तोल मोल के बोल
नेत्यांची विधाने , जे मनात येईल ते जाहीररीत्या बरळणे व त्यातून नवीन वाद निर्माण होणे हे आता नित्याचेच झाले आहे. या विषयावर यापुर्वी अनेक लेख लिहून झाले आहे. "वाचाळवीर स्पर्धा असावी" हा लेख तर गत महिन्यातच लिहिला होता. इतर अनेकांनी सुद्धा या विषयावर भरपूर लिहिले आहे परंतू हे सर्व लिखाण हे स्वत:ला सुज्ञ समजणारे लोकप्रतिनिधी वाचतात की नाही देव जाणे ? एकाचे बोलणे झाले की दूसरा काही बरळतो याची एक वाकशृंखलाच तयार होत जाते. पुरुष तर पुरुष पण महिला लोकप्रतिनिधी सुद्धा यात मागे नाही. सुषमा अंधारे काय बरळत राहतात आपल्या बोलण्यातून संतश्रेष्ठांचा अपमान आपण करत आहोत याचे सुद्धा त्यांना भान राहत नाही. ज्या ज्ञानेश्वर माऊलींबाबत अवघ्या जनतेत व वारकरी संप्रदायात प्रचंड आदर आहे त्यांच्याबाबत भाष्य करण्याची या बाईंना विधान करण्याची काही आवश्यकता नव्हती व तशी त्यांची पात्रताही नाही, अधिकार वाणी तर नाहीच नाही. या नेते मंडळींनी खरे तर एकमेकांवर विकास , जनतेचे प्रश्न , बेरोजगारी , जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न या बाबतीत एकमेकांवर ताशेरे ओढावे. पण असे करणे सोडून हे एकमेकांनी केलेला भ्रष्टाचार, घोटाळे, खोके, पेट्या, तीनशे कोटी यांवरच भाष्य करीत असतात व असे बोलण्याच्या नादात हे काहीही बरळतात आणि मग आपण कसे बेधडक बोलतो हे सिद्ध करण्याच्या नादात यांची जीभ घसरते आणि नवीन वाद निर्माण होतो. छगन भुजबळ यांचे देश विदेशात पूजल्या जाणा-या विद्येची देवता सरस्वतीचे फोटो हटवण्याबाबतचे वाक्य, राहुल गांधी – सावरकरांबाबत , राज्यपाल कोश्यारी – नवीन आदर्श याबाबत , सुषमा अंधारे – माऊलींचे रेड्याकडून वेद वदवून घेतल्याबाबत, चंद्र्कांत पाटील – संस्थांसाठी भीक मागणे असे वक्तव्य करण्याबाबत आणि काल आमदार बांगर यांचे संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा असे म्हणणे इ. या अशा नुकत्याच काही झालेल्या वक्तव्यांमुळे किती गदारोळ झाला. याचा परीणाम राज्याच्या विकास, विधी मंडळाचे कामकाज, जनता, निषेध मोर्च्यांमुळे जनसामान्यांची होणारी रहदारीची समस्या, सुरक्षा यंत्रणेवर येणारा ताण अशा अनेक बाबींवर होत असतो. तसेच जनतेत सुद्धा अशा स्वरूपांच्या वक्तव्यांमुळे पराकोटीचे मतभेद निर्माण होत असतात. केवळ मतभेदच नव्हे तर कित्येकदा वाद, हाणामा-या सुद्धा होऊ लागतात. खरे तर जनतेने नेत्यांच्या या अशा वाचाळपणा वरून आपापसात वाद करू नये पण तरीही अशीच एक घटना 15 डिसे रोजी जळगांव जामोद तालुक्यात खेर्डा बु येथे घडली. येथील दोन शिक्षकांत चंद्र्कांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. यात पिडीत शिक्षकाच्या तक्रारीवरुन अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार एका शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अशा घटना या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे होत आहेत. तेंव्हा सन्मानीय नेते मंडळींनो आपण "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने" असे म्हणणा-या तुकाराम महाराज, "स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे" हे सांगणा-या रामदास स्वामी यांच्या महाराष्ट्रात तसेच "शब्द बराबर धन नही" सांगणा-या संत कबीर यांच्या भारत देशाचे नागरिक आहोत याचे स्मरण ठेवा, तुमच्या वक्तव्यामुळे जनतेत मतभेद, हाणामा-या होत आहे हे लक्षात घ्या ज्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे त्या कामांना जरा प्राधान्य द्या आणि "घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापुर्वी" या संत तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे जरा "तोल मोल के बोलत" चला.
खूप छान
उत्तर द्याहटवा