Click "Follow" Button below To Follow this Blog

१०/११/२०२२

Article about Bhide Guruji Statement about Bindiya, Indian ladies holy symbol.

 तेरी बिंदीया रे ....



हल्ली बिंदीया, झुमका व अस्सल भारतीय आभूषणे लुप्त होत चालली आहेत. लग्न , समारंभ व फोटो काढण्यापुरता तेवढा त्यांचा उपयोग होतो. आभूषणांसह लज्जा हे स्त्रीचे नैसर्गिक आभूषण सुद्धा लुप्तप्राय होत चालले आहे. 
        साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे जेंव्हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते भिडे गुरुजींना प्रश्न विचारायला गेल्या असता , "तू पहिले कुंकू लाव , मग तुझ्याशी बोलेल" असे उत्तर भिडे गुरुजींनी दिले. महिलांनी कुंकू , टिकली लावावी की नाही ? यावर भिडे गुरुजींच्या वक्तव्यानंतर बराच ऊहापोह व गदारोळ सुरु झाला. अद्यापही सुरुच आहे.  तसा आपल्या देशात आता गदारोळ सुरु होण्यास काहीच वेळ लागत नाही. तोंडातून एक एक शब्द उच्चारतांना किंवा लिहितांना दहा वेळा विचार करावा लागतो. आपल्या बोलण्याचा कोण काय अर्थ काढेल , काय विपर्यास करेल याचा काही  नेमच आताशा  राहिलेला नाही. म्हणूनच या लेखात कुणाचे समर्थन अथवा कुणाचा अपमान यावर भाष्य करण्यापेक्षा कुंकू , कुंकू लावणा-या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया , कुंकू संबंधीत गीत, कुंकुवाची परंपरा  यावर भाष्य केले आहे. 

        मी व माझ्या पिढीतील प्रत्येकानेच त्यांच्या आई , आजी व इतर महिला नातेवाईकांना ठसठसीत कुंकू लावलेले पाहिलेले आहे, त्या लावायच्या म्हणून आम्ही पण लावलेच पाहिजे का ? या प्रश्नाचे उत्तर देऊन पुढे अधिक वाद वाढवण्यापेक्षा मी उत्तर न देणेच पसंद करेल. पण कुंकू/ टिकली स्त्रियांच्या सौंदर्यात अधिक भर घालेल असाच सौभाग्यालंकार आहे. माझी आज्जी कपाळाला मेण लाऊन मग त्यावर कुंकू लावत असे. माझ्या मोठ्या मामींचे कुंकू सुद्धा एकदम मोठे, ठसठसीत असे. ठसठसीत भारदस्त कुंकू लावणा-या स्त्रिया ह्या मला बालपणी रुबाबदार व करारी अशा भासत असत. त्यात नऊवारी नेसली असेल तर त्यांच्या रुबाबात अधिकच भर पडत असे. बालपणी सर्वच कुंकू लावलेल्या स्त्रिया पाहिलेल्या मला महाविद्यालयात गेल्यावर सहपाठी मुली ह्या टिकली लावलेल्या दिसत असत आणि हल्ली तर  टिकली पण गायब झाली आहे. हल्लीच्या मुलींना टिकली लावाविसी वाटत नाही त्यांना सांगूनही त्या तसे करीत नाही हा जनरेशन गॅॅप आणि काळाचा महिमा आहे. उच्च शिक्षण घ्यावे, आधुनिक व्हावे पण रिती-रिवाज, धार्मिक मूल्ये परंपरा का सोडाव्या? असे म्हटल्यावर स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या पोशाखाबाबत बोलायला कमी करणार नाही. नामांकित लेखिका , ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या सासूबाई , नारायण मूर्ती यांच्या भार्या सुधा मुर्ती धनिक, उच्चविद्याविभूषित असूनही किती साध्या राहतात म्हणूनच त्यांची एक वेगळीच छाप पडते. परवा भिडे गुरुजींना त्यांनी लवून नमस्कार केल्यावर त्यांच्यातील संस्कार व नम्रता दिसून आली. इकडे आपण पाश्चात्यांचे अनुसरण करीत आहोत आणि तिकडे विदेशातील अनेक तरुणी मात्र साड्या , कुंकू असा भारतीय पेहराव पसंत करीत आहेत. भारतीय संस्कृतीत  जे नऊ रस सांगितले आहेत त्यातील शृंगार रसात कुंकाचाही समावेश आहे व म्हणूनच कुंकू आधारीत अनेक गीते, चित्रपट सुद्धा निघाले आहेत. 70 च्या दशकात अमिताभ व जया भादुरी यांचा अभिमान हा चित्रपट झळकला होता. गायक पती पत्नीतील समान व्यवसायामुळे होणारे हेवे दावे , स्वाभिमान दुखावणे असा हा चित्रपट होता. "तेरी बिंदीया रे" हे रफी व लता चे कर्णमधूर असे गीत यात आहे. यात नायकाने नायिकेला उद्देशून असे  "तेरी बिंदीया रे" असे म्हटल्यावर "सजन बिंदीया ले लेगी तेरी निंदिया रे" असे म्हणते. आपल्या पत्नीच्या कपाळावरील बिंदीया अर्थात कुंकू हे चंद्र व ता-यांप्रमाणे भासते मग तो  "तेरे माथे लगे है युं जैसे चंदा तारा" असे म्हणतो. पुढे नायिकेच्या झुमका , कंगन या आभूषणांचे कौतुक सुद्धा तो आपल्या गाण्यात करतो. मजरूह सुलतानपुरी ने किती छान, सर्वांगसुंदर असे नायिका व तिच्या आभूषणांचे वर्णन या शृंगार गीतात केले आहे. परंतू हल्ली बिंदीया, झुमका व अस्सल भारतीय आभूषणे लुप्त होत चालली आहेत. लग्न , समारंभ व फोटो काढण्यापुरता तेवढा त्यांचा उपयोग होतो. आभूषणांसह लज्जा हे स्त्रीचे नैसर्गिक आभूषण सुद्धा लुप्तप्राय होत चालले आहे. एका नववधूस मी भर लग्न मंडपात अमिताभ बच्चन प्रमाणे सर्व उपस्थितांच्या नजरेला नजर देत चौरंगावर उभे राहिलेले पाहिले आहे. लहानपणापापासून अनेक लग्नात "नववधू प्रिया मी बावरते"  याप्रमाणे अनेक वधूंना  पाहिलेल्या मला ही डॅशिंग नववधू वेगळीच भासली होती. हा सर्व काळाचा महिमा आहे. 

    कुणी काय घालावे वा घालू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी भारतीय वस्त्रे, आभूषणे ल्यालेली व कुंकू लावलेली  स्त्री  इतकी सुंदर, सोज्वळ, इंप्रेसिव्ह वाटते की गीतकारास मग आपोआपच तेरी बिंदीया रे हे गीत व त्यातील तेरे माथे लागे युं जैसे चंदा तारा सारख्या ओळी स्फुरतात.  

३ टिप्पण्या:

  1. भिडे गुरूजी तसेहे त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर बदनाम झालेलेच आहेत.म्हतारपणाची चाड त्यांनी ठेवावी.

    उत्तर द्याहटवा
  2. खरेच आपण आपली संस्कृती आणि परंपरा विसरायला नकोत.

    उत्तर द्याहटवा