"...है वोही सच्चा सोना"
राजकारणात आल्यावर गब्बर झालेले अनेक नेते आपण बघितले आहेत. परंतु निवडणूक आयोगासमोर फडणवीस यांनी त्यांच्या संपत्तीची दिलेली माहिती बघून कोणालाही आश्चर्यच वाटेल.
आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची तिस-यांदा शपथ घेणार आहे. हा लेख वाचकांपर्यंत पोहोचेपर्यंत कदाचित शपथविधी झालेला सुद्धा असेल. पण पुन्हा येईन असे त्यांनी म्हटले होते ते प्रत्यक्षात आले आहे म्हणून हा लेखन प्रपंच.
पाच वर्षांपुर्वी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे आपल्या वडीलांची विचारसरणी आणि पक्षाची भूमिका यांना गाठोड्यात गुंडाळून माळोच्यावर ठेवून आणि एक शिवसैनिक म्हणून स्वत: शरद पवार व कॉंग्रेसच्या कुबड्या घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत "मी पुन्हा येईन" ही कविता म्हटली होती. त्यावरून बरीच चर्चा झाली होती. अनेकांनी त्या शब्दांवरून सुसंस्कृत देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली सुद्धा उडवली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशा मोठ-मोठ्या पदांवर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर गतकाळात अनेकांनी शिवराळ भाषेत, महाराष्ट्राला न शोभणा-या अशा भाषेत टीका केली, शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांच्यावरच नव्हे तर त्यांच्या पत्नीवर सुद्धा गलिच्छ भाषेत टीका केली. शरीरावरून सुद्धा टीका केली परंतू देवेंद्र यांनी त्याला कधीही प्रत्युत्तर दिले नाही. त्यांनी प्रत्युत्तर न देऊन त्यांच्यावर टीका करणा-यांना, त्या शिव्या देणा-या तमाम लोकांना नेटक-यांना त्यांची लायकी दाखवून दिली. इतिहास हा शिव्या देणा-यांना नव्हे तर कर्तुत्वाला, कर्तुत्ववान लोकांनाच लक्षात ठेवतो हे देवेंद फडणवीस यांनी एका भाषणात म्हटल्यावर त्यांची राजकीय उंची व विचारसरणी महाराष्ट्राने पाहिली. आपण सर्व भारतवासी जरी विविध जाती-धर्मांचे असू तरी सर्वप्रथम आपण भारतीय आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे मागील काही काळामध्ये सत्ता प्राप्तीसाठी महाराष्ट्रातील जनतेमध्ये जातीभेदाचे विष काही राजकारणी लोकांनी पेरण्याचे काम केले, त्याला खतपाणी सुद्धा घातले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचे गढूळ वातावरण निर्माण झाले. जनता सुद्धा एकमेकांना जातीच्या चष्म्यातून पाहू लागली. समाज माध्यमांवर तर गलिच्छ स्तरावर जातीवाचक उल्लेख करून फडणवीससारख्या नेत्यांची हेटाळणी करताना लोक दिसून येतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रात सर्वात जास्त गलिच्छ भाषा जर कुणाबद्दल वापरली गेली असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे होत. पण तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कामाला प्राधान्य दिले पक्षाला वाढवण्यास प्राधान्य दिले आणि त्याची परतफेड म्हणून जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिले. या निवडून देण्यावर सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातून विरोधी पक्ष शंका-कुशंका घेत आहेत. त्यांच्या हे लक्षात येत नाही किंवा ते मुद्दामच जाणून घेत नाही की, या निवडणुकीत त्यांची आमदार संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे. 2014 मध्ये फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात अनेक विकास कामे सुरु झाली व पार पडली यात काहीच दुमत नाही परंतू नंतर युतीचा काडीमोड झाला आणि तद्नंतर उद्धव ठाकरे यांची बदलेली भूमिका, टोमणे मारणे, फडणवीस यांच्या काळात सुरु झालेल्या योजनांना खीळ घालण्याचे एकमेव काम केले. 2019 मध्ये पण जनतेने फडणवीस यांनाच कौल दिला होता परंतू हा कौल हिसकावून घेतल्या गेला हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेने पाहिले आहे. काल भाजपा कोअर कमिटी व वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नांव आता गटनेता आणि तदनुषंगाने मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केले याचा आनंद तमाम महाराष्ट्रवासियांना झाला आहे. आता "तू पुन्हा येशील तर मी पण पुन्हा बसेल" असे म्हणणारे, एकेरी भाषेत बोलणारे फडतूस कलंक अशी विशेषणे फडणवीस यांना लावणारे काही विघ्नसंतोषी लोक तर आहेतच म्हणा. ती तर आता आणखी चवताळतील. ते निव्वळ शिवीगाळ व जात धर्मावरून हेटाळणी करणारी विधाने करतील, त्यांना तेवढेच काय ते येते. पण अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. पण ते लोक हे सुद्धा मानायला तयार नाही, समजून घ्यायला तयार नाही. वडिलांच्या पुण्याईच्या जोरावर राजकारणात आलेले असे लोक कुठे, तर वयाच्या 22 व्या वर्षापासून स्वतःच्या जोरावर राजकारणात आलेले नगरसेवक, आमदार व मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले कर्तुत्ववान देवेंद्र फडणवीस कुठे. देवेंद्र फडणवीस हे पद, प्रतिष्ठेकरीता राजकारणात आलेले व्यक्ती नाही. इतकी वर्षे राजकारणात असूनही त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांनी कुठल्याही संस्था वगैरे उघडलेल्या नाही. राजकारणात आल्यावर गब्बर झालेले अनेक नेते आपण बघितले आहेत. परंतु निवडणूक आयोगासमोर फडणवीस यांनी त्यांच्या संपत्तीची दिलेली माहिती बघून कोणालाही आश्चर्यच वाटेल. त्यांच्या नावावर दोन घरे, शेती, काही लाख रुपयांचे सोने व 62 लाख रुपये कर्ज आहे. अशा स्वच्छ प्रतिमा असलेल्या, सुसंस्कृत असलेल्या व्यक्तीला केवळ दोष देण्याचे, शिव्या देण्याचे कार्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे आणि दुर्दैवाने नेटकरी जनतेने सुद्धा केलेले आहे. त्यांनी फडणवीस यांची एवढी हेटाळणी केली की जनतेला सुद्धा ती आवडली नाही आणि जनतेने महायुतीला भरघोस मतांनी निवडून दिले. "आगमे जलकेभी जो निखरे है वही सच्चा सोना" या एका गीतातील ओळीप्रमाणे शिव्यांची लाखोली, विविध दोषारोपणे, त्यांच्या पत्नीबाबत केलेली गलिच्छ विधाने, त्यांच्या शारीरिक ठेवणीवरून केलेली विधाने, मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने त्यांना फडतूस, कलंक, नालायक असे संबोधणे या अशा हेटाळणीरुपी आगीतून फडणवीस हे तावून सुलाखून सोन्याप्रमाणे पूर्वीपेक्षा अधिक उजळून त्यांनीच म्हटल्याप्रमाणे "ते पुन्हा आले" आहे.
अप्रतिम खरच व्यक्ति पेक्षा व्यक्तित्व मोठ
उत्तर द्याहटवा