Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/०३/२०२४

Article about Sawarkar Movie by Randeep Huda

..हमे लोग याद भी रखेंगे या नही ?
कोण कशी विसरेल तुमची जाज्वल्य देशभक्ती ? कोण कशी विसरेल तुमची ती साहित्य प्रतिभा ? कोण कशी विसरेल ती समुद्रात मारलेली ऐतिहासिक उडी, कोण कसा विसरेल तुमचा त्याग ? कोण कसा विसरेल तुमचे ते रत्नागिरीतील समाज सुधारणेचे कार्य ? कोण कसे विसरेल तुमचे ते मराठी भाषेस अनेक शब्द देणे ?
सावरकर चित्रपटात सावरकरांनी हा प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न ऐकल्यावर विचारात पडलो आणि हा लेख लिहायला घेतला. पण प्रथम थोडे चित्रपट व त्या विषयीच्या मते मतांतर बाबत.
     दिनांक 22 मार्च रोजी सावरकर हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचा ट्रेलर हा समाज माध्यमांवर झळकलाच होता. हा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा असा  होता. या ट्रेलरनंतर व सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सावरकर या सिनेमाबद्दल अनेक परीक्षणे, अभिप्राय, मते प्रकाशित होत आहेत. बहुतांश परीक्षणामध्ये सावरकर सिनेमात रणदीप या अभिनेत्याबद्दल चांगलीच मते नोंदवलेली आहेत आणि ते खरे पण आहे. सावरकरांवर सिनेमा काढणे म्हणजे हे एक दिव्यच आहे. असेच दिव्य सुधीरजी फडके यांनी काही वर्षांपुर्वी वीर सावरकर यांच्यावर मराठीत सिनेमा काढून पार पाडले होते. तो सिनेमा सुद्धा खूपच चांगला झाला होता. सुधीरजींना उपाख्य बाबूजींना तो सिनेमा निर्माण करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले होते. सावरकर आणि कष्ट हे नातेच होते. तसेच ते बाबूजी व रणदीप हुडा या हरियाणाच्या निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्यास सावरकर सिनेमा निर्माण करतांना सुद्धा पडले. बाबूजी व रणदीप या दोघानांही सिनेमा निर्मितीसाठी मोठी आर्थिक जुळवाजुळव व तडजोड करावी लागली. खरे तर अनेकांच्या परीक्षणानंतर व सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या 8 दिवसानंतर हा लेख लिहत आहे. हे काही परीक्षण नाही तर दोन बाबींचा उहापोह आहे. पहिली बाब म्हणजे सावरकर व अभिनेता हुडा व दुसरी चित्रपटाबद्दल होत असलेल्या चर्चा.
    पहिल्या बाबी बद्दल बोलायचे तर  सावरकर हा सिनेमा सुरुवातीपासूनच दर्शकाच्या मनाची  पकड घेतो. रणदीपने स्वतंत्रतापूर्वीचा काळ, महाराष्ट्रात आलेली प्लेगची साथ, साथीच्या दरम्यान जनतेवर भीषण अत्याचार करणाऱ्या रँडचा वध करणारे चाफेकर बंधू इथपासून चित्रपट पुढे सरकतो. लोकमान्य टिळक, त्यांचे नेतृत्व योग्य पद्धतीने दाखवलेले आहे. तरुण सावरकर, त्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन संघटन करणारे सावरकर मदनलाल धिंग्रासारख्या मस्तीत, मौजमजेत राहणाऱ्या तरुणाचे मत परिवर्तन करून त्याला देशभक्तीच्या मार्गाकडे आणणारे सावरकर, त्यानंतर त्यांची ती ऐतिहासिक उडी, राजनैतिक कैदी, फ्रान्सच्या ताब्यात ठेवले जावे म्हणून कोर्टात केलेला युक्तीवाद, काळ्यापाण्याची शिक्षा सर्व दृश्ये चितारण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी झाला आहे. अंदमानातील या शिक्षेची दृश्ये जनतेच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. भारतमातेचा सुपुत्र स्वातंत्र्यासाठी नरक यातना भोगल्या तरीही स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयाने  व सकारात्मकतेच्या जोरावर टिकून राहिला, सेल्युलर जेल मधूनही भारताच्या स्वातंत्र्याची चिंता वाहत राहिला, तिथेही कैद्यांचे एकत्रीकरण केले, त्यांना शिकवले, बाटलेल्या कैद्यांना परत हिंदू धर्मात आणले. सावरकरांच्या माफीबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या लोकांना सुद्धा या चित्रपटातून उत्तर मिळाले आहे की शत्रूच्या तावडीतून, नरकासारख्या कैदेत खितपत पडण्यापेक्षा बाहेर येऊन देशासाठी काही ना काही तरी करता येईल यासाठी इंग्रजांच्या तावडीतून सु सुटण्याची सावरकरांची माफी म्हणजे एक युक्ती होती. शिवाजी महाराजांनी सुद्धा अफजलखानाला ते घाबरले आहेत असे संदेश पाठवले होते म्हणून काय ते खरचं अफजल खानाला घाबरले होते असे नाही. परंतु काही नतद्रष्ट लोक हकनाक माफी माफीची ओरड करीत राहतात. अंदमानातून सुटून आल्यावर रत्नागिरीला त्यांनी केलेले समाज सुधारणेचे कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे. आणखी कितीतरी गोष्टी रणदीपने खुप छान दाखवल्या आहे व त्याने अभिनय सुद्धा खुप छान केला आहे. अंदमानातील त्याची वेशभूषा, त्याने घटवलेले वजन हे सारे निर्विवाद वाखाणण्याजोगे आहे. इतर पात्र निवड सुद्धा छान जमली आहे. एकूणच चित्रपट सर्वांगसुंदर आहे.
     आता दुस-या बाबी विषयी बोलूया. दुसरी बाब आहे सावरकर चित्रपटासंबंधी सुरू असलेल्या चर्चा व माध्यमातून व्यक्त होत असलेल्या मते मतांतरांची. सावरकरांची देशभक्ती त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि त्यांचे विचार हे तत्कालीन लोकांना सुद्धा पचनी पडले नाही तर ते आताच्या  लोकांच्या काय पचनी पडणार ? असेच या मते मतांतरांवरून लक्षात येते. सिनेमात सावरकर जेव्हा जेलमधून सुटून येतांनाचे एक दृश्य दाखवले आहे. या दृश्यात तुरुंगातून जेंव्हा ते बाहेर येतात तेंव्हा क्षणभर ते इकडे तिकडे बघतात तर त्यांना घेण्यास फक्त त्यांचे मोठे भाऊ आलेले त्यांना दिसतात हे दृश्य खूपच बोलके आहे. आजही स्वतःला पुरोगामी विचारांचे समजले जाणारे लोक विविध वृत्तपत्रे व त्यांच्या समाज माध्यमांवरील प्रतिक्रिया यावरून हेच दिसून येते. काही वृत्तपत्रांनी तर सावरकर चित्रपटाच्या कमाईबद्दल एकापाठोपाठ एक पोस्ट टाकण्याचेच काम केले. जणू काही त्यांना हा चित्रपट कसा फ्लॉप होतो आहे हे सिद्धच करायचे होते. तसेच अनेकांनी चित्रपटाकडे लोकांनी पाठ फिरवली आहे, प्रतिसाद कमी आहे अशा स्वरूपाच्या पोस्ट टाकल्या. या सर्व लोकांना हेच सांगावेसे वाटते की त्यांचा सावरकर विषयक अभ्यास हा अत्यल्प आहे त्यांनी प्रथम सावरकर वाचावे व मग प्रतिक्रिया द्याव्या असे वाटते. अशी इतरही अनेक मते मतांतरे आहेत परंतु ती सर्व लिहायची म्हटली तर हा लेख खूप प्रदीर्घ होईल. त्यामुळे आता इथे विराम घ्यावा लागेल. परंतु तत्पूर्वी चित्रपटातील एक दृश्याबद्दल सांगावेच लागेल.
     चित्रपटात एका दृश्यात सावरकर म्हणतात, पता नहीं हमे लोग याद भी रखेंगे या नही ? या चित्रपटात दिग्दर्शकाने असे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत ज्यांची उत्तरे दर्शकाला शोधावी लागतात. क्या हमे लोग याद भी रखेंगे या नही ? या सावरकरांनी चित्रपटात उपस्थित केलेल्या प्रश्र्नास उत्तर देताना ते प्रश्नात्मकच द्यावेसे वाटते ते म्हणजे, कोण कशी विसरेल तुमची जाज्वल्य देशभक्ती ? कोण कशी विसरेल तुमची ती साहित्य प्रतिभा ? कोण कशी विसरेल ती समुद्रात मारलेली ऐतिहासिक उडी, कोण कसा विसरेल तुमचा त्याग ? कोण कसा विसरेल तुमचे ते रत्नागिरीतील समाज सुधारणेचे कार्य ? कोण कसे विसरेल तुमचे ते मराठी भाषेस अनेक शब्द देणे ?
     सावरकरजी आपने सिनेमा मे जो सवाल पुछा उसका जवाब छोटा बच्चा भी यही देगा की, सावरकरजी आपको और आपके पूरे परिवार को जब तक सूरज चांद रहेगा तब तक ये देश तो क्या आनेवाली सारी पिढीया याद रखेंगी यह  सभी को विश्वास है |

२ टिप्पण्या:

  1. Agadi barobar Savarkarana jya divashi visral tya divashi ha Hindustan nasel tar Hindustan jya vichranvar akhand aani bhakkam ubha aahe to keval Kattar Deshbhakt shree Savarkar yanchya vicharanvar Jay Hind

    उत्तर द्याहटवा
  2. लेख खूप चांगला लिहिलेला आहे.सावरकर म्हणजे देशभक्ती. नुसते सावरकर नाही तर त्यांच्या कुटुंब देशभक्तीसाठीच निर्माण झाले होते. सावरकरांना विसरणं अशक्य. प्रत्येक तरुणाने पाहावा असा हा पिक्चर आहे. देशभक्ती कशी असावी हे सावरकरांकडून शिकावे.

    उत्तर द्याहटवा