असाही एक 'विजय'पथ
...कष्ट करून, जिद्दीने, मेहनतीने, सचोटीने व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी म्हणून विजुभाऊंनी स्वतःच्या भरवशावर स्वतःचा असा एक विजयपथ निर्माण केला आणि व्यवसायात यश मिळवून दाखवले. विजुभाऊ यांची ही स्टोरी तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल...
हा विजयपथ आहे एका जिद्दी होतकरू गरीबीतून वर येऊन व्यवसायात स्थापित होणाऱ्या एका तरुणाचा. खामगांव येथील टिळक स्मारक मंदिरचे तत्कालीन काळजीवाहक श्रीरामजी शिंदे यांना 20/4/1965 रोजी द्वितीय पुत्र प्राप्त झाला. नांव ठेवले विजय, विजय श्रीराम शिंदे. घरची परिस्थिती बेताचीच, कमीत कमी पैशात घरखर्च भागवावा लागे म्हणून मग श्रीराम शिंदे आणि भिकाबाई यांनी आपल्या मुलांचे प्राथमिक शिक्षण न.प.शाळा आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल मध्येच केले. आई वडिलांना मदत म्हणून लहानग्या विजयने इयत्ता चौथी मध्येच असतांना 50 पैसे रोजाने कामकाज करण्यात सुरुवात केली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. शिक्षण अर्धवटच राहिले. विजय आता तरुण झाला होता. घर खर्च वाढू लागला होता, तो भागवता यावा म्हणून विजयने मुंबई येथे कष्टात दिवस काढून शिवणकाम शिकले. लहानपणीच रोजाने काम केल्यामुळे व त्यातील चांगल्या वाईट अनुभवामुळे विजय शिंदे यांच्या डोक्यात नोकरीपेक्षा व्यवसायाच करावा असे ठसले होते त्यामुळेच मग 1984 मध्ये स्टेट बँकेमध्ये नोकरी मिळाली होती परंतु तेरा दिवस काम करून ती सोडून दिली आणि आपल्या शिवणलेच्या जोरावर 1986 मध्ये खामगांवातील तत्कालीन श्याम टॉकीज म्हणजेच आताच्या सनी पॅलेस जवळ टेलरिंगचे दुकान सुरू केले. हे दुकान विजय शिंदे यांनी पाच वर्ष चालवले. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजे 1991 मध्ये विजयचे दोनाचे चार हात झाले नववधूच्या पायगुणामुळे जगदंबा चौकामध्ये टेलरिंगचा त्यांचा व्याप वाढला. विजय मग विजयराव/विजुभाऊ या नावाने ओळखला जाऊ लागला. चार वर्षे या ठिकाणी व्यवसाय केल्यानंतर पुढे विजुभाऊ शिंदे हे 1996 ते 99 सिल्लोड येथे गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी यशस्वी रीतीने टेलरिंग व्यवसाय केला. अर्थार्जनाचे आणखी काही मार्ग असावेत म्हणून 2001 मध्ये त्यांनी फटाक्याचे दुकान लावायला सुरुवात केली आणि 2006 पर्यंत ते फटाक्याचे दुकान लावत असत. व्यवसायात आवड असल्यामुळे आणि सतत नव्याचा ध्यास, जिद्द , उमेद असल्याने बोलका स्वभाव असलेले विजुभाऊ खामगांवात सुपरिचत झाले. पुढे काळात झालेला बदल लक्षात घेता व लोकांच्या खाद्याच्या अभिरुचीत झालेला बदल ध्यानात घेऊन त्यांनी 2002 मध्ये एलआयसी समोर फौजी कॉर्नर म्हणून खामगावातले पहिले चायनीज आणि पिझ्झाचे उपाहारगृह सुरू केले. त्यासाठी त्यांनी नेपाळी कारागीर आणले होते. त्या काळात खामगांवला साऊथ इंडियन पदार्थच तर क्वचितच मिळत असत आणि तेव्हा पिझ्झा आणल्यामुळे विविध क्लबच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा पिझ्झाचा स्टॉल लागत असे आणि म्हणून लहान मुलांमध्ये जे पिझ्झावाले अंकल किंवा पिझ्झा वाले मामा म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे 2006 मध्ये विजूभाऊंनी टेंभुर्णा फाट्यावर शिवराणा ढाबा सुरू केला आणि तो सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या अनेक वर्ष चालवला. पुढे वृद्धापकाळमुळे शिस्तप्रिय व टिळक स्मारकचे काम चोख बजावणारे श्रीराम शिंदे म्हणजे विजय शिंदे यांचे वडील हे टिळक स्मारकच्या व्यापामधून सेवानिवृत्त झाले आणि त्यामुळे टिळक स्मारकचे केअर टेकर म्हणून विजय शिंदे यांनी कार्यभार स्विकारला. हे करत असतानाच त्यांनी 2009 मध्ये घरपोच रॉकेल वितरण हा उपक्रम सुद्धा राबवला होता आणि 2011 मध्ये एक खिडकी योजनेचा सेतू हा उपक्रम मुलासह सुरू केला मुलाने व्यवस्थितरित्या पूर्ण कारभार सांभाळला. 2012 मध्ये विजुभाऊ यांनी कॅटरिंग व्यवसाय सुरू केला, जो आजही सुरू आहे आणि खामगांव मध्ये शिंदे कॅटरर्स म्हणून नावाजलेला आहे. या व्यवसायात सुद्धा शिंदे यांनी चांगले नाव कमावले. सचोटीने आणि उत्कृष्ट भोजन लोकांना दिल्यामुळे या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला आणि शिंदे कॅटरर्स हे नाव खामगांवतच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्ये ही ओळखले जाऊ लागले. त्यांना स्वतःलाच खाण्यापिण्याची प्रचंड आवड असल्यामुळे आणि विशेष म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा खाऊ घालण्याची आवड असल्यामुळे ते हा व्यवसाय आनंदाने उत्साहाने चालवत आहेत. खामगांव सोबतच अहमदनगर, संभाजीनगर, अमरावती, अकोला, चिखली, नांदुरा मलकापूर या गावांना सुद्धा त्यांनी कॅटरिंग सेवा पुरवली आहे. याशिवाय विजुभाऊ हे विविध सामाजिक उपक्रमात सुद्धा हीरहिरीने भाग घेत असतात. 80 च्या दशकात चंदनशेष गणेश मंडळाचे ते उत्साही सदस्य होते. त्यांच्या या विविध उपक्रमांमध्ये आणि या विविध व्यवसायांच्या प्रवासामध्ये पत्नी, परीवारजन आणि मुलाचे त्यांना चांगलेच पाठबळ आहे. शिंदे यांचे दिवाळीचे फराळाचे पदार्थ सुद्धा प्रसिद्ध आहे.
विजुभाऊ यांना त्यांच्या मनमिळाऊ व आपलेसे करण्याच्या स्वभावामुळे खामगांव मधील अनेक लोक ओळखतात आणि त्यांच्या परिवारात सुद्धा ते भाच्यांचे लाडके मामा, बहीण भावांचे लाडके भाऊ, पुतण्यांचे आवडते काका आणि हो आता तर त्यांना नातवंड सुद्धा झाली आहेत या नातवंडाचे ते आवडते बाबाजान आहे. आज हे बाबाजान अर्थात कष्टाळू, पडेल ते काम करण्याची तयारी असलेले विजुभाऊ वयाची साठ वर्षे पूर्ण करून एकसष्टीत पदार्पण करीत आहे. आजही तरुणाला लाजवेल असाच उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. कुणीही त्यांना भेटायला गेले की ते मोठ्या उत्साहाने त्याच्याशी संवाद साधतात आणि आपल्या दिलखुलास स्वभावामुळे वातावरण प्रफुल्लित ठेवतात. अशा या नांवातच विजय आणि "श्रीराम" असलेल्या व्यक्तीला लोकप्रियता आणि यश कसे नाही मिळणार ?
आज विजुभाऊ शिंदे हे नाव सर्वपरिचित असे झालेले आहे. विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, सेवाभावी, औद्योगिक अशा प्रत्येकच क्षेत्रात विजूभाऊंचे नांव आहे, चांगली ओळख आहे. "कर्तव्याने घडतो माणूस" या उक्ती प्रमाणे विजुभाऊ आपले कर्तव्य पार पाडत गेले व आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले असे व्यक्तिमत्व आहे.
अशा होतकरू, कष्टाळू, मोठा मित्रपरिवार असलेल्या विजय शिंदे यांना त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा परिवार आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आगामी कार्यकाळात त्यांचा व्यवसाय अधिकाधिक नांवलौकिक प्राप्त करो आणि त्यांना आरोग्यदायी असे दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
विजय शिंदे यांनी लहानपणापासून कष्ट घेतले आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून अर्थार्जन करून आपले कुटुंब सांभाळले शिवाय त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना रोजगार सुद्धा मिळाला व मिळतो आहे. आजच्या शानशौकीत राहणाऱ्या तरुणांना विजय शिंदे यांची ही स्टोरी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
कष्ट करून, जिद्दीने, मेहनतीने, सचोटीने व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी म्हणून विजुभाऊंनी स्वतःच्या भरवशावर स्वतःचा असा एक विजयपथ निर्माण केला आणि व्यवसायात यश मिळवून दाखवले. त्यांना वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा व दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.
माहिती स्त्रोत - भूषण शिंदे
शब्दांकन - विनय वि. वरणगांवकर, स्तंभलेखक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा