काळा आंबा
दर गुरुवारी लेख लिहिण्याचा माझा नेम. पण काही कार्य बाहुल्यामुळे 2025 च्या वर्षारंभीच्या पहिल्याच दोन गुरुवारी लेखन होऊ शकले नाही. त्यामुळे चुकचुकल्यासारखे वाटत होते. परवा 14 जानेवारी रोजी संक्रांत साजरी झाली. सुर्यनारायण जेंव्हा मकर राशीत प्रवेश करतात त्या या संक्रांतीच्या दिनी स्मरण होत असते एका भीषण रणसंग्रामाचे, हरूनही पुरून उरलेल्या पराक्रमी मराठ्यांचे, शत्रू असलेल्या मराठ्यांची शक्ती, राष्ट्रनिष्ठा ओळखून, तेच दिल्लीचा अर्थात भारताचा कारभार सांभाळू शकतात असे पत्र देणाऱ्या अहमदशहा अब्दाली या दुर्राणीचे. खरे तर या विषयावर यापुर्वीही लेख लिहिला आहे परंतु "युद्धस्य कथा रम्य:" हा या उक्तीप्रमाणे युद्ध कथा ऐकण्यात जसा रस येतो तसाच त्या लिहिण्यात सुद्धा रस येत असतो.
14 जानेवारी 1761 रोजी आजच्या हरियाणातील पानिपत येथे पुण्याहून मराठा फौज बाजार बुणग्यांसह हल्लीच्या अफगाणिस्तान मधील अहमदशाह अब्दाली या दूर्राणी वंशातील सुलतानाला टक्कर देण्यासाठी , त्याच्यापासून दिल्लीला वाचवण्यासाठी म्हणून येऊन ठेपले होते. यमुनेचा उतार पाहून पुढे निघालेल्या मराठा सैन्याने अब्दालीसोबत निकराचा लढा दिला. पानिपतला भीषण रणसंग्राम झाला. या युद्धाने भारत देश हा अखंड देश असल्याचे दृढ झाले. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे बिरूद रूढ झाले ते या पानिपतच्या तिसऱ्या लढाईमुळेच. ही लढाई सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वामध्ये लढली गेली. पहिले बाजीराव पुत्र नानासाहेब यांनी सदाशिवराव भाऊ यांना पानिपतच्या लढाईसाठी पाठवतांना विश्वासराव या त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला सुद्धा सोबत दिले. विश्वासरावांच्या मातेने म्हणजे गोपिकाबाई यांनी निडरतेने, धैर्याने आपल्या तरुण ज्येष्ठ पुत्राला पानिपतच्या युद्धास पाठवण्याचा आग्रह केला. धन्य त्या मातेची ज्यांनी आपल्या पुत्रास युद्धाची, पराक्रमाची, राष्ट्र रक्षणाची प्रेरणा दिली. नाहीतर आज आपण आपल्या मुलांना किती जपतो, बाबू बाबू करून त्यांचे लाड करतो, त्यांना कुठे जवळपासही एकटे जाण्यास मज्जाव करतो. त्यामुळे त्यांच्यात संकटांचा सामना करण्याचे धैर्य येत नाही, ते थोड्याही संकटाने, अपयशाने खचून जातात. विश्वासराव, सदाशिवरावभाऊ यांचे समवेत शिंदे, होळकर, पवार, गायकवाड असे मातब्बर सरदार सुद्धा होतेच. 14 जानेवारी रोजी ही भीषण लढाई झाली. या लढाईत तरुण पेशवा विश्वासराव कामी आले. सदाशिवरावभाऊ हे सुद्धा हुतात्मा झाले. परंतु सदाशिवरावभाऊ यांच्या निधनाविषयी अनेक मतेमतांतरे आहेत. लढाई संपल्यावर "दोन मोत्ये गेली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा तर अगणित गेला" असे सांकेतिक भाषेतील पत्र पुण्याला धाडण्यात आले. पानिपतच्या लढाईमुळे काही म्हणी सुद्धा रूढ झाल्या जसे विश्वासाबद्दल बोलायचे झाल्यास "विश्वास तर पानिपतातच गेला" , भरपूर नुकसान झाल्यास "पानिपत झाले" अशा म्हणी आजही लोक बोली भाषेत वापरत असतात. पेशव्यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या या लढाईत महाराष्ट्रातील अठरापगड जातीचे लोक एकत्रित झाले होते, एकत्र होऊन लढले होते. पण आज अत्याधुनिक काळात, बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात मात्र जातीभेद हा कमी होण्याऐवजी दुर्दैवाने अधिक वाढलेला दिसतो. आपल्यासाठी जातिभेदाचा जराही लवलेश न ठेवता आपले पुर्वज शेकडो किलोमीटर पायपीट करून शत्रूशी टक्कर देण्यासाठी पानिपतला गेले आणि आपण मात्र आजही जातिभेद करतो ही शोकांतिकाच नव्हे का ? पानिपतच्या लढाईमध्ये जर उत्तरेकडील सर्वच सत्ताधीशांनी मराठ्यांना सहकार्य केले असते तर कदाचित भारताच्या इतिहासाचे चित्रच बदलले असते. परंतु जाट, रोहिले, राजपूत यांनी मराठ्यांना तेंव्हा साथ दिली नाही. सर्वांनी जर मराठ्यांना साथ दिली असती तर पुढील काळ हा भारताचे भविष्य बदलणारा ठरला असता. मुघल साम्राज्य तर तेंव्हा नावालाच होते आणि इंग्रजांना सुद्धा मोठा अटकाव झाला असता.
आपल्या या पराक्रमी इतिहासाची, पराक्रमी, लढवैय्या पुर्वजांची आठवण करून देणा-या संक्रांतीचे स्वरूप आता किती बदलले आहे. पतंगबाजी मोठ्या प्रमाणात होते, पतंग उडवतांना मोठमोठ्या आवाजात गाणी लावली जातात. ज्या वयात विश्वासराव पेशवे शत्रूशी युद्ध करण्यासाठी गेले त्या वयातील तरुण ज्या पतंगांमुळे, मांजामुळे लोकांचे जीव जात आहेत, अपघात होत आहेत त्या पतंगबाजीत गुंतलेले पाहून खंत वाटते. तत्कालीन मराठ्यांनी लढाईत पराक्रम गाजवले. आजच्या तरुणांवर पराक्रम गाजवण्यासाठी लढाई नसली तर त्यांनी अभ्यासात किंवा खेळात पराक्रम गाजवायला नको का ? असा प्रश्न पडतो. पानिपतचा युद्धसंग्राम इतका भीषण होता की लाखाहून अधिक मराठी या लढाईत हुतात्मा झाले महाराष्ट्रात एक लाख चुडा फुटला. पानिपत येथे मराठ्यांचे एवढे रक्त सांडले की येथील एक लहान आम्र रोपटे काळे ठिक्कर पडले. मोठा झाल्यावर सुद्धा तो आम्र तरू तसाच काळा राहिला त्यामुळे या स्थळाला "काला अंब" अर्थात काळा आंबा असे नांव पडले अशी एक कथा या भागात प्रचलित आहे. पानिपतला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. आपल्या पुर्वजांच्या रक्ताने तरुवर काळे पडले होते पण त्यांनी केलेल्या पराक्रमाने, प्राणांची आहुती देल्याने आपण आज स्वातंत्र्याची मधुर फळे चाखत आहोत किंबहुना फुकट मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे दिवसेंदिवस अधिकच उच्छृंखल होत आहोत, बेछूट होत चाललो आहोत. आगामी प्रत्येक संक्रांतीला आपल्याला केवळ पतंग, पतंगबाजी न आठवता पेशवे, मराठे, त्यांचा पराक्रम व काळा आंबा अर्थात पानिपत हे स्थळ व मराठ्यांचा पराक्रम आठवायला पाहिजे. पानिपत तमाम वीरांना भावपुर्ण श्रद्धांजली.