जीवन मे पिया तेरा साथ रहे
सद्यस्थितीत आपण बघतो की, घटस्फोटांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. 80 च्या दशकानंतर एक सुशिक्षित पिढी तयार होऊ लागली आणि या सुशिक्षित तरूणांत मुलींची सुद्धा मोठी संख्या निर्माण झाली. स्वातंत्र्यपुर्व काळात राजा राममोहन राय, भगिनी निवेदिता, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी अनेक समाज सुधारकांनी महिला उत्कर्षासाठी वाखाणण्याजोगे कार्य व घेतलेली मेहनत महिलांच्या शिक्षणासाठी केलेले अपार कष्ट या सर्वांमुळे सुशिक्षित महिलांचे प्रमाण वाढू लागले. हळू हळू या महिलांना सरकारी क्षेत्रामध्ये व खाजगीकरण वाढल्यानंतर खाजगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या. विविध तांत्रिक, वैद्यकीय, व्यवसायिक महाविद्यालयांमध्ये मुली शिकू लागल्या. परंतु हे सर्व होत असताना तत्कालीन मुली या कौटुंबिक व्यवस्था टिकण्यास अनुकूल होत्या. एकत्र कुटुंब व ज्येष्ठ नागरिकांसह वाढलेल्या या मुली माहेर व सासर दोन्ही सांभाळत असत. परंतु नव्वदच्या दशकानंतर स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या मुली यांना पाच आकडी, सहा आकडी पगार येऊ लागला या रग्गड पैसा कमवणाऱ्या मुली मग स्वतःच्या स्वतंत्र अशा शैलीने जगू लागल्या , निर्णय घेऊ लागल्या त्यांना त्यांच्या जीवन व इतर कार्यात त्यांच्या पतीचा वा पित्याचा सहभाग, सल्ला याची निकड उरली नाही. आज आपण बघतो की घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे, विवाहाच्या काही दिवसातच पती-पत्नी विभक्त होत आहेत, पत्नीपिडितांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे न्यायालयामध्ये घटस्फोटांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. ही इतकी प्रकरणे आहेत की न्यायालय व न्यायाधीशांची संख्या सुद्धा अपुरी पडते आहे. हे असे का घडते आहे ? हे शोधू जाता नाना कारणे आहेत. आजच्या तरुण मुला-मुलींकडे जुन्या काळातील आदर्श, नितीमूल्ये, वाचन, गीत, संगीत, सिने संगीत असे काहीच नाही आहे. वरील सर्वांतून नकळत होणारे संस्कार आता मिळत नाही त्यामुळे उच्चशिक्षित होऊनही या तरुणांमध्ये कुटुंब व ज्येष्ठांशी कसे वागावे, नवदांपत्यांनी एकमेकांशी कसे वागावे याचा अभाव आढळून येत आहे. जुन्या काळातील चित्रपट व त्यातील गीते यामुळे सुद्धा तत्कालीन तरुण-तरुणी, नवदांपत्य यांना एकमेकांविषयी प्रेम, कुटुंबाविषयी ममत्व भावना, एकमेकांप्रती आदर अशा भावना त्यांच्यात आपसूकच वृद्धिंगत होत असत "जीवन मे पिया तेरा साथ रहे" असे जेव्हा नायिका पडद्यावर म्हणत असे तेव्हा समाजातील अनेक तरुणींना सुद्धा त्यांना त्यांच्या जीवनसाथीची सोबत , सहवास आयुष्यभरासाठी असावा असे वाटत असे. त्या नायिकेचा नायक प्रतिसादात जेव्हा "हातो मे तेरे मेरा हात रहे" असे उत्तर देई तेव्हा तत्कालीन तरुण सुद्धा त्या नायकाप्रमाणे त्याच्या जीवनसंगिनीचा हातात घेतलेला हात कधीही न सोडण्याचे मनोमन ठरवत असे. दुसरे गीत "तुझे जीवन की डोर से बांधलीया है" ; या गीतात सुद्धा "तेरे जुल्मोसितम सर आंखोपर" असे नायकाने म्हटल्यावर प्रतिसादात नायिका सुद्धा "मेरे जीवन की अनमीट कहानी है तू मेरी तकदीर और जिंदगानी है तू" असे म्हणतांना पाहून / ऐकून अनेक नवनवपरिणीत दाम्पत्य प्रभावित होत असत व आपल्या जीवनात सुद्धा तसे वागत असत व तडजोड करून आयुष्यभर सोबत राहत असत. "सारा प्यार तुम्हारा मैने बांध लिया है आंचल में" , "हे मैने कसम ली नही होंगे जुदा हम" , "एक प्यार का नगमा है,मौजो की रवानी है, जिंदगी और कुछ नही, तेरी मेरी कहानी है|" अशी कित्येक जुनी गीते आहेत ही गीते सुद्धा निश्चितच कुठेतरी कुटुंबव्यवस्था टिकवण्यात हातभार लावत असत. दुर्दैवाने आता अशी गीते , अशा कथा तरुणांच्या समोर येत नाही , कौटुंबिक चित्रपट निर्माण होत नाही. असे चित्रपट, गीते जर का पुन्हा येऊ लागली , लेखकांनी अशा कथा पुन्हा लिहिल्या तर त्याचा सुद्धा निश्चितच चांगला परीणाम आजच्या तरूणांवर होईल असे वाटते. आज दिवस निघत नाही तर "माझ्या नव-याची दुसरी बायको" सारख्या मालिका व दोन दोन नायिकांना फिरवणा-या शाहरुख टाईप नायकाचे चित्रपट, 2001 मध्येे आलेल्या अक्षयकुमारच्या अजनबी या चित्रपटासारखे चित्रपट तरुण पाहत आहेत व तसेच अनुकरण समाजात होताना दिसत आहे. अर्थात आजही अनेक तरुण-तरुणी उपरोक्त केलेल्या भाष्यास अपवाद सुद्धा आहेत अशा अपवाद असणाऱ्या तरुण तरुणींनी कृपा करून यातून स्वत:स वगळावे. नवोदित लेखक ,कवी,गीतकार,चित्रपट कथा लेखक यांनी कुटुंब व्यवस्था टिकून राहील अशा "जीवन मे पिया तेरा साथ रहे", "तुझे जीवन की डोरसे बांध लिया है" व लेखात आलेल्या इतर गीतांसारख्या गीत रचना केल्यास, चांगल्या कौटुंबीक कथा लिहिल्यास त्याचा तरुणाईवर निश्चिचितच सकारात्मक परिणाम होईल व मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था पुन्हा प्रस्थापित होईल अशी आशा वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा