Click "Follow" Button below To Follow this Blog

३०/०३/२०२३

Article about Orange City Warud city( California of Vidarbha Region) of Amravati District, Maharashtra, India

विदर्भाचा कॅलिफोर्निया - वरुड 


अत्युत्कृष्ट,सुमधुर असलेल्या संत्र्यांमुळे वरुडला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखतात. संत्रे म्हटले की नागपुरी संत्र असे म्हटले जाते. परंतू वरुड मध्ये पिकणारी संत्री हीच सर्वात चविष्ट असल्याचे जाणकार व जुनी माणसे सांगतात. एकदा एका स्वामीजींना मी वरुडची संत्री अर्पण केल्यावर त्यांनी ती आनंदाने भक्षण केली होती व वरुडच्या संत्र्याचे महत्व सांगितले होते.

वरुड,अमरावतीच्या पुढे 80-85 किमी अंतरावरील गांव. मध्यप्रदेशच्या सीमेलगतचे एक छोटे परंतू टुमदार गांव. अमरावतीहून नागपूरला जायचे असेल तर कोंढाळी, कारंजा घाटगे या मार्गाप्रमाणेच मोर्शी-वरुड-काटोल या मार्गाने सुद्धा जाता येते. अमरावती- नरखेड रेल्वे मार्ग झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील तालुका स्थान असलेले हे शहर रेल्वेच्या नकाशावर सुद्धा आले. या शहराशी माझा संबंध आला तो 25/26 वर्षांपुर्वी, माझ्या बहिणीच्या विवाहोपरांत. हे शहर सुद्धा नात्यात आले, काहींशी चांगले मैत्र्य जडले. तत्पूर्वी वरुड हे नांव केवळ ऐकिवात होते. अमरावती, नागपूर या शहरांत गेलो होतो मात्र मोर्शी, वरुड या भागांत मात्र जाण्याचे कधी काही कामच पडले नव्हते. नंतर मात्र कित्येकदा जाणे झाले. आता काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या कॅलिफोर्निया म्हटल्या जाणा-या वरुडला जाणे झाले. अमरावती मागे टाकून बस वरुड रस्त्याला लागली होती, नुकत्याच सुरु झालेल्या उन्हाळ्यात नैसर्गिक थंड वारा खिडकीतून सुखद दिलासा देत होता. प्रवासात एकटाच असल्याने वरुड, वरुडच्या आठवणी , रम्य परिसर असे  विचार मनात घोळत होते. अमरावती- वरुड मार्ग आता काही वर्षांपुर्वी चांगला सिमेंटचा, रुंद व गुळगुळीत झाला. मला पुर्वीचा 

हिरवी श्यामल भवती शेती , पाऊलवाटा अंगणी मिळती 

नव फुलवंती , जुई शेवंती , शेंदरी आंबा सजे मोहरू 

अशा वरुडच्या वाटा आठवू लागल्या. दोन्ही बाजूंनी गर्द कडूनिंबांची झाडे, हिरवीगार शेती  व संत्रा बगीचे असलेला. (शेती अगदी लुप्तच झाली असेही नाही) तेंव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर रस्ता सुरक्षेबाबतची अनेक चांगली अशी घोषवाक्ये सुद्धा लिहिलेली होती. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी कैक वर्षे जुन्या असलेल्या त्या भल्या मोठ्या कडूनिंबांच्या झाडांवार यांत्रिक करवती कराकरा फिरल्या होत्या त्यावेळी मन खिन्न झाले होते. रस्त्या वरून मला बोरांग आठवले. या भागात गाडरस्त्याला बोरांग म्हणतात. मला बस मध्ये हे आठवत होते. अमरावती सोडले की माहुली या गावाच्या पुढे गेलो की आजूबाजूने संत्र्यांच्या बागा दिसू लागतात. रात्रीच्या शेवटच्या बसने मी जात होतो. अंधार असला तरी मला बसच्या हेडलाईटमुळे  बरेच ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला नवीन वृक्षारोपण झालेले दिसले, परतीच्या , दिवसाच्या प्रवासात ही किशोरवयीन झाडे पाहून मला फार आनंद झाला. पुनश्च हा रस्ता पूर्वीसारखाच boulevard  होईल असे वाटले. यंदाच्या माझ्या वरुड प्रवासात वरुड शहरात मला खुप बदल झालेले जाणवले. मी एकटाच असल्याने व माझा प्रवास हा कोणतेही कारणरहित सहज व निचंतीचा असल्याने हे बदल मी निरक्षित होतो. अमरावतीहून वरुडला येत असतांना वरुडच्या अगदी अगोदर जरुड हे गांव येते नंतर वरुड. वरुडच्या पंचक्रोशीत येताच काही शासकीय निवासस्थाने व शासकीय विश्राम गृह आपल्याला दिसते.  याच भागात 25 वर्षांपुर्वी संत्रा बागा दिसत त्यांची जागा आता नवीन ले-आऊट ने घेतलेली दिसली , काही ठिकाणी नवीन घरे सुद्धा झालेली दिसली. दिवसागणिक NA/ आकृषक  जमिन वाढतच चालली आहे किंवा करवून घेतल्या जात आहे. लाखो करोडोंची उलाढाल होते आहे. NA , ले आऊट , बांधकाम क्षेत्र , यांमुळे पुर्वाश्रमीच्या कास्तकाराकडे बक्कळ पैसा आला. परंतू काही कास्तकार एकरकमी आलेल्या या लक्ष्मीचा चांगला विनियोग करु शकले नाहीत व ते देशोधडीला लागल्याच्या बातम्या वाचल्याचे मला स्मरले. या सर्वांमुळे व शेतीबाबत अनुत्साही असलेल्या तरुण पिढीमुळे शेत जमिनीचे भविष्य काय ? हा प्रश्न मनाला शिऊन गेला. हा रस्ता राज्य परीवहन मंडळ बस स्थानकाकडे जातो. एक सहप्रवासी एका थांब्यावर उतरल्याने माझ्या विचारांत खंड पडला. आता हा रस्ता चांगलाच रुंद झालेला दिसला. विश्राम गृहाजवळून गावाकडे जाणारा एक जुना रस्ता सुद्धा आहे. या ठिकाणी आता "I Love Warud" अशी विद्युत दिव्यांची पाटी लावलेली दिसली. बस स्थानक ते गावाकडे जाणा-या रस्त्याने आता आधुनिक स्वरूप धारण केले आहे. मोठ्या मोठ्या शो रूम, दिमाखदार अशी मोठाली व आकर्षक दुकाने,  दवाखाने , पेट्रोल पंप, मोठ्या इमारती असे दृश्य आता दिसते. पुर्वी हा रस्ता विरळ होता. येथूनच गावाकडे जातांना एक रस्ता नागपूर, एक भिलाई तर डावीकडचा एक मुलताईकडे जातो. वरुड हे रोड जंक्शन आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते इथून जातात. गावात केदारेश्वर मंदिर , देशबंधू दास वाचनालय , विठ्ठल मंदिर अशी काही जुनी प्रतिष्ठाने आहेत. तर गावाजवळ सालबर्डी, नागठाणा अशी निसर्गरम्य देवस्थाने आहेत. गावात प्रवेश केल्यावर केदार टॉकीज म्हणजेच केदार चौक आहे. टॉकीज आता राहिली नाही, मोठे व्यापारी संकुल झाले आहे. अनिल कपूरचा कुठलातरी सिनेमा या टॉकीज मध्ये पाहिल्याची आठवण मला उगीचच त्या व्यापारी संकुलाकडे पाहिल्यावर झाली. एकेकाळी हजारोंचे मनोरंजन करणारा, लाखोंची तिकीट विक्री व मनोरंजन कर भरणारा टॉकीज व्यवसाय बघता बघता डबघाईस गेला. रात्री भोजनोपरांत विश्राम केला. सकाळी आन्हीके आटोपल्यावर सहज म्हणून गच्चीवर गेलो. इथे गच्चीला गच्चा असे म्हणतात. अनेक शब्दांचे उच्चारण इथे थोडे वेगळ्या पद्धतीने करतात.  वरूडला गेलो की बरेचदा गच्चीवर जातोच. यंदा तर ब-याच दिवसांनी वरुडला जाणे झाले होते. वरून चौफेर नजर फिरवल्यावर सकाळी बाजारपेठेत झालेला बदल दिसलाच होता व आता गच्चीवरून वरुड शहरातील घरांमध्ये झालेला लक्षणीय बदल सुद्धा जाणवला. नव्या घराच्या मागे लगतच बहिणीचा जुना माडीचा वाडा दिसतो. 

चौकटीवर बाल गणपती , चौसोपी खण स्वागत करती , 

झोपाळ्यावर अभंग कातर , सवे लागती कड्या करकरू     

असा तो वाडा जावाई बुवा व त्यांच्या बंधूंनी अजूनही चांगला राखून ठेवला आहे. झोपाळा म्हणजेच बंगई सुद्धा आहे. याच बंगईवर बहिणीचे रुबाबदार सासरे गोपाळराव लोहकरे बसत असत. गच्चीवरून दूरवर सातपुड्याच्या पर्वत रांगा दिसतात. कौलारू घरे व त्याच्या पार्श्वभूमीला सातपुडा पर्वत व आदित्यराजाच्या  सांजवेळीच्या रंगछटा असे ते दृष्य मोठे विलोभनीय दिसत असे. पुर्वी दिसणा-या कौलारू घरांची जागा आता सिमेंटच्या घरांनी घेतलेली दिसली. पुर्वी दिसणा-या कौलारू घरांचेच दृश्य मला अधिक भावत असे परंतू बदलाला कोण रोखू शकते. दूरवर दिसणा-या त्या निळसर सातपुड्याच्या रांगांचे निरीक्षण करता करता 

"आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरु , 

खेड्या मधले घर कौलारू 

या गदिमांच्या कवितेच्या ओळी व कविता आठवली. आता वरुड मध्ये अत्यल्प झाली असली तरी लगतच्या खेड्यांमध्ये मात्र आजही जुनी कौलारू घरे दिसतात. अत्युत्कृष्ट, सुमधुर

असलेल्या संत्र्यांमुळे वरुडला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखतात. संत्रे म्हटले की नागपुरी संत्र असे म्हटले जाते. परंतू वरुड मध्ये पिकणारी संत्री हीच सर्वात चविष्ट असल्याचे जाणकार व जुनी माणसे सांगतात व खाणा-याला सुद्धा त्वरित लक्षात येते. एकदा एका स्वामीजींना मी वरुडची संत्री अर्पण केल्यावर त्यांनी ती आनंदाने भक्षण केली होती व वरुडचीच संत्री सर्वोत्तम असल्याचे सांगीतले होते, माझ्याकडे ती कशी आली याची विचारणा केली होती. अशी ही वरुडची संत्री. शहरांचे आकर्षण, जागतिक उष्णता वाढ, जगात  झपाट्याने होणा-या बदलांसोबत बदलत जाणारे वरुड मी न्याहाळले. आज येथील नवीन पिढी शिक्षण , नोकरी अनुषंगाने दूरदेशी गेली आहे. 

"माजघरातील उजेड मिणमिण , वृद्ध कांकणे करिती किणकिण

किणकिण ती हळू, ये कुरवाळू दूरदेशीचे प्रौढ लेकरू   

नोकरी निमित्त येथून गेलेले शहरी, विदेशी चमकधमक भावलेले  तरुण पुनश्च येथे येतील का ? हा विचार सुद्धा मनी दाटला. माझी आता वरुड भेट संपुष्टात आली होती. मी बस मधे बसलो. वरुड शहराचा काही भाग न्याहाळता न्याहाळताच माझी बस गावापासून खुप लांब आली. ज्याप्रमाणे वरुड मधील कौलारू घरे लुप्त झाली तसे आगामी काळात होणा-या बदलांमुळे येथील संत्रा बागांचे सुद्धा काय होणार ? माझ्या मनात भीतीयुक्त शंका आली . एवढ्यात हिवरखेड गावाजवळच्या एका संत्र्याच्या मोठ्या नर्सरीत मला काही लहान मुले संत्र्याची रोपे घेऊन जात असलेली दिसली व हा संत्रा आगामी काळात सुद्धा बहरतच राहील असा सकारात्मक विचार माझ्या मनात चमकून गेला. शासनाने सुद्धा संत्रा बागायतदारांसाठी पुढाकार घ्यावा असे वाटले. वरुड केंव्हाच मागे पडले होते. 25 वर्षांपूर्वीचे वरुड व आताचे बदललेले वरुड अशी स्मृतीचित्रे आणि वरुडची संत्री सोबत घेतलेल्या मला ती बस माझ्या  गंतव्यस्थानाकडे घेऊन धाऊ लागली.  

✍️विनय वि. वरणगांवकर©

1 नवीन पिढीसाठी 

गदिमा - गजानन दिगंबर माडगुळकर (प्रख्यात कवी, लेखक,  गीत रामायण रचयिते)

boulevard = दुतर्फा झाडे असलेला रस्ता


२ टिप्पण्या:

  1. खरंय ...आमचं गाव आणि गावकरी सगळेच जिव लावणारे आहेत.इतकी वर्षे तिथे राहतोय पण आपलं गाव खरच किती छान आहे याची जाणीव या लेखाने झाली.म्हणतात ना पिकतं तिथं विकत नाही . तसेच काहीसे.खूप सुंदर वर्णन केले, सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहीले.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा