हर हसीं चीज का मैं तलबगार हूं |
खरे तर तो एक अल्पउत्पन्न गटात मोडणारा खेडूत, खजूरच्या झाडांपासून निघणा-या रसापासून गुळ बनवून तो विकण्याचा व्यवसाय करणारा. अगदीच सर्वसामान्य असा. अमिताभच्या वाट्याला अशा भूमिका क्वचितच आल्या आहेत. सौदागर या राजश्रीच्या चित्रपटात अमिताभने गुळ विक्रेत्याची भूमिका साकारली होती, त्याच चित्रपटातील “हर हसीं चिज का मै तलबगार हूं” हे गीत मला गत रविवारी मलकापूर जवळच्या वडनेर भोलजी या गावापासून जवळच असलेल्या निंबोडा देवीच्या निसर्गरम्य परिसरात गेल्यावर आठवले. सौदागर एक क्लासिक सिनेमा. त्यातील हे गीत संगीतप्रेमी, दर्दी लोकांना आता आठवले असेलच. या गीतात गुळ विकणारा अमिताभ किशोरकुमारच्या आवाजात व रविंद्र जैन यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतात स्वत:चे वर्णन करतांना तो कसा रसिक आहे, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद मानून जगणारा आहे, ज्याने गुळ बनतो त्या रसाचा, जीवनातील विविध रसांचा, फुलांचा, गीतांचा तो कसा “बिमार” आहे हे व्यक्त करतो. त्याच्या आनंदी वृत्तीने जगण्याच्या, तो करीत असलेल्या कामावर प्रेम व त्यात आनंद मानण्याच्या जगण्याच्या त-हेमुळे गावातील लोक त्याला “रसिया” म्हणतात असेही तो सांगतो. याच गीताच्या ओळी मग मी एक फोटो पोस्ट करतांना कॅप्शन म्हणून वापरल्या. त्या ओळी अनेकांना भावल्या हे त्या गीतकाराचे महात्म्य. तो फोटो व त्याला दिलेले ते "हटके" असलेल्या जुन्या श्रवणीय गीताच्या मुखड्याचे कॅप्शन पाहून धनंजय टाले या माझ्या मित्राने परगावाहून संवाद साधला. सौदागर हा त्याचा व माझाही अतिशय आवडता सिनेमा. मग आम्ही साधी जीवनशैली, समाधानी वृत्ती आदींवर खुप बोललो त्यावरूनच मग त्याला “मिलर ऑफ द डी” ही आनंदी वृत्तीने जीवन व्यतीत करणा-या त्याच्या वडिलांनी फार पुर्वी सांगितलेल्या एका चक्कीवाल्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर आधारीत कवितेची आठवण सांगितली. त्याच्या स्मृती जागृत झाल्यावर मग माझ्याही विस्मृतीत गेलेली ती कविता मला पण आठवली. माझ्या डोळ्यासमोर एक नदी व त्या नदीच्या प्रवाहावर चालणारी चक्की आणि चक्कीवाला येऊ लागला.
हा चक्कीवाला सुद्धा त्या सौदागर मधील अमिताभप्रमाणेच आनंदी वृत्तीने जगणारा, समाधानी, ग्रामीण माणूस. सी. मॅके नामक कवीच्या कवितेतील या मिलरची अर्थात चक्कीवाल्याची डी नदीच्या प्रवाहावर चालणारी पाणचक्की असते. तिच्यावरच त्याची उपजीविका असते. हा खुश-मिजास मिलर त्याची चक्की अतिशय इमाने-इतबारे व जे काम त्याला मिळाले आहे त्यात आनंद घेऊन चालवत असतो. हा मिलर त्याचे काम करतांना गीत गात असतो की, "मी कुणाचा द्वेष करीत नाही व कुणी माझा द्वेष करीत नाही" कवीने त्याच्या गाण्याला लार्क पक्षाच्या मधूर आवाजाची उपमा दिली आहे. या मिलरला गीत गाता-गाता कार्यमग्न असतांना एक दिवस राजा पाहतो. "तू इतका आनंदी कसा आहेस? मलाही तुझ्यासारखे आनंदी व्हायचे आहे मला तर वाटते आहे की तू माझे हृदय घे आणि मला तुझे आनंदी हृदय दे" असे राजा त्याला म्हणतो. मिलर हसतो आणि म्हणतो की, "मी माझ्या कुटुंबासाठी पुरेल एवढे कमावतो, माझी बायको, मुले आणि मित्रांवर प्रेम करतो, आणि माझ्यावर कोणत्याही प्रकारचे कर्जही नाही. या नदीचा सुद्धा मी आभारी आहे की जिच्यामुळे माझी गुजराण होते. हे माझ्या आनंदाचे कारण आहे." ज्याप्रमाणे संत कबीराने म्हटले आहे की
"साई इतना दिजीये जा मे कुटुंब समाय
मै भी भुका ना रहू साधू न भुका जाये"
कबीराच्या या दोह्याशी जुळेल असेच काहीसे त्या मिलरचे म्हणणे असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवते. पण राजा त्याला पुढे म्हणतो की, "तुझा द्वेष कोणी करत नाही असे तू म्हणू नको. कारण की आता मीच तुझा द्वेष करू लागलो आहे. कारण की तू जितका आनंदी आहे तसा तर सर्व ऐश्वर्य सुखोपभोग असूनही मी सुद्धा नाही. मला तर तुझी ही पिठाळलेली टोपी माझ्या मुकुटा पेक्षाही मूल्यवान वाटत आहे व तुझी ही चक्की माझ्या राजवाड्यापेक्षाही मला श्रेष्ठ वाटत आहे तुझ्यासारखे आनंदी प्रामाणिक कष्टाळू लोक हे हेच इंग्लंडचे भूषण आहे."
वरील गीत व कविता आठवल्यावर आजची जीवनशैली कशी झाली आहे हे पण मला आठवले. आज आपण बघतो आनंद मिळवण्याच्या नादात नाना प्रकारच्या वस्तू आपण खरेदी करतो. कुटुंबीयांना खुश करण्यासाठी भेटवस्तू देण्याचे प्रमाण किती वाढले आहे. जणू काही वस्तू प्राप्त झाली किंवा खरेदी केली तरच आनंद मिळतो. आनंदासाठी वस्तूची गरज असते का ? , खरा आनंद कुठून मिळेल याचा विचार होतांना दिसत नाही. सुलभ कर्ज सुविधेमुळे प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे. त्यामुळे वरून जरी आनंद दिसत असला तरी आत प्रचंड तणाव असतो. आज आपल्या देशात भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत पण आनंदी लोकांच्या जागतिक यादीत मात्र आपण खूप पिछाडीवर आहोत.
आपल्या उपजीविकेचे साधन आपले मित्र आपले कुटुंब कोणाचाही द्वेष न करणे, उगाच कर्ज न घेणे, साधी समाधानी वृत्ती असणे, "हर हसीं चीज का मैं तलबगार हूँ" याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहणे असा संदेश देणारे हे सौदागर सिनेमातील अमिताभचे गीत आणि "मिलर ऑफ द डी" या कवितेतील चक्कीवाला आपल्याला हाच संदेश देतात.
तलब = आवडणे /छंद
तलबगार = आवड असणारा (चाहनेवाला) / छंदी
Song Link 👇
https://youtu.be/rsuzrIVoFYY?si=a1NJ3268vQsSFdK5
लेख खूप चांगला आहे. तलबगार या शब्दाचा अर्थ या लेखामुळे कळला. तुमच्या लेखामुळे बरीच नवीन माहिती मिळते.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाSimple life sweet life khup khup chhan lekh tasech khup chhan vishleshan aata tari lokana kalale asel ki jag aanandamay aahe fakt tashi drushti pahije Thank you so much Vinay ji 🙏
उत्तर द्याहटवाThanks , पण आपले नांव दिसत नाही.
हटवाअमिताभ बच्चनचा सौदागर पिक्चर माझ्या आवडत्या पिक्चर पैकी एक आहे ,त्यामधले या गीताचा खूप छान अर्थ समजून सांगितला
उत्तर द्याहटवाकाही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल तुझ्या या ब्लॉगमुळे
तू लिहीत रहा आम्ही वाचत राहू...
धन्यवाद, आपले नांव दिसत नाही, नांव सांगावे
हटवा