Click "Follow" Button below To Follow this Blog

२७/०६/२०२४

Article about tolerance of Khamgaon citizens

खामगांव, एक सहिष्णू शहर 

खामगांवकर नागरिक हे मोठे सहिष्णू आहेत आणि त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की सिल्वर सिटी, कॉटन सिटी याप्रमाणेच आता Most Tolerate City अर्थात सहिष्णू शहर म्हणून सुद्धा खामगांवची ओळख करून दिली तर काही वावगे होणार नाही.

काही वर्षांपूर्वी भारतातील सहिष्णूतेबाबतच्या चर्चा देशभर झाल्या होत्या. मोठा उहापोह तेंव्हा झाला होता. सहिष्णू देश म्हणून भारताची ओळख जुनी आहे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा भारताने जगाला सहिष्णूतेचा संदेश दिला आहे असे म्हटले आहे. याच अनुषंगाने आपले खामगाव शहर सुद्धा सहिष्णू शहर आहे असे म्हणावेसे वाटते. केवळ  सहिष्णू नव्हे तर जगातील सर्वात सहिष्णू शहर आहे असे आता वाटायला लागले आहे. याची कारणे अनेक आहेत आणि ती सर्वपरिचित सुद्धा आहेत. तरीही इथे त्या कारणांची पुनरोक्ती करणे क्रमप्राप्त आहे.

खामगाव शहरातील सर्वात जुनी समस्या व नागरीक ज्या समस्येबाबत पुर्णपणे सहिष्णू झालेले दिसतात ती म्हणजे पाण्याची समस्या. खामगाव शहराला पूर्वी जनुना तलावावरून पाणीपुरवठा होत असे. ती पाईपलाईन अद्यापही आहे, ती कार्यान्वित सुद्धा होऊ शकते व शहराच्या अगदी लगतचा मोठ्या जलसाठ्याचा लाभ खामगांवकरांना होऊ शकतो. पण त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सध्या  ज्ञानगंगा धरणातून खामगावला पाणीपुरवठा सुरू आहे. आता खामगावची लोकसंख्या वाढली, पाण्याची मागणी अधिक होऊ लागली आहे.  पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी खामगावला भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती म्हणून तेंव्हा  आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होऊ लागला तो आजतायागात कायमच आहे. त्यातच कधी बूस्टर पंप खराब होणे तर कधी पाईपलाईन फुटणे, विद्युततारांवर झाडे कोसळल्याने किंवा फांद्या कोसळल्याने धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होणे व त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे, तर कधी बिबट्याच्या धाकाने कर्मचाऱ्यांचे पाणीपुरवठा कार्यासाठी न जाणे अशा अनेक समस्या खामगावचा पाणीपुरवठा करताना येत असतात. त्या जाहीर झाल्यावर खामगावचे सहिष्णू नागरिक मूकपणे आपली-आपली पाण्याची व्यवस्था करतात. कुणी टँकर, कोणी कॅन तर कुणी लीक झालेल्या व्हॉल्व वरून आपली पाण्याची गरज भागवतात. पूर्वी पाणी नसले की घागर मोर्चा, महिलांचा मोर्चा असे किमान ऐकू तरी यायचे,  वृत्तपत्रातून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांच्या बातम्या वाचनात यायच्या, सुरळीत पाणीपुरवठा व्हावा असे गा-हाणे मांडले जायचे पण आता खामगांवकरांना विस्कळीत पाणी पुरवठा इतका अंगवळणी पडला आहे की उपरोक्त मागण्या सुद्धा आताशा होणे बंद झाले आहे. 

     खामगांवकर नागरिकांच्या सहिष्णूतेच दुसरे उदाहरण म्हणजे महावितरणचे. दरवर्षी पावसाळा येण्यापूर्वी महावितरण विद्युत तारांच्या आजूबाजूच्या वृक्षांची छाटणी करतात जेणेकरून पावसाळ्यात काही समस्या निर्माण होवू नये.  हे त्यांचे कार्य चांगलेही आहे व ते नियमितपणे होत सुद्धा असते. परंतु पावसाळा सुरू झाला की, अत्यल्प पाऊस पडणाऱ्या खामगांवात वारं-उधाण , पाऊस नसतांना थोडी जरी हवा सुटली की लगेच विद्युत पुरवठा खंडित होण्याचा चांगलाच अनुभव आहे. खामगांव शहरात कमी पाऊस पडतो त्यामुळे इथे जून महिन्यात सुद्धा प्रचंड गर्मी असते. नागरिकांना मोठ्या उकाड्याला सामोरे जावे लागते पण तरीही पाऊस, वारा, वादळ नसतांना  आणि विजा सुद्धा चमकत नसतांना खामगावला विद्युत पुरवठा खंडित होतो. कालचेच उदाहरण काल संध्याकाळी पाऊस सुरू होण्यापूर्वी एक तास विद्युत पुरवठा खंडित होता. तो का खंडित होता याचे कारण सुद्धा सांगितले जात नाही. मागे  विद्युत पुरवठा खंडीत होणार असला की एसएमएस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, ती सुद्धा आता कार्यान्वित नसल्याचे दिसते. तक्रारीच्या दूरध्वनीवर तक्रार करण्यासाठी नागरीक गेले असता तो दूरध्वनी कोणीच उचलत नाही असा अनुभव कित्येक नागरिकांना आलेला आहे व येत असतो. नागरीक तक्रार करण्यासाठी प्रत्यक्ष गेले असता तिथे तक्रारीची नोंद रजिस्टर मध्ये केली जाते आणि त्यांची बोळवण केली जाते. याही उदाहरणात खामगावचे सहिष्णू नागरिक विद्युत पुरवठा पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करत निमूटपणे घरी बसलेले असतात. पण एक जरी विद्युत बील भरण्यास विलंब झाला तर महावितरणचे कर्मचारी लगेच घरी येतात.

    आता खामगांवकरांच्या वाहतूक सहिष्णूते बाबत बघू. खामगांव  शहर आता खूप विस्तारित झाले आह गृह कर्ज सोपे झाल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात बांधकाम करून राहिले आहेत. तसेच सुलभ कर्ज सुविधामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी व चार चाकी वाहने खरेदी होत आहेत. या वाहनांमुळे जुन्या अरुंद रस्त्यांच्या भागात, जिथे बाजारपेठ आहे तिथे खूप गर्दी असते. परवाचेच उदाहरण द्यायचे झाले तर भगतसिंग पुतळ्याजवळ कुण्या एका नागरिकाने गाडी रस्त्यातच उभी केली होती. व तो दुकानात गर्दी असल्याने प्रतीक्षेत उभा होता. लोक हॉर्न वाजवत जात होते. थोड्या वेळाने एक चार चाकी वाहन आल्यावर मात्र त्या वाहनाला जाण्यास अपुरा रस्ता होता त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. अनेकांनी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण पण सुरू केले परंतु तरीही तो गाडीवाला बहादुर काही गाडी हटवण्यास तयार नव्हता. शेवटी लोक ओरडायला लागले "अरे किसकी गाडी है, किसकी गाडी है?" तेव्हा तो महाभाग गाडी सरकवण्यास बाहेर आला व वाहतूक पुन्हा सुरू झाली. परंतु खामगांवच्या आम्हा सहिष्णू नागरिकांनी किंवा रहदारीतील सहिष्णू जनांनी त्या माणसाला एकाही शब्दांनी गाडी रस्त्यात का उभी केली किंवा बाजूला का उभी केली नाही असे काही म्हटले नाही. तसेच  वाहतूक, अतिक्रमण यांबाबत कुणी काही वाच्यताही करीत नाही, मग ते अधिका-यांच्या सरकारी निवासस्थाना समोर का असेना.

     तीच गत सरकारी कार्यालयांची सरकारी कार्यालयामध्ये खामगांवकर नागरिक गेले असता अनेक वेळा त्यांना कर्मचारी जागेवर नसल्याचे दिसते. ते कर्मचारी इतरत्र कुठे गेलेले असतात त्याही प्रसंगी सहिष्णू खामगावकर नागरिक एक तर त्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसतात किंवा थकून घरी जातात व पुन्हा दुसऱ्या दिवशी आपले कामकाज करण्यासाठी कार्यालयाची चक्कर मारतात. 

     अशी इतरही काही उदाहरणे आहेत, निवडणूकांत सुद्धा मोठी उदारता, सहिष्णूता खामगांवकर पूर्वी पासूनच दाखवत आले आहे असे नागरिकच बोलत असतात. वरील काही उदाहरणांवरून असे लक्षात येते की खामगांवकर नागरिक हे मोठे सहिष्णू आहेत आणि त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की सिल्वर सिटी, कॉटन सिटी याप्रमाणेच आता Most Tolerate City अर्थात सहिष्णू शहर म्हणून सुद्धा खामगांवची ओळख करून दिली तर काही वावगे होणार नाही.

४ टिप्पण्या: