Click "Follow" Button below To Follow this Blog

०३/०७/२०२५

Article about city stresspass

बुलडोजर का मुंह एक बार अमिरोके अतिक्रमणपे भी घुमाओ. 


त्या मेकॅनिकचे "आमचा संसार उघड्यावर आला" हे उत्तर मनात घोळत होते. अनेक सुशिक्षित, धनवान, उच्चभ्रू लोकांनी केलेली अतिक्रमणे, त्यांनी बळकावलेल्या शासकीय जागा, इमारती हे सर्व माझ्या डोळ्यासमोर येऊ लागल्या.

सध्या महाराष्ट्रात नेत्यांचा हिंदी मराठीचा वाद सुरू आहे. परंतु बहुतांश वेळा माझ्या मराठी लेखांचे शीर्षक हे मी हिंदीतच दिले आहे आणि कुणालाही कधीही ते गैर वाटल्याचे कोणी म्हटले नाही किंवा कुणी तशी प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही. मातृभाषा म्हणून मला मराठीचा जितका अभिमान आहे तितकाच अभिमान राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा पण आहे आणि तो सर्वांनाच असावा, शिवाय देशात भाषेवरून वाद होणे योग्य नाही,  असो ! 
     नुकतीच खामगांव शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली किंबहुना अद्यापही ती सुरू आहे. शहरातील रस्ते एकदम मोकळे दिसू लागले, रस्त्यांना मोकळा श्वास घ्यायला जागा मिळाली, खामगांव रेल्वे स्थानकाच्या कुंपणाची भिंत तर अनेकांनी पहिल्यांदाच पहिली, बस स्थानक परिसर सुद्धा इतका मोकळा असू शकतो हे खामगांवकरांना अनुभवायला आले. काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाने आवाहन केल्यानंतर स्वतःहून अतिक्रमण काढले पण ज्यांनी अतिक्रमण स्वतःहून काढले नव्हते त्यांचे अतिक्रमण हे बुलडोझरने काढल्यामुळे त्यांचे बरेचसे नुकसान झाले. अतिक्रमण ही सर्वच सर्वच शहरांची एक मोठी समस्या झालेली आहे. अनेक बेरोजगार युवक पुरेशा भांडवलाअभावी सरकारी जमिनीवर दुकान थाटून उद्योग व्यवसाय करतात. नोकरी मिळत नसल्याने छोट्या मोठ्या व्यवसायातून ते त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत असतात परंतु कितीही झाले तरी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे हे बेकायदेशीरच आहे. अतिक्रमणामुळे रहदारीला अडचण, पार्किंग आणि इतरही अनेक समस्या येत असतात. अतिक्रमणांमधला कहर म्हणजे काही अतिक्रमणधारक हे केवळ दुकान थाटतात आणि इतरांना ते भाड्याने देतात. म्हणजे जागा सरकारची आणि भाडे फुकटात कमवायचे, अशी स्थिती देशात सर्वत्र आहे. खामगांव शहरात यावेळेस अतिक्रमण हटवतांना प्रशासन पूर्ण सज्ज असलेले आढळून आले. सर्व मोहीम शांततेत राबवली गेली शिवाय मोकळ्या झालेल्या जागेवर त्वरित आठ-दहा फुटांची झाडे सुद्धा लावण्यात आली. शहराच्या दृष्टीने म्हणाल तर ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु आता अतिक्रमण हटवल्यामुळे अनेकांची रोजी रोटी बुडाली आहे. ज्या दिवशी अतिक्रमण हटवले त्याच दिवशी नेमके माझ्या गाडीचे इग्निशन पाणी गेल्यामुळे खराब झाले होते. मी  अतिक्रमण हटाव मोहिमेत दुकान पाडलेल्या एका मेकॅनिकला "इग्निशन दुरुस्त करून देता का?" असे विचारल्यावर त्याने जे उत्तर दिले त्याने माझे मन हेलावले. तो म्हणाला, "साहेब सध्या काहीच करू शकत नाही तुम्ही बघताच आहात, आमचा संसार उघड्यावर आला आहे." ठीक आहे असे म्हणून मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो. थोडा प्रयत्न केल्यावर गाडी सुरू झाली. घरी येत असतांना माझ्या डोक्यात त्या मेकॅनिकचे "आमचा संसार उघड्यावर आला" हे उत्तर घोळत होते. अतिक्रमण आणि त्या संबंधित अनेक समस्या हे विषय माझ्या डोक्यात येऊ लागले. अनेक सुशिक्षित, धनवान, उच्चभ्रू लोकांनी केलेली अतिक्रमणे, त्यांनी बळकावल्या शासकीय जागा, इमारती हे सर्व मला आठवू लागले. अनेक सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित अशा लोकांनी “सर्विस लाईन” मध्ये अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्यांच्या पलीकडील भागातून येणा-या सांडपाण्याची समस्या निर्माण होते किंवा होईल याचेही भान ते ठेवत नाही शिवाय “आपल्याला कोण काय करणार?” अशी मग्रुरी असतेच. आणि हो खरंच ! कोणी काही करत नाही. यांच्या जवळच्या पैस्यामुळे हे सर्व काही ‘मॅनेज’ करीत असतात. त्यांच्या घराच्या आधी जी घरे आदी असतात तिकडून जे सांडपाणी येत असते ते कुठे जाणार? ते अडते आणि मग यांच्या घराच्या बाजूला पुन्हा अस्वच्छता निर्माण होते. काही सुशिक्षित  रस्त्यावर अतिक्रमण करतात. त्यांच्या कुंपणाच्या भिंती कश्या रस्त्यावर आल्या आहेत हे शेंबड्या पोरालाही समजते, परंतु प्रशासनास मात्र ते दिसत नाही. कुण्यातरी पक्षाचे सदस्य बनायचे किंवा अमक्या ढमक्या सेलचे पदाधिकारी म्हणून मिरवायचे आणि सुशिक्षित असूनही अशिक्षितासारखे कृत्य करावयाचे. गरीब, झोपडपट्टी मध्ये राहणारे, रोजगार नसल्याने पोटासाठी अतिक्रमण व्यवसाय करणा-यांवर वेळप्रसंगी बुलडोजर फिरवले जाते परंतु सुशिक्षित(?) आणि धनदांडग्या सर्विस लाईन आणि रस्त्यांवर घराच्या कुंपणाच्या भिंती बांधून वाहतुकीची कुचंबणा करणा-यांवर प्रशासन मात्र क्वचितच कारवाई करतांना दिसून येते. थोड्या जमिनीचा लोभ ठेवून सुशिक्षित असूनही “सर्विस लाईन”, रस्ता अशा ठिकाणी अतिक्रमण करून, घराच्या गॅलरी मर्यादेपेक्षा बाहेर काढून, पायऱ्या रस्त्यावर काढून सर्वसामान्य जनतेला त्रस्त करणा-यांना “तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावानुसार वर्तन करा परंतु तुमच्या जागेच्या लोभामुळे दूस-यास त्रास तर होत नाही आहे ना निदान याची तरी काळजी घ्या सुशिक्षित असूनही अशिक्षितपणा करू नका” हे आवर्जून सांगावेसे वाटते.
काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेश मधील इंदोर येथील एका रहिवाशी भागातील नागरिकांनी अतीक्रमण हटविण्यास आलेल्या कर्मचा-यांना स्वत;चे घर, दुकान पडत असूनही विकासासाठी चहा पाजून सहकार्य केले आणि आपले अतिक्रमण काढू दिले अशी घटना घडली होती. अशीच कायद्याचा सन्मान करण्याची सद्बुद्धी ईश्वर सर्वांना देवो. तसेच प्रशासनाला सुद्धा गरीब बेरोजगारांची अतिक्रमणे काढण्याबरोबरच सुशिक्षित, धनिक, उच्चविद्याविभूषित लोकांनी केलेली अतिक्रमणे सुद्धा काढण्याची बुद्धी आणि धमक ईश्वर प्रदान करो असे वाटते आणि म्हणूनच प्रशासनाला म्हणावेसे वाटते की, जरा "बुलडोझर का मुंह एक बार अमिरोके अतिक्रमणपे भी घुमाओ."

1 टिप्पणी:

  1. Atikramne ji bekayadeshirach aahe sarva nahitar haluhalu sarvatra jangalraj disel sarkarane udyogasathi low budget shops jarur kadhave aani sarva samasyanche mul loksankhya aahe tyavar sudha kadak niyam aale pahije

    उत्तर द्याहटवा