विवेकानंदांना अभिप्रेत भारत घडेल
युवक दिन विशेष
आज सर्वत्र स्वामी विवेकानंद व मातोश्री जिजाबाई यांची जयंती साजरी होत आहे. ज्या जिजामातेने शिवबांना घडवले व पुढे त्या शिवबांनी तरुणपणी महापराक्रम केला, स्वराज्य स्थापन केले, आदिलशहा, निजामशहा , मुघल यांना जेरीस आणले , सळो की पळो करून सोडले अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 183 वर्षांनंतर स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. तरुणपणी रामकृष्ण परमहंस यांची भेट झाल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली व त्यांनी युवकांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. स्वामीजींचा जन्म जरी शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 183 वर्षानंतर झाला असला तरी त्यांना जसे युवक अपेक्षित होते तसेच शिवाजी महाराज होते. असेच युवक आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी निर्माण व्हावे म्हणून स्वामीजींनी मोठे कार्य केले आहे. त्यांनी दिलेल्या अनेक संदेशातून आपल्याला तरुणांसाठी वापरलेले आत्मविश्वास, सकारात्मकता, एकाग्रता, मातृभूमी, धर्म, देश, पिडित, उपेक्षित बांधव असे शब्द दिसून येतात. या शब्दातून त्यांनी तरुणांना आत्मविश्वासी व्हा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, अंगीकारलेल्या कार्यात एकाग्रता बाळगा असे संदेश दिले आहेत. आजच्या युवक दिनी देशभर या विचारांची देवाण-घेवाण होत आहे. आज आपला देश जगात पुढे आलेला दिसत आहे. आपल्या देशाला विशेष असा सन्मान आज प्राप्त होत आहे व आगामी काळात स्वामीजींना अभिप्रेत असा भारत निर्माण होईल अशी आशा देश बाळगत आहे. युवकांची मोठी संख्या आता या देशात आहे स्वामीजींनी दिलेल्या संदेशानुसार आज अनेक शिक्षण संस्था, वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था पिडितांसाठी, उपेक्षितांसाठी स्वामीजींच्या सांगण्यानुसार शिवभावे जीवसेवा अशी चांगली सेवा देत आहे. आज भारतात अध्यात्मिक क्षेत्रात चांगली प्रगती होताना दिसून येत आहे. हिंदू धर्म अधिक बलशाली व जागृत होताना दिसून येत आहे. स्वामीजींनी म्हटले होते
"Up India and Conquer The World with Your Spirituality"
या वाक्यातील संदेशासारखी परिस्थिती आज दिसून येत आहे. आजच्या या युवक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठी युवकांची संख्या असलेल्या या देशात स्वामीजींच्या संदेशानुसार कार्ये घडतील अशी आशा व संकल्प करूया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा