मुसळधार वृष्टी आणि गाडी नंबर 716
यंदाच्या सहा जुलैच्या दुपारी आकाश काळ्या मेघांनी आक्रमून आले होते. त्रस्त होत असलेल्या उकाड्यामुळे समस्त जनांना हे घन केंव्हा बरसतात याची प्रतिक्षा होती, अन ते जे बरसू लागले ते थांबले आठ जुलै 24 रोजी. वातावरण गारठले, विशेष म्हणजे विद्युत पुरवठा सुरळीत होता. मी 8 जुलै रोजी सकाळी पावसाचा मस्त आनंद घेत भिजत होतो तेवढ्यात दूरवरून परिचित असा घंटीचा आवाज कानी पडू लागला. सोबतच "स्वच्छ भारत है हमारा" हे गीत सुद्धा ऐकू येत होते आणि थोड्याच वेळात आमच्या घरासमोर नगर परिषदची कचरा गोळा करणारी गाडी येऊन उभी राहिली. मला आश्चर्य वाटले, एवढ्या जोरात सुरू असलेल्या पावसात सुद्धा घंटागाडी घेऊन फिरणारे ते कर्मचारी आमच्या घरासमोर कचरा गोळा करण्यासाठी म्हणून हजर झाले होते. मला त्यांची ती कर्तव्य तत्परता खूप भावली आणि प्रेरित सुद्धा करून गेली. एरवी कर्तव्यदक्षता हा शब्द अधिका-यांच्याच बाबतीत वापरला जातो परंतू इतरही अनेक कर्मचारी जे उच्च पदावर नसतात परंतू कर्तव्य तत्पर असतात पण त्यांचा गौरव, सन्मान क्वचितच होतांना दिसतो, त्यांची दखल त्या मानाने कमी घेतली जातो. समाजाकडून अशा छोट्या पदांवर असलेल्या व कर्तव्यदक्ष असलेल्या कर्मचा-यांचा सुद्धा गौरव होणे अपेक्षित असते. असेच आणखी एक उदाहरण मला त्याच दिवशी मिळाले. त्या दिवशी माझी बहीण अगदी सकाळी खामगांवला आली होती पावसात त्यांची बस पुरामुळे थांबली असता चालकाने त्याला दररोज भर पहाटे त्याच्या खेड्यातून बस स्टँडवर कर्तव्य बजावण्या करता हजर राहावे लागते ते प्रवाशांशी झालेल्या चर्चेत सांगितले. भर पावसात भल्या पाहटे खेड्यातून शहरात ड्युटीवर हजर होणारा तो व त्याच्यासारखे इतरही अनेक चालक/वाहक यांना कधी आपण कुणी "आभारी आहे" असे सुद्धा म्हणत नाही. ते दोघे कचरा गोळा कर्मचारी सुद्धा भर पावसात सकाळी घरून निघून त्यांचे कर्तव्य बजावत होते म्हणून त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. मी त्यांना दोन मिनिटे थांबण्याची विनंती केली, त्यांच्यासोबत फोटो काढला. त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेतलेली पाहून आनंद झाला, तो त्यांच्या मुखावर दिसू लागला. आमच्या भागात बरीच वाहने असतात तरी या घंटा गाडीचे चालक गाडी रिव्हर्स फॉरवर्ड करून प्रत्येकाच्या घरासमोर आणतात हे माझे निरीक्षण मी त्यांना सांगितले असता ते आणखीनच खुलले. त्यांचा फोटो काढला व थोडीफार चौकशी केली असता त्यांनी विचारले की, "सर तुम्ही आमची माहिती का विचारत आहात ?" "सकाळपासून जोरात सुरू असलेल्या पावसात तुम्ही तुमचे कर्तव्य बजावत आहात म्हणून." अनेकदा आपण पाहतो की थोडासा जरी पाऊस असला तर त्याही पावसाचा बहाणा बनवून काम पुढे ढकलले जाते, कर्तव्यात कसूर केल्या जाते. पण ती दोघे मात्र त्यांचे काम चोखपणे करत होते. आणखी थोडा वेळ आमचा संवाद पावसातही चाललाच होता. त्यांना मी लेखक असल्याचे सांगितल्यावर ते मला म्हणाले सर तुम्ही जर आमच्या बाबत लिहिले तर आमचा गाडी नंबर व प्रभाग नंबर पण टाकालं का? "का नाही मी तर तुमचे नांव सुद्धा टाकेल" मी उत्तरलो व त्यांचे नांव सुद्धा विचारून घेतले. ते निघून गेल्यावर कर्म, कर्मफल, सहेतूक कर्म, कर्तव्य इ . बाबतचे विचार माझ्या मनात बराच वेळ घोळत राहिले. माझी पण शाळेची वेळ जवळ येत होती, मला सुद्धा वेळेवर पोहचायचे होते म्हणून मी पुढील कार्यात मग्न झालो. शाळेत जातांना
"विमोह त्यागून कर्मफलाचा, सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था"
हे सुधीर फडके यांनी गायलेले जुने मराठी गीत आठवू लागले. पुढे मी माझ्या कामात व्यस्त झालो. शाळेतून घरी आल्यावर त्यांनी सांगितलेला प्रभाग क्रमांक चार आठवला, माझ्या मुलाने त्यांची नांवे वहीत लिहून ठेवली होती. त्या गाडीचे चालक संतोष मुळीक व मदतनीस दिनेश गोहर होते. पण त्यांनी सांगितलेला गाडी नंबर काही आठवेना. सायंकाळी पुन्हा बाहेर पडलो असता थोडा पाऊस सुरू झाला एक गाडी माझ्या समोर होती त्या गाडीचा क्रमांक 716 होता. "अरे ! हाच तर तो त्या सकाळच्या घंटा गाडीचा नंबर." मनातल्या मनात मी उद्गारलो. सकाळच्या पावसाच्या वेळी त्यांनी सांगितलेला नंबर मला सायंकाळच्या पावसाच्या वेळी आठवला. घंटागाडीवाले ते दोघे संतोष मलिक व दिनेश गोहर यांची कर्तव्यदक्षता, प्रभाग क्रमांक चार, मुसळधार पाऊस आणि गाडी क्रमांक 716 हे आता दीर्घकाळ पर्यंत माझ्या स्मरणात राहतील असे मला वाटू लागले.
Great work and great appreciation by you Vinay ji aap sabhi ko mera pranam
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख अगदी मनापासून लिहिलंय sir
उत्तर द्याहटवाखरंच आहे तुमच्याकडून आम्हाला या लेखाद्वारे प्रेरणा मिळाली तुम्ही केलेले कार्य खूपच चांगले आहे. खूप छान लिहिलेले आहे
उत्तर द्याहटवाखूप छान वाटल , हा लेख वाचून.. खरच त्यांची कर्तव्य दक्षता सन्मानिय आहे
उत्तर द्याहटवाआपल्या नजरेतून छोटी छोटी गोष्ट बघून त्याची दखल घेतली जाते
उत्तर द्याहटवा