क्रेझी किया रे !
भारतात चित्रपट निर्मिती ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली आहे. चित्रपट तेव्हा चित्रपटच होता, त्याचा बोलपट झालेला नव्हता. म्हणजे बोलपट होण्याच्याही आधीपासून चित्रपटांचे वेड हे भारतीय जनतेला लागले. कारण त्या काळात हे तंत्र नवीनच होते. पडद्यावर कुणीतरी आपल्यासारखीच हालचाल करतांना दिसते आहे, हे पाहणे म्हणजे तत्कालीन जनतेसाठी नवलाईचीच बाब होती. ते नवल पाहण्यासाठी म्हणून अबाल-वृद्ध, गरीब-श्रीमंत सर्वच लोक गर्दी करू लागले. आज जसे जनतेला तरुणांना मोबाईलचे वेड आहे, तसे तेंव्हा चित्रपट वेड होते असे म्हटले तर त्यात काही वावगे नाही. स्वातंत्र्योत्तर काळात तर हे चित्रपटवेड अधिकच वाढत गेले, कारण चित्रपट बोलू लागला होता, अर्थात त्यात आवाज, संगीत, गीतांचा समावेश होऊन तो बोलपट झाला होता. चांगली गाणी, संगीत यांचा समावेश झाल्याने व पुढे हा चित्रपट रंगीत झाल्यावर तर चित्रपटांचे वेड अधिकच वाढले. ज्या गावात टॉकीज नव्हत्या त्या गावातील लोक मिळेल त्या वाहनाने अथवा सायकलने सुद्धा मोठ्या शहरात डबे घेऊन चित्रपट पाहण्यासाठी जात असत. मला आठवते मी लहान असतांना राजकारणात गेलेला अमिताभ जेंव्हा पुन्हा चित्रपटात प्रवेश करता झाला त्यावेळी त्याचा शहेनशहा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा शो सकाळी सहा वाजेपासून ठेवण्यात आला होता. खामगावच्या मोहन टॉकीज मध्ये हा चित्रपट तेंव्हा लागला होता. तेव्हा सकाळी सहाच्या शोसाठी पाच वाजेपासूनच भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या अशी आठवण आजही तत्कालीन तरुण सांगतात. अशी चित्रपटाची प्रचंड क्रेझ , वेड, दिवानगी भारतीयांना आहे.
जनतेचे हे चित्रपटवेड चित्रपट निर्मात्यांना सुद्धा लक्षात आले व ते सुद्धा लोकांना आवडतील असे चित्रपट बनवू लागले. चित्रपटांचे वाढते वेड यावर आधारित सुद्धा चित्रपट निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ गुड्डी आणि रंगीला या चित्रपटांमध्ये चित्रपटवेड्या तरुणी चित्रपटासाठी किंवा त्या अभिनेत्यासाठी, त्याला भेटण्यासाठी म्हणून काय-काय प्रयत्न करतात. पण ते कसे खुळेपणाचे आहे भुलवणारे आहे हे नंतर त्यांच्या लक्षात येते. दिग्दर्शकांनी चित्रपट, अभिनेते यांच्याप्रती त्या दोन चित्रपटातील तरुणींना वाटणारे वेडे प्रेम, आकर्षण हे अत्यंत उत्तम रीतीने दाखवले आहे. पण तरीही चित्रपटवेड हे अजून काही कमी झालेले नाही आज मोबाईल, ओटीटी, विविध वाहिन्या यांच्या गदारोळात सुद्धा चित्रपट हे तग धरून आहे आणि आजही अनेक चित्रपट हे गर्दी खेचतात. नुकताच पुष्पा 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला. पुष्पाचा पहिला भाग व त्यातील गाणे खूप गाजल्याने तसेच पुष्पा 2 या सिनेमातील एक गाणे सुद्धा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप गाजल्याने लोक पुष्पा 2 या सिनेमाची वाटच पाहत होते. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुन अभिनीत पुष्पा 2 या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी चार डिसेंबर रोजी मोठी चेंगराचेंगरी झाली. त्यात रेवती नामक एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा श्रीतेज नावाचा मुलगा हा गंभीर जखमी झाला. तो इतका गंभीर जखमी झाला की, आता त्याचा ब्रेनडेड झालेला आहे. या स्क्रीनिंगच्या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने तिथे एकच झुंबड उडाली व चेंगराचेंगरी झाली. त्यामध्येच श्रीतेज जखमी झाला. त्याला आता आवश्यक ती मदत सरकार देणार आहे. स्क्रीनिंगच्या वेळी चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन तिथे उपस्थित झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी म्हणून चाहत्यांनी गर्दी केली होती. या घटनेत दोषी म्हणून अल्लू अर्जुन तुरुंगवासात सुद्धा जाऊन आला.
चित्रपटांचे एवढे वेड भारतीयांना का आहे? हा ही एक प्रश्नच आहे. अमिताभ बच्चनच्या काळात प्रस्थापित सरकार, गुंड यांच्याविरोधात आवाज उठवणारा तरुण पाहिला की, लोक त्यात स्वतःलाच बघत असत. ते जे प्रत्यक्षात करू शकत नव्हते ते हा पडद्यावरील तरुण करतो आहे यातच त्यांना समाधान वाटत होते. याच देमार पठडीतल्या, अँग्री यंग मॅन हिरोटाईप सिनेमांना लोक गर्दी करत असत. आज सिनेमा निर्मिती व तंत्रज्ञानात अनेक बदल झाले आहेत, मनोरंजनाची अनेक नवीन साधने आलेली आहेत परंतु भारतीयांचे चित्रपटवेड तसेच पूर्वीसारखे कायम आहे पण चित्रपट पाहण्यास जातांना, एखाद्या स्टार मागे धावतांना ते आपल्या जीवावर तर बेतणार नाही याची काळजी जनतेने घेणे सुद्धा आवश्यक आहे. पडद्यावर खूप चांगली भूमिका वठवणारा स्टार हा प्रत्यक्ष जीवनात चांगला असेलच याची खात्री देता येत नाही. पुष्पा व पुष्पा 2 हे दोन्ही सिनेमे मी काही बघितलेले नाही परंतु पुष्पा या सिनेमात नायक हा डॉन असतो, गुंडा का स्मगलर असतो पण तरीही तो कसा चांगला आहे हे दिग्दर्शकाने व्यवस्थित रंगवले आहे. याचा वाईट परिणाम समाजावर व लहान मुलांवर होत असतो हे सुद्धा जनतेने विशेषतः चित्रपटप्रेमी जनतेने समजून घेतले पाहिजे. जुन्या काळात व आजही अनेक चित्रपट समाजाला काहीतरी शिकवण देणारे, बोधप्रद असे होते. आजही तसे काही क्वचित निर्माण होतात परंतु दुर्दैवाने असे सिनेमे जनतेला सुद्धा विशेष आवडत नाही. चित्र-विचित्र हावभाव, अश्लील हालचाली, शेकडो अतिरिक्त कलाकार घेऊन चित्रित केली जाणारी तशीच अश्लील गाणी हे मात्र जनतेला खूप आवडते. बलम सामी हे गाणे तर खूप गाजले होते. विविध अंगविक्षेप असणारी उत्तेजक अशी गाणी आजकालच्या gen z पिढीतील तरुणाईला तर खूपच आवडतात. प्रत्येकाला आपली आपली आवड असते, त्याने ती जपली सुद्धा पाहिजे. परंतु आपल्या आवडीमुळे आपल्यासह इतरांवर सुद्धा संकट येत असेल तर अशी आवड जपतांना आपण विचार करणे आवश्यक आहे. चित्रपटांची आवड नसावी असे म्हणणे नाही परंतु चित्रपटांची अति आवड अति वेड, खुळा नाद नसावा की ज्यामुळे आपल्यासह इतरांच्याही जीवावर बेतेल म्हणून अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यातच खरी हुशारी आहे. शिवाय पहिल्या काही दिवसातच करोडोंचा गल्ला गोळा करणारे हे स्टार आणि निर्माते यामुळे समाजाला काय फायदा होतो याचाही विचार होणे गरजेचे आहे. चित्रपट बघूच नाही असा या लेखाचा उद्देश नाही. चांगले चित्रपट जरूर पाहावे परंतु त्याचे अतिवेड, अति क्रेझ नसावे की ज्यामुळे आपल्या जीवावर संकट येईल.