श्यामजी कृष्ण वर्मा...महान तरीही उपेक्षित
कोंबडा कितीही झाकला तरी तो दिवस निघाला की आरवणारच. तसा दिवस आता निघू लागला आहे, खरा इतिहासरुपी झाकलेला कोंबडा आता आरवू लागला आहे. नुकत्याच आलेल्या काही सिनेमांमुळे लोकांना अनेक गोष्टी कळल्या आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मृतींना सावरकर सिनेमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला.
श्यामजी कृष्ण वर्मा भारताच्या स्वतंत्रता लढ्यातील एक अविस्मरणीय असे नांव. परंतू तरीही अनेकांना हे नांव ज्ञात असेलच असे नाही. 22 मार्च रोजी सावरकर हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात श्यामजी कृष्ण वर्मा यांना सुद्धा दर्शविले गेले आहे. नव्हे तर श्यामजी कृष्ण वर्मा सावरकर सिनेमात दाखवणे क्रमप्राप्तच होते कारण त्यांनी ब्रिटन मध्ये क्रांतिकारकांना राहण्यासाठी "इंडिया हाऊस" नांवाची वास्तू उपलब्ध करून दिली होती. (शालेय पाठयपुस्तकात त्यांचा इतकाच उल्लेख असतो. शिवाय त्यांची जयंती, पुण्यस्मरण पण कधी कुठे होत नाही किंवा झाल्याचे ऐकिवात पण नाही.) कोण होते हे श्यामजी कृष्ण वर्मा ? लंडन मध्ये क्रांतिकारकांना त्यांनी निवासाची सोय कशी काय करून दिली ? असे प्रश्न सावरकर सिनेमा पाहिल्यावर पडले. तत्पूर्वी त्यांच्या उपरोक्त जुजबी माहितीवर समाधान मानून घेतले होते असेच म्हणावे लागेल. पण सावरकर सिनेमा पाहिल्यावर मात्र श्यामजी कृष्ण वर्मा हे नांव डोक्यात फिरू लागले.
त्यांच्याबद्दल जाणून घ्यावेसे वाटू लागले म्हणून मग घरी उपलब्ध असलेल्या सावरकर विषयक पुस्तकात त्यांच्याबाबत काही माहिती धुंडाळली व काही आंतरजालावर (Internet) शोधली. श्यामजींचा जन्म गुजरात मध्ये मांडवी कच्छ येथे 4 ऑक्टो 1857 रोजी झाला होता. शालेय शिक्षणानंतर त्यांनी अजमेर येथे वकिली केली व सोबतच स्वतंत्रता कार्यात सुद्धा सहभाग घेतला. ते बुद्धिमान व क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांच्यावर लोकमान्य टिळक व दयानंद सरस्वती यांचा प्रभाव होता. जात्याच हुशार असल्याने त्यांनी जर्मनी, इंग्लंड येथील शैक्षणिक संमेलनात सहभाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी इंग्लंड मध्ये "द इण्डियन सोशियोलोजिस्ट" नामक मासिक सुद्धा काढले होते. ते इंग्लंड मध्ये असतांना त्यांनी हुशार भारतीय तरुणांना शिष्यवृत्ती देऊन त्यांची इंग्लंड मध्ये राहण्याची सोय केली होती. भारतात आल्यावर त्यांनी 1905 मध्ये क्रान्तिकारक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन इण्डियन होम रूल सोसायटी सुद्धा स्थापित केली होती. ते संस्कृत विषयात सुद्धा चांगलेच पारंगत होते व त्यामुळेच ते ऑक्सफोर्ड विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून सुद्धा नियुक्त झाले होते. हुतात्मा मदनलाल धिंग्रा त्यांचे आवडते विद्यार्थी होते. सावरकर यांना सुद्धा वर्मांनी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. क्रांतीकारक तरुणांना मार्गर्शन, शिष्यवृत्ती, निवासादी सोय उपलब्ध करून देत असल्याने त्यांना क्रांतीगुरू असे सुद्धा म्हणत असत. नुकतीच त्यांची पुण्यतिथी झाली. 31 मार्च 1930 रोजी त्यांचे जिनेव्हा येथे निधन झाले. 1989 मध्ये जरी त्यांचे टपाल तिकीट निघाले असले तरी त्यांच्या अस्थी जिनेव्हा येथेच होत्या. त्या नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2003 मध्ये परत भारतात आणल्या गेल्या. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगांवी म्हणजेच मांडवी येथे त्यांचे स्मारक सुद्धा बनवले गेले ज्याचे राष्ट्रार्पण 2010 मध्ये झाले. यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की बुद्धिमान, क्रांतिकारी देशभक्तांची किती अवहेलना आपल्याच देशातील नेत्यांनी स्वतंत्रता प्राप्तीनंतर केली. श्यामजी कृष्ण वर्मा सारख्या क्रांतिकारकांना मार्गदर्शन तसेच विदेशात इंडिया हाऊस ही निवासाची सोय करणा-या महान देशभक्ताच्या अस्थी विदेशातून आणण्यास आपल्याला 73 वर्षे लागली. त्यांचे स्मारक बनवण्यास 80 वर्षे लागली. सावरकरांची मालमत्ता सुद्धा जप्त झाली होती. स्वतंत्र भारतात सुद्धा सावरकरांना अटक करण्याचे दुष्कृत्य, महापातक स्वतंत्र भारताच्या आपल्याच सरकारने दोन वेळा केले होते. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या बाबत सुद्धा किती कमी माहिती जनमानसांत आहे. याला कारण म्हणजे स्वातंत्र्य फक्त काही लोकांमुळेच व त्यांच्याच तत्वांमुळे मिळाले हे सिद्ध करण्याचा स्वातंत्र्योत्तर काळात केलेला अट्टाहास. परंतू असे करणे, खरा इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न करणे हे काही चिरकाल टिकणारे नसते. कोंबडा कितीही झाकला तरी तो दिवस निघाला की आरवणारच. तसा आता दिवस निघू लागला आहे, खरा इतिहासरुपी झाकलेला कोंबडा आता आरवू लागला आहे. 370 , काश्मीर फाईल, केरला स्टोरी, सावरकर यांसारख्या सिनेमांमुळे लोकांना अनेक गोष्टी कळल्या आहे. लोक विचार करू लागले आहेत. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मृतींना सावरकर सिनेमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. नुकतीच वर्मा यांची पुण्यतिथी झाली. वर्मा यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. आजच्या काळात सुद्धा अनेक भारतीय विदेशात जात आहेत परंतु त्यांच्या हृदयात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारा श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यासारखा तिकडे कुणी नाही. असेल का ? असल्यास त्याला नमन. श्यामजी कृष्ण वर्मा यांना विनम्र अभिवादन.
Khup chhan lekh lihala Khup chhan mahiti dili great work vinay ji 🙏🙏
उत्तर द्याहटवाअशा प्रकारची माहिती तुमच्या लेखांमधून मिळते त्यामुळे जनमानसात जागरूकता निर्माण होत आहे
उत्तर द्याहटवा