..आणि रमाबाई धावल्या
आपल्या लेकरांसाठी घेतलेले कष्ट, झेललेली अनेक संकटे याबाबतच्या कित्येक गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत परंतु रमाबाई रणवरे यांनी एक माता आपल्या लेकरांसाठी काय करू शकते हे आपल्याला प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.
काल रमाबाई रणवरे नावाच्या एका स्त्रीचे प्रेरणादायी असे वृत्त वाचले आणि डोळ्यासमोर काही उल्लेखनीय अशा रमाबाई नावाच्या स्त्रिया येऊन उभ्या राहिल्या. का नाही उभ्या राहणार ? रमा हे नावच तसे आहे, लक्ष्मीचे. खरे तर रमाबाई नावाच्या अनेक कर्तृत्ववान नावाच्या स्त्रिया असतील आणि होऊनही गेल्या असतील पण माझ्या डोळ्यासमोर मात्र तीन रमाबाई आल्या. त्यात सर्वप्रथम माधवराव पेशव्यांच्या सहचरणी, माधवरावांच्या आजारपणात त्यांची सुश्रुषा करणाऱ्या, त्यांच्या मरणोपरांत सती जाणाऱ्या, थेऊर गणपती येथे चित्त लावणाऱ्या आणि तिथेच त्यांची समाधी असणाऱ्या रमाबाई पेशवे या आठवल्या. नंतर आठवल्या थोर समाजसेविका, हिंदू लेडी सोशल क्लब आणि सेवासदन सोसायटीची स्थापना करणाऱ्या, पतीच्या प्रेरणेने स्वतः शिक्षण घेऊन 1886 मध्ये मुलींसाठी पहिले उच्च विद्यालय स्थापन करणाऱ्या रमाबाई रानडे. त्याचप्रमाणे आणखी एक अशा रमाबाई डोळ्यासमोर आल्या की ज्यांच्याबाबत, "त्यांच्या आत्मत्यागामुळे माझे विदेशातील शिक्षण पुर्ण झाले." असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते त्या त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर. अशा मुख्यत्वे करून तीन रमाबाई माझ्या डोळ्यासमोर आल्या त्याला निमित्त घडले ते वर उल्लेखलेले मी वाचलेले रमाबाई रणवरे यांचे प्रेरणादायी वृत्त.
रमाबाई रणवरे अंबाजोगाई, जि. बीड येथील अतिशय सर्वसामान्य स्थितीत जीवन जगणारी , लोकांच्या घरी स्वयंपाक करून आपल्या दोन मुलींचा सांभाळ करणारी , पतीचे निधन झालेले अशी 47 वर्षाची स्त्री. दुसऱ्यांच्या घरी काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या भारतातील कुटुंबीयांच्या परिस्थितीबद्दल जास्त विशद करण्याची काही आवश्यकता नाही आपण सर्वच असे कुटुंबीय, असे लोक जवळून पाहत असतो. त्याच प्रकारात मोडणाऱ्या या रमाबाई रणवरे. पतीचे अपघाती निधन झाल्यावर दोन मुलींचा सांभाळ करण्यासाठी रमाबाई कंबर कसून कष्ट करू लागल्या. बरेच प्रसंगी सरकारच्या अनेक फुकटछाप प्रकारच्या योजनांमुळे समाजात असे बोलले जाते की आता गरीब कोणी राहिले नाही. परंतु वास्तविक पाहता अनेक योजना घरी आल्या असल्या तरी कित्येकांना त्या योजनांचा लाभ घेता येत नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती ही बिकटच असते. काही प्रसंगी लाभ घेऊनही परिस्थिती ही बेताचीच राहते. अशाच एका गरीब कुटुंबातील या रमाबाई रणवरे. परिस्थिती कशीही का असो ना मुलींचे शिक्षण मात्र करायचेच असा दृढनिश्चय त्यांनी केला. अशातच त्यांच्या वाचनात एक जाहिरात आली ही जाहिरात होती अमृत दौडची अर्थात अंबाजोगाई येथील एका मॅरेथॉन स्पर्धेची. आयोजकांनी प्रथम विजेत्यास तीन हजार रुपये बक्षीस ठेवले होते. रमाबाईंनी त्या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले. त्यांच्या मोठ्या मुलीने सुद्धा त्यांच्यासोबत त्या स्पर्धेत भाग घेतला. मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्व स्पर्धक तयारीनिशी आले होते. धावण्यासाठी लागणारे कपडे चांगले बूट आदी परिधान करून आले होते. रमाबाई मात्र साध्या साडीमध्ये धावायला लागल्या. त्यांच्या पायात चप्पल होती. थोड्या वेळाने त्यांना चपलीचा अडसर वाटला तर त्यांनी चप्पल सुद्धा काढून टाकली आणि त्या पळायला लागल्या, आपल्या लेकींच्या शिक्षणासाठी त्यांनी वेग पकडला आणि बघता-बघता सर्व धावपटूंना मागे टाकून त्यांनी शर्यतीची अंतिम रेषा पार पाडली आणि प्रथम क्रमांक पटकावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या लेकींच्या शिक्षणासाठी रमाबाई धावल्या त्यातील मोठी लेक ही याच शर्यतीत दुसऱ्या स्थानावर राहिली. आईने आपल्या लेकरांसाठी घेतलेले कष्ट, झेललेली अनेक संकटे याबाबतच्या कित्येक गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत. परंतु रमाबाई रणवरे यांनी एक माता आपल्या लेकरांसाठी काय करू शकते हे आपल्याला प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. मित्रांनो रमाबाई रणवरे यांची ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. कदाचित एखाद्याला स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम तीन हजार ही अल्प अशी रक्कम वाटेल परंतु रमाबाईंसाठी आणि त्यांच्या लेकींसाठी मात्र हे तीन हजार रुपये म्हणजे एक मोठी रक्कम आहे.
आपल्या भारतात आपण अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत की ज्यात छोट्या-छोट्या रकमांच्या घेण्या-देण्यावरून वाद होऊन खून पडले आहे. छोट्या-छोट्या रकमांच्या चोऱ्या सुद्धा झाल्या आहेत. छोट्या रकमांचा भ्रष्टाचार किंवा अपहार सुद्धा झाला आहे. परंतु आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि लेकींच्या शिक्षणासाठी धन मिळावे म्हणून बक्षिसाची रक्कम छोटी का असेना म्हणून रमाबाई रणवरे या मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या आणि केवळ धावल्याच नाही तर प्रथम क्रमांक सुद्धा पटकावला. शासनाकडून मोफत पैशांची आशा बाळगणाऱ्या त्या मोफत पैशांसाठी प्रसंगी खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या अशा तमाम बंधू आणि भगिनींनी, अनुदाने लाटणाऱ्यांनी रमाबाई रणवरे यांचा आदर्श घ्यावा.
"कार्येषु दासी, करणेषु मन्त्री, रूपे च लक्ष्मी, क्षमया धरित्री।"

आदर्श घेण्यासारखा आहे.कोणासमोर हात न पसरवता स्वाभिमानाने जिवन जगत आहेत. कौतुकास्पद.
उत्तर द्याहटवाNice information
उत्तर द्याहटवा