बाजीराव प्रेमाने भारावलेला युवक
आपापसात संत-महात्मे, राजे-महाराजे, राष्ट्रपुरुष वाटून घेणा-या आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोरल्या बाजीरावांना मध्यप्रदेशात जास्त मान सन्मान, प्रचंड आदर असल्याचे या लोकांच्या बोलण्यातून, त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते. या लोकांमधीलच एक तरुण बाजीराव समाधी स्थळाच्या विकासाबाबत प्रयत्नशील आहे. तर बाजीरावांच्या समाधी स्थळावरील माती व नर्मदेचे जल घेऊन शनिवार वाडा पुणे इथे जाणा-या या तरुणाने त्याच्या मुलाचे नांव बाजीराव ठेवले आहे.
कुठल्यातरी ध्येयाने झपाटून गेलेले युवक पाहिले की , त्यांच्यातील उर्जा पाहिली की आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे अशी प्रेरणा आपल्याला हमखास होत असते. असाच एक युवक याच महिन्यात भेटला. झाले असे की , माझ्या मुलीच्या कॉलेजला 8 दिवस सुट्ट्या होत्या. ती म्हणाली "बाबा आपण कुठेतरी फिरायला जाऊन येऊ". मे महिन्यात, भर उन्हात कुठे फिरायला जाणे म्हणजे दिव्यच म्हणावे लागेल. परंतू निसर्गाने साथ दिली. आम्ही गेलो तेंव्हा ढगाळ वातावरण होते. जाण्यासाठी म्हणून कोणते ठिकाण आहे यावर विचार करू लागलो. नुकतीच 28 एप्रिल रोजी थोरले बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथी झाली होती. बाजीरावांचे विचार मनात होतेच त्यामुळे 10- 12 वषांपुर्वी समाज माध्यमावर वाचलेला बाजीरावांच्या समाधीबाबतचा एक लेख आठवला व कुटुंबियांसोबत चर्चा करून बाजीरावांच्या समाधीचे दर्शन घेण्यास जाण्याचे नक्की केले. ही समाधी ओंकारेश्वर पासून 40-45 किमीच्या अंतरावर आहे. ओंकारेश्वर येथे अनेकदा जाऊनही या समाधीला भेट देण्याचा योग काही कधी आला नव्हता. यावेळी मात्र ठरवून रावेरखेडी हे ठिकाण निवडले. खामगांववरून बाजीरावांच्या रावेरखेडी, जि.खरगोन, मध्यप्रदेश येथील समाधीला जाणे म्हणजे लांबचा पल्ला होता. कुटुंबीय म्हणाले किती वेळ लागेल ? , प्रवासच जास्त होईल. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी म्हटले, "अरे चला बाजीराव तर घोड्यावर लांब-लांबचे पल्ले गाठत, भूक लागल्यास घोड्यावर बसल्या-बसल्या कणीस कापून हातावर मळून, हुर्डा खाऊन पुढे जात असत. आपल्या जवळ तर मोटार आहे, जय बाजीराव म्हणा अन चला" त्यांच्यात उत्साह संचारला. गाडीने वेग धरला संभाजी महाराजांनी लुटलेले मुघलांचे ठाणे ब-हाणपूर, दक्षिणेचा दरवाजा म्हटला जाणारा अशीरगड अशी ठिकाणे मागे टाकत आम्ही पुढे चाललो होतो. रस्त्यात एका ठिकाणी थांबून आंब्याच्या झाडाखाली हातावर पोळी आणि झुणका घेऊन "बाजीराव भोजन" केले. भोजनोपरांत इतर सर्व पेंगुळले होते, सनावद नंंतर रावेरखेडी रस्ता म्हणजे ग्रामिण भाग, हे ग्रामस्थ म्हणजे तत्कालीन सैनिकांपैकी इथेच वसलेल्यांचे वंशज असावेत का ? इथूनच मराठ्यांच्या फौजा दिल्लीला जात असतील, असे विचार करीत मी खिडकीतून सभोवतालचा प्रदेश न्याहाळत होतो. रावेरखेडी जवळ येत होते तसे-तसे बाजीरावांचा इतिहास आठवत होता. थोरले बाजीराव, मराठा साम्राज्याचा पेशवा अर्थात प्रधानमंत्री. एक अपराजित योद्धा, ज्याने 41 मैदानी लढाया जिंकल्या, इंग्रज, मुघल सर्व त्याला घाबरत असत, अतिशय चपळ, वेगवान हालचाली करणारा शाहू महाराजांचा निष्ठावान, कर्तबगार सरदार ज्याने शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला होता. छत्रसालाने मोहम्मद बंगशाचे आक्रमण झाल्यावर जेंव्हा
जो गति भई गज ग्राह की, सो गति भई है आज। बाजी जात बुंदेल की, बाजी राखौ लाज ||
अर्थात "गजेंद्र मोक्ष" या पुराणातील कथेत हत्ती मगरीच्या तावडीत सापडतो व भगवंत त्याचे रक्षण करतात त्या गजेन्द्राप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. बाजीराव तुम्हीच आता बुन्देलांची लाज राखा. अशा आशयाचे पत्र पाठवल्यावर हातचा घास टाकून छत्रसालाच्या मदतीला धाऊन जाणारे बाजीराव, आणि उत्तरेवरच्या मोहिमेवर असतांना रावेरखेडी याच ठिकाणी सततच्या मोहिमा, थकवा व त्यातच झालेला उष्माघात, न उतरणारा ज्वर यामुळे अल्पवयात झालेले मराठा साम्राज्याची मोठी हानी करणारे त्यांचे दुःखद निधन. हे सारे आठवत होते तेवढ्यात एक वळण घेऊन आमची गाडी रावेरखेडी गावात शिरली व थोड्याच वेळात बाजीरावांच्या समाधीसमोर उभी राहिली. ते ठिकाण पाहताच आम्ही सर्व रोमांचित झालो. माझ्या जेष्ठ भगिनीच्या डोळ्यास धारा लागल्या. राऊ कादंबरी, राऊ मालिका, श्रीमंत बाजीराव पेशवे पुस्तक यातील दृश्ये तिला आठवली होती. शेजारी बाजीराव व मराठ्यांचा पराक्रम पाहिलेली नर्मदा नदी वाहत होती व तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सर्वच स्तब्द झाले होते. शेजारच्या चहावाल्या काकांनी "पेशवा सरकारका पराक्रम ही वैसा था" असे म्हणत पिण्यास पाणी दिले. आम्ही समाधीसमोर नतमस्तक झालो. बाजीरावांचे निष्ठावान सरदार राणोजी शिंदे यांनी ही समाधी बांधली होती. रावेरखेडी येथे बाजीवारांच्या सालस, मितभाषी पत्नी काशीबाई यांनी बांधलेले एक सुंदर शिव मंदिर आहे. इथे एक जीर्ण झालेली इमारत आहे. कुणी तिला वाडा म्हणते तर कुणी पेशव्यांचा नाका असल्याचे सांगतात. दयाराम पवार या चहावाल्या काकांनी त्यांच्या दुकानाला पेशवाजी टी सेंटर असे नांव दिल्याचे दिसले. आमची समाधीबाबत विचारपूस व जिज्ञासा बघून त्यांनी येथील अनिल बिर्ला उर्फ अनिल बाजीराव या तरुणाला फोन करून बोलावले. लेखात अगदी
अनिल बिर्ला |
होते. आपापसात संत-महात्मे, राजे-महाराजे, राष्ट्रपुरुष वाटून घेणा-या आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोरल्या बाजीरावांना मध्यप्रदेशात जास्त मान सन्मान, प्रचंड आदर असल्याचे या लोकांच्या बोलण्यातून, त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते. अनिल बिर्ला यांनी मस्तानीबाई यांच्याबद्दल सुद्धा आदरयुक्त भाष्य केले. बाजीराव यांच्या जयंतीला येथे "बाजीराव भोजन" बाजीराव प्रतिष्ठान तर्फे आयोजित केले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यात सहभागी असतो अशी माहिती अनिल यांनी दिली. या ठिकाणी आता बाजीरावांचा अश्वारूढ असा पुतळा उभारला जाणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. अनिल यांना बाजीराव यांच्याप्रती नितांत आदर आहे. "मी त्यांचे जे काही कार्य करतो त्याचे संकेत मला पेशवा सरकारच देतात" असे अनिल यांनी सांगितले. आणखी एक गोष्ट सांगितल्यावर तर आम्ही विस्मयचकितच होऊन गेलो. अनिल बिर्ला यांना थोरले बाजीराव यांच्याप्रती इतके प्रेम, आदर, भक्ती आहे की त्यांनी त्यांच्या पुत्राचे नामकरण बाजीराव हेच केले आहे. हे सांगताना त्यांना होणार आनंद व त्यांच्या मनातील भावना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होत्या. अजिंक्य योद्धा थोरले बाजीराव त्यांचा जाज्वल्य इतिहास, रावेरखेडी या छोट्या ग्रामातील अनिल बिर्ला यांच्यासारखा युवक, आपल्या चहाच्या दुकानाला पेशवाजी टी सेंटर असे नांव देणारे दयाराम पवार अशा अविस्मरणीय आठवणी घेऊन आम्ही निघालो सूर्यास्ताची वेळ झाली होती गाडी ओंकारेश्वरच्या वाटेला लागली होती. बाजीराव व त्यांचा पराक्रम, आपल्या भावाला साथ देणारे चिमाजी आप्पा, काशीबाई, मस्तानीबाई, बाजीरावांचे निष्ठावान शिंदे, होळकर, गायकवाड, पवार अशी सारी थोर माणसे आठवत होती त्या आठवणीत केंव्हा ओंकारेश्वर आले कळले सुद्धा नाही. अहिल्याबाई होळकर यांचा महेश्वर येथील वाडा, त्यांच्या वस्तू, देवासाठी असलेला सोन्याचा झुला, अनेक देवी देवता असलेले, अनेक शिवलिंग असलेले देवघर,नर्मदेवर बांधलेला सुंदर घाट, राजेश्वर मंदिर हे सारे पाहून व उपरोक्त सर्व ऐतिहासिक महापुरुष व थोरल्या बाजीरावांच्या प्रेमाने भारावून जाऊन त्यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी कार्य करणारा बाजीराव प्रेमाने भारावलेला युवक अनिल बिर्ला या सा-या आठवणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवास करु लागलो.
खरोखरच तुमच्या लिखाणामुळे बाजीरावाचे कार्य जसेच्या तसे डोळ्यासमोर आले.आणि अनिल बिर्ला यांच्या कार्याचे कौतुक वाटलं.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप छान माहिती. अनिल बिर्लांं सारखे तरुण जोमाने व चांगले काम करत आहेत हे वाचून आनंद झाला. तूझ्या माध्यमातून सदरची माहिती आम्हाला मिळाली त्या बध्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप छान माहिती. तरुणांनी खरोखरच असे योगदान द्यायला हवे .अनिल बिर्ला यांचे अभिनंदन.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा