आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला साजरा होणारा , महर्षी व्यासांचा जन्म दिवस असणारा, गुरूंप्रती आपल्या आदराच्या भावना व्यक्त करणारा हा दिवसच अधिक जवळचा, अधिक आत्मीय असा वाटतो. गुरु पौर्णिमा हा सण भारतीय उपखंडातील अनेक देशांत साजरा होतो. नेपाळ मध्ये तर या दिनी राष्ट्रीय सुटी असते. अशा या गुरु पौर्णिमेला गिरीश व आशुतोष या माझ्या दोन विद्यार्थ्यांनी माझ्याशी आठवणीने संपर्क केला , कुठे तरी सुखावलो परंतू असे प्रसंग जबाबदारी आणखी वाढवत असतात. गिरीशचे शाळेत येणे , आशुतोषचे आवर्जून फोन करणे मला पुन्हा विचारात पाडून गेले. एकीकडे पावसाच्या धारा बरसत होत्या तर माझ्या डोक्यात विचारांच्या. 

      या भारत वर्षात पुर्वीच्या गुरु-शिष्य परंपरेप्रमाणे पुनश्च गुरु व शिष्य यांच्यातील प्रेमाच्या ओलाव्याचे , सुहृद असे संबंध प्रस्थापित होवोत. नालंदा , तक्षशीला सारखी विद्यापीठे असणा-या, ज्ञान हे दान समजल्या जाणा-या भारतात तरी  त्यांच्यातील संबंध हे व्यापारी / ग्राहक यांच्यात जसे रुक्ष संबंध असतात तसे नसावेत. आजचा विद्यार्थी सुद्धा त्याच्या शिक्षकाशी सदैव जुळलेला असावा त्याच्यात व त्याच्या शिक्षकांत तसाच पूर्वीच्या गुरु-शिष्यांप्रमाणे प्रेम व आपुलीकीचा भाव प्रस्थापित व्हावा. असे झाले तर आजच्या काळात नानाविध कारणांनी, तंत्रज्ञानामुळे नको त्या गोष्टी त्याच्या अगदी हाताच्या बोटांवर आल्याने चिंतीत, व्यथित , गोंधळलेल्या , अंतर्मुख झालेल्या विद्यार्थ्यास कदाचित गुरु सोबतचे आत्मीय , सुहृद संबंधच तारतील असे वाटते. 

२ टिप्पण्या:

  1. खुप छान.गुरूंनी जे काही ज्ञान विद्यार्थांना दिले .त्याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवणे ही गुरुं साठी खरी आनंदाची गोष्ट. ठरते.

    उत्तर द्याहटवा
  2. Good teacher make Good student and vice-versa!

    उत्तर द्याहटवा