श्रद्धावान लभते ज्ञानम
अखेर त्या 41 मजुरांची सुटका झाली. पंधरा दिवसांच्या प्रयत्नाला अखेर यशप्राप्ती झाली. उत्तराखंड मधील बोगदयात अडकलेल्या त्या 41 मजुरांवर या दिवसात मोठी बिकट परिस्थिती ओढवली होती. त्या अंधाऱ्या बोगदयात इतके दिवस काढणे म्हणजे गंमत नाही. ते मोठे जिकरीचे होते, जीवावर बेतणारा तो प्रसंग होता. जरी त्यांना पाईपद्वारे खाद्य व प्राणवायू पोहोचवला जात होता तरी अशा अंधारगुहेत राहायला भाग पडणे म्हणजे एक परीक्षाच म्हणावी लागेल. कारण खाण्यापिण्याची जरी सोय झाली, प्राणवायूची जरी सोय झाली तरी त्या मजुरांना त्यांच्या शरीरधर्माची मोठी समस्या भेडसावली असेल, काहींच्या प्रकृतीवर परिणाम झालाच पण यातून सर्व सुखरूप बाहेर आले. कोणतेही क्षेत्र असो योजना असो किंवा मोहीम असो युद्ध मोहीम असो सुटकेची मोहीम असो नेतृत्व जर कणखर असेल, सक्षम असेल आणि तितकेच संवेदनशील सुद्धा असेल तर त्याचा प्रभाव संबंधित विभाग व त्या विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर पडत असतो आणि त्यामुळे प्रचंड मोठे, जिकरीचे असणारे काम सुद्धा सोपे होते याची प्रचिती सुद्धा भारत सरकारच्या सद्यस्थितीत असलेल्या नेतृत्वामुळे या मजुरांच्या सुटकेप्रसंगी दिसून आली. मजूर सुखरूप बाहेर आले. ही जरी सरकारी यंत्रणा अधिकारी व सुटका करण्याच्या मोहिमेत समाविष्ट असलेले सर्वजण यांची मेहनत असली तरी "तेथे असावे ईश्वराचे अधिष्ठान" याप्रमाणे ईश्वरी आशिर्वाद सुद्धा कामात आले. सिलकारा बोगदयाजवळ बाबा बौखनाग म्हणून एक मंदिर आहे. रस्त्याच्या कामात या मंदिरावर गंडांतर आले. परिसरातील जनतेला बौखनागचे मंदिर पाडणे मंजूर नव्हते व त्यांची श्रद्धा आड येत होती. मंदिर पाडल्यामुळेच मजूर अडकले असे सुद्धा त्यांना वाटत होते त्यामुळे तेथे एक छोटे मंदिर उभारण्यात आले. इकडे मजुरांना वाचविण्याची मोहीम सुरू होती या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा टनेल मॅन अर्नॉल्ड डिक्स यांना सुद्धा पाचरण करण्यात आले होते. ड्रिल, ऑगर मशीन आणि इतरही अनेक अत्याधुनिक साधनांचा वापर करत ही मोहीम राबवणे सुरू होते. परंतु मशीन सुद्धा थकल्या काही मशीन बंद पडल्या आणि शेवटी हरित लवादाने बंद केलेल्या रॅट मायनिंग याच तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागला आणि बाबा बौखनाग यांच्या कृपेने मजुरांची सुटका झाली. अर्नोल्ड डिक्स यांना सुद्धा बाबा बौखनाग मंदिराबद्दल माहिती मिळाली आणि मजुरांच्या सुटके नंतर बाबा बौखनाग यांना आभार मानण्याचे त्यांनी वचन दिले होते. म्हणून अर्नोल्ड डिक्स यांनी मजुरांच्या सुटकेनंतर बाबा बौखनाग यांचे दर्शन सुद्धा त्यांनी घेतले. तसा व्हिडीओ सुद्धा प्रसार माध्यमांत झळकला.
आपल्या देशात अनेक वेळा देव, देवी, देवता, श्रद्धा, अंधश्रद्धा यावर आपलेच लोक टीकाटिप्पणी करत असतात. आपल्या देवी देवतांना नाकारत असतात. याची प्रचिती आपल्याला अनेक वेळा येते. हे लोक केवळ हिंदू धर्मातीलच श्रद्धा अंधश्रद्धा देवी देवता यांच्यावर जीभ सैल करून टीका करत सुटतात. परंतु जेंव्हा एक विदेशी व्यक्ती सुद्धा बोगदयात अडकलेल्या मजुरांची सुटका झाल्यावर बाबा बौखनाग यांची कृपा मान्य करतो एवढेच नव्हे तर त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांचे दर्शन घ्यायला जातो यातून आपल्या हिंदू समाजातील स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनी बोध घ्यावा. "श्रद्धावान लभते ज्ञानम" असे जे म्हटले गेले आहे ते खरेच आहे. एकदा का तुमची श्रद्धा जडली की ज्ञानाकडे जाणार अनेक मार्ग सुकर होतात. अर्नोल्ड डिक्स यांनी बाबा बौखनागचे दर्शन घेऊन त्यांच्यामध्ये असलेल्या श्रद्धेचे दर्शन समस्त भारतीयांना घडवले आहे. आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे सुद्धा श्रद्धावान होते, पंतप्रधान सुद्धा श्रद्धावान आहे व 41 मजुरांच्या सुटकेसाठी आलेले टनेल मॅन हे सुद्धा श्रद्धावानच म्हणावे लागतील. म्हणूनच त्यांच्या कडून घडणा-या अनेक कृत्यात त्यांच्यातील ज्ञानाची प्रचिती येते. आधुनिक शिक्षण घेतलेले असले आपल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट असले, विदेशी असले तरी अर्नोल्ड डिक्स हे श्रद्धावान दिसले आणि म्हणूनच "श्रद्धावान लभते ज्ञानम" असे म्हणावेसे वाटते.