वाचाळवीर स्पर्धा असावी.
बालपणापासून वक्तृत्व स्पर्धा , वादविवाद स्पर्धा तुम्ही सर्व ऐकत , वाचत आले असालच परंतू आता आणखी एक स्पर्धा सुरू करण्याची वेळ आली आहे. परंतू ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी नसून लोकप्रतिनिधींसाठी असावी असे वाटते. असे सुचवण्याचे कारण हे की देश/राज्य चालविण्याऐवजी सांप्रतकालीन लोकप्रतिनिधी हे त्यांचे मुख्य कार्य सोडून , विकासादी विषयांबाबत भाष्य करणे सोडून विविध मुद्दे खास करून जुन्या , ऐतिहासिक गोष्टी , राष्ट्रपुरुष , क्रांतीवीर , क्रांतिकारक यांच्याविषयी विनाकारणची , उपटसूंभ अशी वक्तव्येच जास्त करीत बेभान सुटले आहे.
आताचे नुकतेच उदाहरण म्हणजे राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा चांगली सुरळीत सुरू होती, त्यांची भाषणे ही विशेष प्रभावी नसली तरी व्यवस्थित होती. महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्यावर मात्र त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विनाकारणची वक्तव्ये केली जी त्यांनी यापुर्वी सुद्धा केली आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा सर्वत्र तीव्र निषेधच झाला आणि तो होणे अपेक्षितच आहे कारण सावरकरांना अवघ्या महाराष्ट्रात मोठे सन्मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात ज्या सावरकर यांना विशेष जागा आहे त्या सावरकरांविषयी राहुल गांधी यांच्या मनात एवढा द्वेष का आहे हे ही एक कोडेच आहे ? त्यांना सावरकर यांच्याविषयी काही तरी ज्ञान आहे का ? खरे तर कुण्याही लोकप्रतीनिधीने कोणत्याही स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाविषयी द्वेष बाळगायलाच नको. सावरकर यांच्याविषयी बोलल्यानंतर टिका व्हायला लागली तेंव्हा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील भाषणांत ते बॅकफुटवर आल्यासारखे वाटत होते. “हमे किसीसे नफरत नही” वगैरे सारख्या सारवासारव करणा-या वाक्यांसारखी वाक्ये ते बोलले. त्यांचे सावरकर यांच्याविषयीच्या वाक्याचे धुमारे धूसर होत नाही तोच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार व नितीन गडकरी यांच्याशी करून आणखी एक वाद उपस्थित केला. राहुल गांधी , कोश्यारी , संजय राऊत यांच्यासह इतर सर्वच लोकप्रतिनिधी आता कमी अधिक प्रमाणात विनाकारणची वक्तव्ये करून नाहक वाद निर्माण करीत असतात. म्हणूनच या लोकप्रतिनिधींसाठी एखादी वाचाळवीर स्पर्ध्याच का असू नये असेच आता वाटू लागले आहे. महाराष्ट्रात तर हल्ली निव्वळच बोलघेवडेपणाच सुरू असतो. राज्यशकट कसा काय हाकला जातो आहे देव जाणे ? खोके , गद्दार आणखी नाना शब्दप्रयोग करून एकमेकांना डिवचणे सुरू असते. लोकप्रतिनिधी महिला सुद्धा यात काही कमी नाही पेडणेकर बोलतात काय ? चित्रा वाघ संतापतात काय ? , नवनीत राणा पोलिसांशी अरेरावी काय करतात? अंधारे पक्ष बदलताच किती पलटी मारतात. तर या वाचाळपणात महिला सुद्धा मागे नाही. गुलाबराव पवार , राणे , खडसे , महाजन मंडळी अशी सर्वच निव्वळ एकमेकांवर चिखलफेक , एकमेकांशी शाब्दिक चकमकी करत असतात. कोणत्याही पक्षातील नेत्यांनी जुन्या स्वातंत्र्यसेनांनी बाबत अवाक्षरही काढू नये अशीच अपेक्षा जनतेला आहे. जनतेला त्यांचे प्रश्न सोडवून हवे आहेत जुनी पेन्शन, होमगार्ड , अंगणवाडी, पाणी अशा अ नेक समस्यांचे निराकरण जनतेला हवे आहे त्यांना वृथा वलग्ना नकोत.
लोकप्रतींनिधींनो तुमची नाहक वक्तव्ये ऐकून जनतेचे कान अगदी किटून गेले आहेत. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे ते राज्य चालवण्यासाठी तुमचा वाचाळपणा ऐकण्यासाठी नव्हे. तुमच्या वाचाळपणानंतर जनतेमध्ये सुद्धा हेवेदावे होऊ लागले आहे. खरे तर लोकप्रतिनिधी यांच्या वाचाळपणाबद्दल यापुर्वीही कित्येकदा लिहिले आहे परंतू याविषयावरचे लिखाण कधी संपेल असे वाटतच नाही एवढा यांचा वाचाळपणा हल्ली सुरू असतो आणि म्हणूनच लोकप्रतींनिधींसाठी “वाचाळवीर स्पर्धा” का असू नये असेच वाटू लागले आहे. ही स्पर्धा घेतल्यावरही वाचाळवीर कोण ठरेल हेही सांगता येत नाही कारण? वाचाळपणात हे एकमेकांपेक्षा तसूभरही कमी नाही.