मुल्याधिष्ठीत पत्रकारीता पुन:स्थापित व्हावी
उद्या 6 जानेवारी, पत्रकार दिन. महाराष्ट्रात
बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी
1832 रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू
केले होते. म्हणूनच महाराष्ट्रात हा दिवस
पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकारीता म्हटली की स्वातंत्र्यापुर्वीची वृत्तपत्रे ती छापणारे भारतीय स्वतंत्रता लढ्यातील सेनानी यांचे स्मरण होते. ब्रिटीशांच्या काळात त्यांच्याच राजवटीत त्यांनाच विरोध करण्यासाठी वृत्तपत्र हे एक चांगले उपयुक्त असे साधन होते. "दर्पण" हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू करून महाराष्ट्रात वृत्तपत्र व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली. तत्पुर्वी बंगाल गॅझेट हे दैनिक भारतात सुरू झाले होते. यानंतर इतरही अनेक थोर मंडळींनी पाक्षिके, साप्ताहिके , दैनिके सुरू केली. स्वातंत्र्य संग्रामाच्या बातम्या जनसामान्यांपर्यन्त पोहचवणारे वृत्तपत्र हे माध्यमांचा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असलेल्या त्या काळात एक प्रभावी व लोकप्रिय असे माध्यम ठरले. याच माध्यमातून "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?" असे टिळकांनी ब्रिटीशांना ठणकावले होते. टिळकांचे केसरी व मराठा, महात्मा गांधींचे यंग इंडिया, बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक व इतर अनेक प्रभावी वृत्तपत्रांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोठी जनजागृती केली. स्वतंत्रताप्राप्ती मध्ये या माध्यमाचा सुद्धा बराच मोठा वाटा आहे. पुढे प्र.के.अत्रे यांच्या प्रखर लेखणीतून आलेले अग्रलेख सुद्धा प्रचंड गाजले होते. परंतू दुर्दैवाने आज मात्र या व्यवसायाची स्थिती पुर्वीसारखी मुल्याधिष्ठित राहिली नाही असेच खेदाने म्हणावे लागते. स्वतंत्रताप्राप्ती नंतर हळू-हळू नवनवीन वृत्तपत्रे सुरु झाली. नवीन पिढीत नवीन पत्रकार निर्माण झाले. पुर्वाश्रमीच्या काही वृत्तपत्रांवर राजकीय मंडळीनी ताबे मिळवले व ती वृत्तपत्रे आपली मुखपत्रे बनवली. सरकारी यंत्रणात भ्रष्टाचाराचा चंचूप्रवेश झाला कालांतराने त्याचा विस्तार होऊ लागला. या व्यवहारांवर पत्रकार लक्ष ठेवू लागले, आपल्या गैरव्यवहारांच्या बातम्या उघडकीस येऊ नये म्हणून मग नाना आमिषे देणे सुरू झाले. लोकशाहीच्या या चौथ्या आधारस्तंभात भ्रष्ट घुशींचा शिरकाव सुरू झाला. वृत्ते दडवली जाऊ लागली तर काही वेळा स्वार्थासाठी गैरव्यवहारातील मलई चाखायला मिळावी म्हणून वृत्ते दिली सुद्धा जाऊ लागली. फेड न्यूज हा प्रकार आला त्यावर मोठा गदारोळही झाला. 1980 च्या दशकात तर अनेक छोटी वृत्तपत्रे, दैनिके सुरू झाली. वृत्तपत्र सुरू करण्याची विशेष कठीण नसलेली प्रक्रिया, जाहिरातीततून मिळणारी कमाई, व इतर फायदे यातून "छ्पाईला परवडत नाही" असे पालूपद लावून ही छोटी दैनिके सुरू होती व आहेत. छ्पाईला परवडत नाही असे असूनही मग छपाई होते कशी? हा मुद्दा सुद्धा उपस्थित होतो. ज्या छोट्या दैनिकांना येन केन प्रकारेण चालणारे अर्थकारण जमले नाही ती दैनिके बंद पडली. या व्यवसायात हवसे, नवसे, गवसे अशा अनेकांचा, बेरोजगार तरुणांचा शिरकाव झाला. मिडीयाचे महत्व ओळखून , हे माध्यम आपल्या हाताशी हवे म्हणून काही धनाढय मंडळींनी सुद्धा दैनिके, साप्ताहिके व पाक्षिके सुरू केली. त्यांच्या दैनिकांसाठी विविध प्रकारचे तरुण काम करू लागले. मराठी भाषा, शब्दसंग्रह, व्याकरणाची विशेष जाण नसणारे, पत्रकारितेचे कोणतेही शिक्षण न घेतलेले, वाचनाचा गंध व छंद नसलेले सुद्धा हल्ली पत्रकार हे बिरूद मिरवतात. या बिरूदाच्या नावाखाली त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधतात. कर्मचारी, अधिकारी, पांढरपेशे, शिक्षक, शाळा यांच्यातील कमी अधिक उणीवा ओळखून त्यांना त्रस्त करतात. उपरोक्त प्रकारातील काही लोक मागे नसती डोकेदुखी नको म्हणून अशा तथाकथित पत्रकारांना खुश करून त्यांची बोळवण करून ससेमिरा सोडवून घेतात. समाजातील समस्या , पाण्यासारखे ज्वलंत प्रश्न, गुन्हेगारी इ. वर आपल्या लेखणीने वचक ठेवण्यापेक्षा ती लेखणी क्षणिक अप्पलपोटीपणासाठी समाजातील काही चांगल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या, छोटी मोठी परंतू चांगली कार्ये करणा-यांच्याही विरोधात घासल्या जाऊ लागली. उपरोक्त बाबतीत अनेकांशी संवाद साधल्यावर जनतेतून अतिशय निराशाजनक अशी उत्तरे आली आहेत. जनतेत पुर्वी असलेली या माध्यमाची प्रतिमा आता तशी राहिली नाही. हे कटू सत्य अनेकांना न रुचेल असेच आहे परंतु अशी अवस्था आहे हे कुणीच नाकारू शकणार नाही. अनेक तोतया सुद्धा आहेत. या तोतयांमुळे चांगले पत्रकार सुद्धा बदनाम होतात. तोतया कसे निर्माण होणार नाही याची सुद्धा दक्षता घेणे आवश्यक आहे. बाळशास्त्री जांभेकर, तानुबाई बिर्जे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे उच्चविद्याविभूषित, प्रकांड पंडित, व्याकरण ज्ञाते यांसारखे पत्रकार असणाऱ्या पुर्वीच्या महाराष्ट्रात आता मात्र यांच्यासारख्याच चांगल्या पत्रकारांची वानवा आहे. काही सन्माननीय अपवाद आजही आहेत परंतु ते संख्येने तुटपुंजे आहेत.
उद्या पत्रकार दिन सर्वदूर साजरा होईल, अनेक ठिकाणी सन्मान, गौरव होतील ते अवश्य होवोत परंतू आम्हा पत्रकार मंडळींना या दिनाच्या औचित्याने आत्मपरीक्षण करून पुर्वीसारखी मुल्याधिष्ठित पत्रकारिता पुन:स्थापित करण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प सुद्धा करायला नको का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा