हे तर भाषावार प्रांतरचनेचे फलित
गेल्या महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या काही गावांवर कर्नाटकचा दावा सांगितला आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुनश्च उफाळून आला. मग राजकीय लाभ मिळवण्यासाठी नाना वक्तव्ये,मोर्चे, तोडफोड, जाळपोळ ही या दोन राज्यांच्या सीमाभागात सुरु झाली ती अजूनही सुरूच आहे. काल कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी करून या भाषिक वादाच्या आगीत आणखीनच तेल ओतले. मुंबईत वीस टक्के कन्नडिग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बेळगाव केंद्रशासित करायचे असेल तर आम्हालाही मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करता येते, असेही ते म्हणाले. त्यांच्या अशा मागणी नंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. एस. अश्वथ नारायण यांच्या निर्णयाचा विधानसभेत निषेध करण्यात आला व त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्यावर अजित पवार यांनी देखील मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागणीचा निषेध केला व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्र लिहून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे, अशी मागणी विधानसभेत केली. खरे तर सी. एस. अश्वथ नारायण यांना अशी मागणी करण्याची काहीही एक गरज नाही परंतू कर्नाटक मधील आगामी निवडणूका लक्षात घेता हे सर्व सुरु आहे असे लक्षात येते. आताच हा वाद पुनश्च का उफाळून यावा ? हा वाद तसा अनेक वर्षे जुना आहे. बेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७५% लोक मराठी भाषिक आहेत तरीही भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगावांस महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटक सीमेत टाकल्या गेले त्यामुळे तेथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या सहा दशकापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. बेळगावातील मराठी जनता कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून कन्नड भाषेची सक्ती करून मराठीची गळचेपी होत असल्याचा आरोप करते. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुद्धा वर्ग झालेला आहे. का होतो आहे असा हा वाद ? आज आपल्या शेजारी देशांशी आपले सीमांवरून वाद आहे. पाकिस्तान , चीन यांची अरेरावी आपण पाहतच आहोत, बांगलादेशाच्या सीमेतून सर्रास घुसखोरी होत असते त्यातल्या त्यात आपला मित्र म्हणवल्या जाणारा, पुर्वी स्वत:ला हिंदू राष्ट्र म्हणवून घेणा-या नेपाळने सुद्धा आता आपल्याशी सीमावाद सुरु झाला आहे. आपण आपल्या देशाच्या एकतेचे, विविधतेचे मोठे गोडवे गात असतो आणि देशाच्या अंतर्गत भागात राज्यांच्या सीमांवरून भांडत असतो. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सुद्धा आपण तुम्ही खान्देशी तसे, आम्ही व-हाडी असे ते मराठवाड्यातील तसे असेही वाद करतच असतो. एकीकडे "भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत" अशा प्रतिज्ञा घ्यायच्या , संविधान दिन साजरे करायचे आणि राज्या-राज्यात सीमा/ भाषा यांवरून वाद निर्माण करायचे. याला काय म्हणावे ? चंदीगड , पुर्वेकडील राज्ये यांसारखे अनेक वाद आज देशाच्या अंतर्गत भागात आहेत यांचा त्वरीत बिमोड व्हायलाच हवा. या आगीला हवा देणा-या नेत्यांना धडे शिकवायला हवे तर आपला देश हा ख-या अर्थाने सार्वभौम, प्रजासत्ताक , संगठीत , राष्ट्रीय एकात्मता असलेला आहे असे म्हटला जाईल. भारत स्वतंत्र झाल्यावर प्रांत रचनेबाबत अनेक बुद्धिजीवी व नेत्यांची मते मतांतरे होती.अनेकांना भाषावार प्रांत रचनेस विरोध होता तरीही भाषावार प्रांतरचना झाली. त्यासाठी अनेक समित्या, आयोग निर्माण झाले त्यावरही मोठा खर्च झाला तरी वाद मात्र कायमच राहीले. आम्ही मराठी ते अमुक ते ढमूक हे करण्याच्या नादात आम्ही सर्व भारतीय हे आपण विसरू लागलो.अनेक राजकीय पक्ष हे या प्रांतवाद , भाषावाद यांवर मोठे झाले. आज देशाच्या अंतर्गत भागात राज्या-राज्यात भाषांवरून व सीमांवरून होणारे वाद, कित्येक वर्षांपासून चिघळत असलेले प्रश्न, राज्याची अस्मिता, भाषेची अस्मिता यावरून निर्माण झालेले वाद हे भाषावार प्रांत रचनेचेच फलित आहे असे वाटते.
आज आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत. आपण आपल्यातील वाद सोडून त्या समस्या निराकरणास प्राधान्य द्यायला नको का ? सीमा, भाषा, प्रांतवाद करणा-या देशातील सर्व भागातील नागरिक व नेत्यांना आनंद बक्षी या गीतकाराने लिहिलेल्या मेरे देशप्रेमियो आपसमे प्रेम करो या गीतातील
पूरब, पश्चिम ऊत्तर दक्खन वालो मेरा मतलब है|
इस माटीसे पुछो क्या भाषा, क्या इसका मजहब है ?
या ओळींचे स्मरण ठेवायला नको का ?